नातेवाईकांचा हस्तक्षेप वाढवतोय गुंता !

By Admin | Updated: February 8, 2015 00:10 IST2015-02-08T00:08:56+5:302015-02-08T00:10:48+5:30

हुतांश जोडप्यामधील कुरबूरीला व्यक्तिमत्त्वातील विसंगती, व्यसन, फसवणूक, एकमेकांवर संशय घेणे आदी बाबी प्रामुख्याने कारणीभूत असल्या तरी अलीकडील काळात

Increasing the interference of relatives! | नातेवाईकांचा हस्तक्षेप वाढवतोय गुंता !

नातेवाईकांचा हस्तक्षेप वाढवतोय गुंता !


हुतांश जोडप्यामधील कुरबूरीला व्यक्तिमत्त्वातील विसंगती, व्यसन, फसवणूक, एकमेकांवर संशय घेणे आदी बाबी प्रामुख्याने कारणीभूत असल्या तरी अलीकडील काळात नवरा आणि बायको या दोघांच्याही आई-वडिलांसह नातेवाईकांचा विवाहितांच्या संसारात गरजेपेक्षा अधिक हस्तक्षेप तर होत नाही ना? याचाही विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. लोकप्रतिष्ठान समुपदेशन केंद्राकडे प्राप्त झालेल्या तक्रारीमध्ये तब्बल ४७ टक्के प्रकरणांत जोडप्यांनी त्यांच्या जोडीदारापेक्षा त्यांच्या आई-वडिल तसेच नातेवाईकांबाबत अधिक आक्षेप नोंदविल्याची आकडेवारी पुढे आली आहे.
विशाल सोनटक्के ल्ल उस्मानाबाद
येथील पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातील लोकप्रतिष्ठान समुपदेश केंद्राकडे २०१४ या वर्षात पीडित विवाहितांची एकूण १०५ प्रकरणे दाखल झाली आहेत. जोडीदाराकडून हुंडा आणि पैशाची मागणी करुन छळ होत असल्याबाबतच्या तक्रारींची संख्या सुमारे २५ टक्के आहे. किराणा मालाच्या पैशापासून ते मुलांचा शैक्षणिक खर्च भागविण्यासाठी, घर, गाडीपासून नौकरी, व्यवसायासाठी एवढेच नव्हे तर अगदी ट्रिपच्या पॅकेजचा खर्च माहेराहून घेवून ये म्हणून त्रास दिला जात असल्याच्या तक्रारींचा यामध्ये समावेश आहे. तर ५६ टक्के तक्रारी या घरगुती हिंसाचाराच्या असून, १९ टक्के तक्रारींची कारणे इतर असल्याचे दिसून येते.
घरात टोचून बोलतात, नवरा अथवा बायको जोडीदाराच्या सौंदर्य, राहणीमानाबाबत दूषणे देतात, सासर-माहेरमध्ये तुलना करतात, याबरोबरच एकमेकांचा संशय, अपत्य न होणे अथवा मुलगी झाल्यामुळे घरगुती छळ होत असल्याचे या ५६ टक्के पिडीतांचे म्हणणे आहे. पती-पत्नीच्या व्यक्तीमत्त्वातील विसंगती, विरोधाभास तसेच राहणीमानामुळे होत असलेल्या त्रासाबाबतच्या ६ टक्के तक्रारी असून, ९ टक्के तक्रारींना जोडप्यांतील एकाचे असलेले विवाहबाह्य संबंध कारणीभूत आहेत. व्यसन आणि संसारात निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे तसेच जोडीदाराच्या संशयी स्वभावामुळे त्रस्त असणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.
