मिनी ‘लाॅकडाऊन’मध्ये वाढले लसीकरण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:02 IST2021-04-08T04:02:06+5:302021-04-08T04:02:06+5:30
योगश पायघन औरंगाबाद : जिल्ह्यात दररोज हजार ते २ हजार होणारे लसीकरणाचा टक्का गेल्या आठवड्याच्या अखेरीस वाढायला सुरुवात झाली. ...

मिनी ‘लाॅकडाऊन’मध्ये वाढले लसीकरण !
योगश पायघन
औरंगाबाद : जिल्ह्यात दररोज हजार ते २ हजार होणारे लसीकरणाचा टक्का गेल्या आठवड्याच्या अखेरीस वाढायला सुरुवात झाली. गेल्या दोन दिवसांपासून १४ हजार पार लसीकरण दररोज होत असून आतापर्यंत सुरू झालेल्या चार वर्गातील सुमारे १३ लाख नागरिकांचे लसीकरण एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आरोग्य विभागाचे उद्दिष्ट आहे.
जिल्ह्यात ग्रामीण भागात ३ खासगी तर ७० शासकीय, शहरात ५५ महापालिकेचे तर २२ खासगी केंद्रांच्या माध्यमातून लसीकरण सुरू आहे. शहरात सध्या लसीकरणाची मोठी मोहीम मनपाने हाती घेतल्याने लसीकरणाचे प्रमाण लक्षणीय वाढली आहे तर ग्रामीण भागात तालुका संपर्क अधिकारी, गटविकास अधिकारी आणि लोकप्रतिनिधींसह, दक्षता समितीच्या मदतीने प्रत्येक गावात, आरोग्य केंद्रांसह उपकेंद्रांवरही लसीकरण, गावनिहाय लसीकरणाचे नियोजन झाले आहे. त्यामुळे दिवसाकाठी १४ हजारांपेक्षा अधिक लसीकरण जिल्ह्यात दररोज व्हायला सुरुवात झाली असून ही संख्या पुढील काळात आणखी वाढणार असल्याचे आरोग्य विभगाकडून सांगण्यात आले.
--
आतापर्यंत जिल्ह्यात झालेले लसीकरण
--
हेल्थकेअर वर्कर - ३८,८८०
फ्रंटलाईन वर्कर - ४३,६५७
ज्येष्ठ नागरिक - ६५,४६४
४५ वर्षांपुढील व्यक्ती - ९३,७१२
----
२९ मार्च - १,१९७
३० मार्च - २,५८४
३१ मार्च - ४,२१२
१ एप्रिल - ७,७८३
२ एप्रिल - ९,४०९
३ एप्रिल - १२,२१२
४ एप्रिल - ५,४८९
५ एप्रिल - १४,१२५
६ एप्रिल - १४,०१४
---
लसीकरण करून घेतलेले नागरिक म्हणतात....
---
शनिवारी पूर्ण लाॅकडाऊन होते. त्यादिवशी लसीकरणानिमीत्त बाहेर पडलो. पोलिसांनी विचारले, लसीकरणाला जातोय. म्हटल्यावर लसीचे दोन्ही डोस घ्या, इतरांनाही लस घ्यायला सांगा, असेही ते म्हणाले. कुठलाही त्रास लस घेतल्यावर झाला नाही. लसीकरणावेळी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करतोय.
-विठ्ठल पंडित
---
लस घेतल्यावर ताप अंगदुखी असते म्हणून रविवारच्या सुटीच्या एक दिवस अगोदर शनिवारी लस घेतली. मात्र, कुणीही फार त्रास जाणवला नाही. रस्त्यातही कुणी अडविले नाही; पण जाण्यापूर्वी भीती होती. पोलिसांनी अडवले तर काय करणार. पण काही अडचण आली नाही
-सचिन जावळे
-
आरोग्य कर्मचारी, दक्षता समितीच्या सदस्यांनी बोलावून लस घ्यायला लावली. अगोदर घाबरत होते आता घेऊन टाकली एकदाची लस. असेही सध्या काही काम सुरू नाही. लस घेताना गावकऱ्यांकडून मान मिळाला. पुन्हा लसीचा दुसरा डोस घ्यायला बोलावले आहे. तोही डोस घेईन.
-रुख्मणबाई गोसावी
---
लसीकरण वाढतेय.....
---
दररोज सरासरी ८ ते १० हजार लसीकरण होत आहे. गावनिहाय १०० टक्के लसीकरण करण्याची तयारी दक्षता समितीच्या मदतीने केली आहे. आतापर्यंत मिळालेल्या लसीकरणाच्या मात्रांनुसारच लसींचा पुरवठा पुढेही सुरळीत राहिल्यास उद्दिष्टपूर्ती साध्य होईल. लाॅकडाऊन असले तरी लसीकरणासाठी मुभा मिळाल्याने पोलीसही अटकाव करत नाही. त्यामुळे नागरिक लसीकरणासाठी येत आहे.
-विजयकुमार वाघ, जिल्हा लसीकरण अधिकारी
---