दशकानंतर ऊसक्षेत्रात वाढ

By Admin | Updated: December 31, 2016 22:08 IST2016-12-31T22:07:19+5:302016-12-31T22:08:13+5:30

बीड मुबलक पावसामुळे दुष्काळी जिल्ह्यात ऊसाची लागवड सरासरीपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे.

Increase in sugarcane after decade | दशकानंतर ऊसक्षेत्रात वाढ

दशकानंतर ऊसक्षेत्रात वाढ

राजेश खराडे बीड
मुबलक पावसामुळे दुष्काळी जिल्ह्यात ऊसाची लागवड सरासरीपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. अद्यापपर्यंत १५ हजार हेक्टरवर ऊसाची लागवड झालेली असून, फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत ३४ हजार हेक्टर एवढ्या सरासरी क्षेत्रावर लागवड होणार आहे. त्यानुषंगाने शेतकऱ्यांची बेण्यासाठी धावपळ सुरू आहे.
२००६ मध्ये अतिवृष्टी झाली होती. यावर्षी सुमारे ५४ हजार हेक्टरवर ऊसाची लागवड झाली असल्याची नोंद कृषी कार्यालयात आहे. मात्र, त्यानंतर सलग १० वर्षे जिल्ह्याच्या नशिबी दुष्काळी परिस्थिती ओढावल्याने ऊस लागवडीचे प्रमाण घटले होते. परिणामी खरीप - रबीच्या क्षेत्रामध्ये वाढ झाली होती.
यंदा अतिवृष्टीमुळे खरिपाचे नुकसान झाले असले तरी रबी हंगामापासून पीक पद्धतीत शेतकऱ्यांनी बदली केला आहे. रबीतही पाच वर्षानंतर गव्हाच्या क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढ झाली आहे, तर आता ऊस लागवडीची लगबग सुरू आहे. सर्वसाधारण क्षेत्र ३४ हजार हेक्टर असले तरी ५० हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
माजलगाव, गेवराई, परळी, धारूर, वडवणी या तालुक्यामध्ये ऊसाची अधिक लागवड केली जात आहे. केवळ ऊसावरच भर न देता उत्पादन वाढीच्या दृष्टीने आंतरपीक म्हणून कांदा व बटाटा तसेच भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जात आहे.
खऱ्या अर्थाने जानेवारी, फेब्रुवारीमध्ये लागवडीचा जोर वाढणार आहे. अद्यापपर्यंत तीन ते चार हजार टनाप्रमाणे बेण्याची खरेदी करून २६५, १०००, ८००५, ८६०३२ या बेण्यांची लागवड केली जात आहे. माजलगाव, परळी तालुक्यातील ऊसाच्या क्षेत्राला माजलगाव धरणाचा मुबलक पाणीसाठा आहे. गेवराईकरिता जायकवाडी धरण, तर धारूरकरिता कुंडलिका धरणाचा आधार मिळणार आहे. मुबलक पाणीसाठा असल्याने शेतकऱ्यांचे लक्ष केवळ उत्पादन वाढीवर आहे. सध्याच्या पाणीसाठ्यामुळे जूनपर्यंतची चिंता मिटली आहे.

Web Title: Increase in sugarcane after decade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.