Income tax Raid: औरंगाबादेत शिवसेना नेत्याशी संबंधित व्यापाऱ्यावर आयकर विभागाची छापेमारी
By प्रशांत तेलवाडकर | Updated: September 7, 2022 13:33 IST2022-09-07T13:33:34+5:302022-09-07T13:33:58+5:30
Income tax Raid in Aurangabad: शहरात व्यापाऱ्याचे निवासस्थान आणि इतर तीन ठिकाणी पहाटे आयकर विभागाने छापा टाकला आहे

Income tax Raid: औरंगाबादेत शिवसेना नेत्याशी संबंधित व्यापाऱ्यावर आयकर विभागाची छापेमारी
औरंगाबाद: शहरात आज पहाटे आयकर विभागाने चार ठिकाणी धाडी टाकल्याने एकच खडबड उडाली आहे. ज्योतीनगर येथील एका बड्या व्यापाऱ्याच्या घरावर पुणे येथील आयकर विभागाचे पथक पहाटेच धडकले. येथे अधिकाऱ्यांनी झाडाझडती सुरू केली आहे. दरम्यान, हा व्यापारी शहरातील बड्या शिवसेना नेत्याचा नातेवाईक असल्याची माहिती आहे. (Income tax department)
पहाटे चार वाजेपासून या ठिकाणी झडती सुरू आहे. सतीश व्यास असे धाड पडलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. ज्योती नगर येथील त्यांच्या निवास्थानी आयकर विभागाचे पथक कागदपत्रांची तपासणी करत आहे. हा व्यापारी शहरातील शिवसेनेच्या एका बड्या नेत्याचा नातेवाईक असल्याची माहिती आहे. व्यास यांचे निवास्थान आणि इतर तीन ठिकाणी आयकरच्या पथकाने धाड टाकल्याचे समजत आहे.
देशभरात सुरु आहे छापेमारी
देशभरात विविध ठिकाणी आयकर विभागाची कारवाई सुरु आहे. आज राजकीय फंडिंग प्रकरणी आयकर विभागाकडून देशभरात 50 हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्लीपासून उत्तराखंड आणि राजस्थानसारख्या राज्यांमध्ये आयकर विभागाची पथके पोहोचली आहेत. तसेच बंगळुरूमध्ये २० हून अधिक ठिकाणी आणि मुंबईतही ४ ते ५ ठिकाणी आयकर विभागाकडून झाडाझडती सुरु असल्याची माहिती आहे.