धान्य तस्करीचे गुढ वाढले; टोळीची शक्यता
By Admin | Updated: August 25, 2014 01:36 IST2014-08-25T00:29:25+5:302014-08-25T01:36:23+5:30
रवी गात ल, अंबड तालुक्यातील धान्य तस्करीचे गुढ दिवसेंदिवस वाढत चालले असून १४ आॅगस्ट रोजी काळ्या बाजारात जाणारा ९० क्विंटल तांदूळ पोलिसांनी पकडला

धान्य तस्करीचे गुढ वाढले; टोळीची शक्यता
रवी गात ल, अंबड
तालुक्यातील धान्य तस्करीचे गुढ दिवसेंदिवस वाढत चालले असून १४ आॅगस्ट रोजी काळ्या बाजारात जाणारा ९० क्विंटल तांदूळ पोलिसांनी पकडला. मात्र यातील मुख्य आरोपी पोलिसांच्या तावडीतून निसटला. धान्य तस्करीसंदर्भात आंतरराज्य टोळी कार्यरत असण्याची शक्यता आहे. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी ताब्यात येईपर्यंत या टोळीचा पर्दाफाश होणार नाही, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
अंबड तालुक्यात १११ ग्रामपंचायती अंतर्गत एकूण १३८ गावांचा समावेश होतो. तालुक्यासाठी एकूण १९४ रेशन दुकानांच्या माध्यमातून स्वस्त धान्याचे वाटप करण्यात येते. अनेक गावांमधील नागरिकांच्या धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी नेहमीच्या आहेत. प्रशासनातील काही अधिकारी-कर्मचारी, तालुक्यातील काही मोजके स्वस्त धान्य दुकानदार व धान्य माफिया यांच्या अभद्र युतीने सामान्य नागरिकांच्या हक्काच्या धान्याचा काळया बाजाराचा उच्छाद मांडला आहे. धान्याच्या काळया बाजाराविषयी ‘लोकमत’ ने वेळोवेळी वृत्त प्रसिध्द केले.
१४ आॅगस्ट रोजी खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत देशमुख व पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या पथकाने एका ट्रकमध्ये भरुन काळयाबाजारात जात असलेला ९० क्विटंल तांदूळ जप्त केला. धान्य तस्करी करणारांची तालुक्यात टोळी कार्यरत असण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे ही टोळी केवळ काही जिल्हयापुरती मर्यादित नसून ती आंतरराज्य टोळीचा एक भाग असल्याचे सांगण्यात येत आहे. पुरवठा विभाग, दक्षता पथक, स्थानिक गुन्हे शाखा, वाहतुक शाखा अशा विविध विभागांचा धान्य तस्करीच्या विरोधात खडा पहारा असतानाही तालुक्यात एवढया मोठया प्रमाणावर धान्य तस्करी कशी काय सुरु राहू शकते हे एक कोडेच आहे.
या सर्व प्रश्नांची उत्तरे मुख्य आरोपी बबन चौधरी यास अटक झाल्यानंतर मिळण्याची शक्यता आहे. याविषयी तपास अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरु असुन फरार आरोपी चौधरी याचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील हा तांदूळ धान्य माफियांमार्फत पोहोचला कसा, जप्त केलेला तांदुळ नेमका कोठे चालला होता, पाचोड, पैठण तसेच वडीगोद्री, गेवराई, पाडळसिंगी मार्गे स्वस्त धान्याचा काळाबाजार करणारा धान्य माफिया कोण ? स्वस्त धान्याचा काळा बाजार करण्यासाठी प्रशासनातील कोणकोणत्या कर्मचारी-अधिकाऱ्यांची साथ आहे? पकडण्यात आलेले धान्य नेमके कोठून आले होते व कोठे पाठविण्यात येत होते? गोदामातून धान्य बाहेर काढून तस्करांपर्यंत पोहचविण्यासाठी कोणत्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मदत केली? पकडण्यात आलेले धान्य कोणकोणत्या स्वस्त धान्य दुकानदारांच्या कोट्यातील आहे? कोणत्या स्वस्त धान्य दुकानदारांची धान्य माफियांना साथ आहे? फरार झालेला आरोपी कोणत्या टोळीसाठी काम करतो? अशा विविध प्रश्नांची उत्तरे फरार मुख्य आरोपी बबन मुरलीधर चौधरी पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर उघड होण्याची शक्यता आहे.