तुळजाभवानीच्या उत्पन्नात वाढ !
By Admin | Updated: June 8, 2014 00:55 IST2014-06-08T00:27:59+5:302014-06-08T00:55:41+5:30
उस्मानाबाद : तुळजापूर येथील श्री तुळजा भवानी मंदिर संस्थानच्या उत्पन्नात यंदाच्या वर्षी घसघशीत वाढ झाली आहे.

तुळजाभवानीच्या उत्पन्नात वाढ !
उस्मानाबाद : तुळजापूर येथील श्री तुळजा भवानी मंदिर संस्थानच्या उत्पन्नात यंदाच्या वर्षी घसघशीत वाढ झाली आहे. देणगी स्वरुपात मिळणाऱ्या उत्पन्नाच्या रकमेबरोबरच लिलावाच्या माध्यमातूनही मोठा निधी मिळाल्याने संस्थानचे उत्पन्न वाढल्याचे दिसून येते. वाढत्या निधीबरोबरच भाविकांसाठी पायाभूत सुविधा अधिक दर्जेदार पुरविण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.
राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या श्री तुळजा भवानी मंदिर संस्थानने मागील काही वर्षात विविध उपक्रम राबविले आहेत. या माध्यमातून भाविकांना सुविधा प्राप्त होत आहेत. याबरोबरच संस्थानच्या उत्पन्नातही भरीव वाढ होत असल्याचे दिसून येते. २०१२-१३ यावर्षी भाड्यापोटी संस्थानला ३४०१० रुपये मिळाले होते. यंदा ही रक्कम ३ लाख २७ हजार ७७५ वर गेली आहे. देणगी स्वरुपात मिळणाऱ्या उत्पन्नाच्या रकमेतही यंदा १३ लाख २९ हजार ५७५ रुपयाची वाढ झाली तर लिलाव बाबीच्या स्वरुपात मिळणाऱ्या उत्पन्नाच्या रकमेतही ३७ लाख ३८ हजार १११ रुपयाने वाढ झाली आहे. यामध्ये नारळ, खजूर यासह घाटशीळ, होमशाळा, चिंतामणी, येमाई, गणेश मंदिर, दत्त मंदिर, पापनाश तीर्थ क्लॉक रुम, वाहिक वस्त्र लिलाव, विश्रामधामसह दुकानांच्या उत्पन्नाचा समावेश आहे.
वाहिक वस्त्र, चिरडी, महावस्त्र, खण, प्लॉस्टिक खण, अन्नधान्य, पशु-पक्षी लिलाव, समई, फोटो विक्री तसेच इतर साहित्याच्या विक्रीतही यंदा भरीव वाढ झाल्याचे दिसते. २०१२-१३ मध्ये ९८ लाख १४ हजार ८३० रुपये या माध्यमातून मिळाले होते. यात यंदा २ लाख १२ हजार ८२९ रुपयाने वाढ झाली आहे. याबरोबरच इतर उत्पन्नही १२ लाख ३५ हजार ७१४ रुपयाने वाढले आहे. मंदिर संस्थानचे उत्पन्न वाढत असतानाच मिळणाऱ्या सुविधाही वाढवून देण्याची आवश्यकता आता भाविकांतून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
एकूण उत्पन्नात घट
श्री तुळजा भवानी मंदिर संस्थानचे उत्पन्न विविध मार्गाने वाढले असले तरी संस्थानच्या एकूण उत्पन्नात मात्र यंदा घट झाली आहे. २०१२-१३ या वर्षी मुदत ठेवींच्या रकमांची परिपक्वता जास्त झाल्यामुळे २०१३-१४ च्या तुलनेत सन २०१२-१३ या वर्षी संस्थानला २० कोटी ५६ लाख ४ हजार ७९८ रुपये व्याज कमी मिळाले आहे. त्यामुळे २०१३-१४ च्या तुलनेत यंदाच्या वर्षी एकूण आर्थिक उत्पन्न कमी झाल्याचे मंदिर संस्थानच्या सूत्रांनी सांगितले.