धरणातील पाणीसाठ्यात वाढ
By Admin | Updated: September 10, 2014 00:00 IST2014-09-09T23:41:34+5:302014-09-10T00:00:36+5:30
परभणी : जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे आगामी काळातील पाण्याची चिंता काहीअंशी कमी झाली आहे.

धरणातील पाणीसाठ्यात वाढ
परभणी : जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे आगामी काळातील पाण्याची चिंता काहीअंशी कमी झाली आहे.
या पावसाळी हंगामात जिल्ह्यात संकटाची स्थिती निर्माण झाली होती. दोन - अडीच महिने विनापावसाचे गेल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळस्थिती निर्माण झाली. पाण्याचा मोठा प्रश्न उभा टाकला. त्याचबरोबर जनावरांच्या चाऱ्याचीही समस्या निर्माण झाली होती. ही परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असल्याने राज्य शासनाने टंचाईग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर केली. त्यात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश झाला. दडी मारुन बसलेल्या पावसाने आॅगस्टच्या शेवटच्या टप्प्यात आगमन केले. त्यामुळे हळूहळू नागरिकांना दिलासा मिळत गेला. खरीप हंगामातील पिके धोक्यात असतानाच या पावसाने जीवदान दिले आहे. त्यामुळे शेतकरी समाधानी झाला आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या पावसाने धरणाच्या पाणीपातळीत अल्पशी वाढ झाली आहे. येलदरी धरणात खडकपूर्णा धरणातून पाण्याची आवक होत असल्याने या धरणाची पाणीपातळी वाढत आहे. सध्या या धरणामध्ये ५६ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. सेलू तालुक्यातील निम्नदुधना प्रकल्पातही बऱ्यापैकी पाणीसाठा झाला असून ७५ टक्के पाणी या धरणात उपलब्ध आहे. गंगाखेड तालुक्यात मासोळी मध्यम प्रकल्प असून या प्रकल्पामध्ये सध्या ७.१४ दलघमी पाणी उपलब्ध आहे. २७.३३ दलघमी या प्रकल्पाची क्षमता असून २७ टक्के पाणी उपलब्ध झाले आहे. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस झालेल्या पावसामुळे या प्रकल्पात दोन टक्क्यांनी पाणीसाठा वाढला आहे. (प्रतिनिधी)
४४ टक्के पाऊस
जिल्ह्यात आजपर्यंत सरासरीच्या ४४ टक्के पाऊस झाला आहे. हा पाऊस समाधानकारक नसला तरी पाण्याचे संकट निवारणारा ठरला आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७७४ मि.मी. असून आतापर्यंत ३३७.०६ मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात पाथरी तालुक्यात सर्वाधिक ४२१.४४ मि.मी. पाऊस झाला आहे. तर पालम तालुक्यात सर्वात कमी २३८ मि.मी.पाऊस झाला. रविवारी जिल्हाभर पावसाची संततधार होती. या दिवशी जिल्ह्यात १४.९७ मि.मी. पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस जिंतूर तालुक्यात ३०.८३ मि.मी. पाऊस एवढा झाला.
येलदरीच्या पाणीसाठ्यात वाढ
येलदरी- बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणाचे १९ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून ९ सप्टेंबर रोजी सायंकाळपर्यंत येलदरी जलाशयात ५६ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. पूर्णा नदी दुथडी भरुन वाहत असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ अपेक्षित आहे.
पोळ्याच्या दिवशी येलदरी परिसरात तब्बल १३१ मि.मी. पाऊस झाला आणि नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या. १ सप्टेंबरपासून धरण परिसरासह पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे. धरणाच्या नियंत्रण कक्षातून मिळालेल्या माहितीनुसार १ सप्टेंबर रोजी या धरणात ३४६ दलघमी म्हणजे ४२ टक्के पाणीसाठा होता. मात्र खडकपूर्णा धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे सध्या ४४८ दलघमी (५६ टक्के) पाणी उपलब्ध झाले आहे.
धरण परिसरात आजपर्यंत ५७३ मि.मी.पाऊस झाला. गतवर्षी याच तारखेला ९०५ मि.मी. पाऊस झाला होता. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत अजूनही पावसाची अपेक्षा आहे. येलदरी धरणावरुन परभणी, नांदेड, हिंगोली या तीन जिल्ह्यांतील शेकडो गावांचा पाणीपुरवठा होतो. धरण भरत असल्याने या गावातील पाणीप्रश्न सुटणार आहे.