पतीच्या व्यसनाला कंटाळून तक्रार केलेल्या महिलांची संख्या २६ टक्के असून, ३५ टक्के जोडप्यांमध्ये संशयी स्वभावामुळे कुरबुर होत असल्याचे ही आकडेवारी सांगते. महत्त्वाचे म्हणजे विवाहित जोडप्यांच्या सर्वाधिक तक्रारी या एकमेकांच्या आई-वडिलासंबंधी आहेत. जोडीदार माझ्यापेक्षा आई-वडिलांचे जास्त ऐकतो. त्यांच्या सांगण्यानुसार निर्णय घेतो. छोट्या छोट्या गोष्टीत आई-वडिलांचा हस्तक्षेप असतो, असे म्हणून विभक्त होण्यापर्यंत गेलेल्या प्रकरणांची संख्या तब्बल ४७ टक्के आहे. नवरा माझ्यापेक्षा आई-वडिल तसेच त्याच्या घरच्यांकडे अधिक लक्ष देतो, त्यांचीच काळजी घेतो, ते सांगतील तसेच वागतो, माझ्याकडे लक्ष देत नाही.
अशी यातील महिला पीडितांची तक्रार असते. तर लग्नानंतर तिच्या आई-वडिलांचा आमच्या संसारात हस्तक्षेप कशाला? दररोज फोन करुन भाजी काय करतेस, इथपासून विचारणा करण्याची आवश्यकता काय? माझ्यापेक्षा, माझ्या कुटुंबापेक्षा ती तिच्या घरच्यांचे जास्त ऐकते, तिकडचेच कौडकौतुक सांगते, मला माझ्या घरच्यापासून तोडायचा प्रयत्न करते. त्यामुळेच अडचणी येत असल्याचे नवरोबांचे म्हणणे असल्याचे या १०५ तक्रारींचा अभ्यास केला असता दिसून येते.
लोकप्रतिष्ठान समुपदेशन केंद्राकडे २०१४ या वर्षात दाम्पत्यांच्या एकमेकांविरोधात १०५ तक्रारी दाखल असून, यातील ६२ प्रकरणांत तडजोड झाली असून, ६ प्रकरणे न्यायालयात गेली आहेत़ ५ प्रकरणांत घटस्फोट झाला आहे. तर ३२ प्रकरणांतील जोडप्यांचे संस्थेच्या वतीने समुपदेशन सुरु आहे. विशेष म्हणजे या १०५ प्रकरणांमध्ये तब्बल ४४ पिडीत हे अनुसूचित जातीतील आहेत. अनुसूचित जमातीतील पिडीतांची संख्या २ असून, इतर मागासवर्गीयांच्या संख्या १९ तर एनटी प्रवर्गातील तक्रारदारांची संख्या २४ असून, इतर तक्रारदारांची २६ प्रकरणे आहेत. अनुसूचित जातीतून आलेल्या बहुतांश प्रकरणातील जोडपी ही कामगार तसेच मजूर वर्गातील असल्याचे या आकडेवारीवरुन स्पष्ट होते. याबाबत या क्षेत्रातील तज्ञांना विचारले असता, खुल्या प्रवर्गातील जोडप्यांमध्येही तंट्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र यातील अनेक पीडित प्रतिष्ठेचा बाऊ करीत समुपदेशन केंद्रापर्यंत पोहोचत नसल्याचे त्यांनी सांगितले.
सामाजिक, आर्थिक परिस्थिती बदलत आहे. तशी भांडणाची कारणेही बदलताना दिसतात. पूर्वी पैशामुळे होणाऱ्या छळाबाबतच्या तक्रारी अधिक असायच्या. अशा तक्रारी कायम असल्या तरी, त्याचे अथवा तिचे आई-वडिल आमच्या संसारात अधिक हस्तक्षेप करतात म्हणून आमच्यात भांडण होते, असे म्हणणाऱ्या जोडप्यांची संख्या वाढत आहे. अनेक जोडप्यांच्या भांडणाला ‘मोबाईल’ही कारणीभूत ठरत असल्याचे दिसते.
- कोमल धनवडे,
समुदेशक, लोकप्रतिष्ठान सामाजिक संस्था, उस्मानाबाद

Web Title: Increasing the interference of relatives!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.