इंडिगोच्या मुंबई विमानाचे नव्या वर्षात रोज ‘उड्डाण’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:06 IST2020-12-29T04:06:01+5:302020-12-29T04:06:01+5:30
औरंगाबाद : नव्या वर्षात औरंगाबादकरांना मुंबईचा विमान प्रवास दररोज करता येणार आहे. इंडिगोचे मुंबई - औरंगाबाद - मुंबई विमान ...

इंडिगोच्या मुंबई विमानाचे नव्या वर्षात रोज ‘उड्डाण’
औरंगाबाद : नव्या वर्षात औरंगाबादकरांना मुंबईचा विमान प्रवास दररोज करता येणार आहे. इंडिगोचे मुंबई - औरंगाबाद - मुंबई विमान ८ जानेवारीपासून रोज उड्डाण करणार आहे.
कोरोनाच्या विळख्यामुळे मार्चपासून विमानसेवा बंद करण्यात आली होती. तब्बल ७ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर १५ ऑक्टोबरपासून मुंबईसाठी विमानसेवा सुरू करण्यात आली. प्रारंभी ही विमानसेवा आठवड्यातून ४ दिवस होती. त्यानंतर १६ नोव्हेंबरपासून ही विमानसेवा आठवड्यातून ३ दिवसांसाठी करण्यात आली. शहरातून मुंबईला ये-जा करणारे उद्योजक, राजकीय नेते यांच्यासह सर्वसामान्य प्रवाशांची संख्या अधिक आहे. कोरोना विळख्यातही विमानतळ आणि विमान प्रवासात घेण्यात येणाऱ्या खबरदारीमुळे विमान प्रवाशांची संख्या वाढत आहे. मात्र, केवळ आठवड्यातून तीनच दिवस मुंबईसाठी विमान उपलब्ध असल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. त्यामुळे मुंबईचे विमान दररोज सुरू करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून जोर धरत होती. अखेर ८ जानेवारीपासून इंडिगोने मुंबईसाठी रोज उड्डाण सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती उद्योजक सुनीत कोठारी यांनी दिली.
सकाळच्या वेळेत सेवेची प्रतीक्षा
मुंबईसाठी सकाळच्या वेळेत विमानसेवा सुरू करण्याची मागणी होत आहे. सकाळी मुंबईत पोहोचून दिवसभर कामकाज करून सायंकाळी पुन्हा औरंगाबादेत पोहोचता येईल, अशा पद्धतीची विमानसेवेची गरज आहे. यादृष्टीनेही विमान कंपन्यांकडे पाठपुरावा केला जात आहे.