भारतीय सैन्यासाठी निघाली सन्मानयात्रा
By Admin | Updated: June 8, 2017 00:14 IST2017-06-08T00:08:19+5:302017-06-08T00:14:17+5:30
परभणी :परभणीतील दोन युवकांनी परभणी ते कारगील अशी बुलेटयात्रा सुरू केली आहे़

भारतीय सैन्यासाठी निघाली सन्मानयात्रा
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : भारतीय सैनिकांसह त्यांच्या कुटुंबियाप्रति जनमानसात आदराची भावना निर्माण व्हावी, या उदात्त हेतूने परभणीतील दोन युवकांनी परभणी ते कारगील अशी बुलेटयात्रा सुरू केली आहे़ सोमवारी मान्यवरांच्या उपस्थितीत ही यात्रा कारगीलकडे रवाना झाली़
भारतीय सैनिकांसह त्यांच्या कुटुंबियांसह कृतज्ञता व्यक्त व्हावी, सैनिकांच्या त्यागाचे जनसामान्यांमध्ये जनजागरण व्हावे, यासाठी परभणी येथील अरुण टाक व शैलेश कुलकर्णी या दोन युवकांनी परभणी -कारगील भारतीय सेना सन्मानयात्रा सुरू केली आहे़ सोमवारी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून यात्रेला प्रारंभ झाला़ हे दोन युवक बुलेटने परभणीहून कारगीलपर्यंतचा प्रवास करणार आहेत़
या प्रवासादरम्यान येणाऱ्या गावांमध्ये जाऊन तेथील नागरिकांची संवाद साधणार आहेत़ भारतीय सैन्याचे कार्य आणि सैनिकांचा त्याग नागरिकांना सांगून भारतीय सैन्याविषयी जनजागरण केले जाणार आहे़ परभणी, हिंगोली, नागपूर, बुऱ्हाणपूर, इंदौर, ग्वाल्हेर, चंदीगड ते कारगील असा हा प्रवास राहणार आहे़ ५ ते २० जून या काळात हे युवक हा प्रवास करणार असून, निवास, भोजनासह अन्य खर्चही स्वत: करणार आहेत़ दरम्यान, ५ जून रोजी या यात्रेला प्रारंभ झाला असून, या दोन्ही युवकांना शुभेच्छा देण्यासाठी प्रवीण मुदगलकर, हिंगोलीचे जि़ प़ सदस्य अजीत मगर, नगरसेवक चंद्रकांत शिंदे, रितेश जैन, एस़ एम़ कुलकर्णी, डॉ़ प्रवीण धाडवे, डॉ़ किरण कमुटाला, नांदापूरकर, रवी पावडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते़