सेंद्रीय शेतीतून मिळविले लाखोंचे उत्पन्न

By Admin | Updated: December 16, 2015 23:33 IST2015-12-16T23:27:36+5:302015-12-16T23:33:46+5:30

मोहन बारहाते, मानवत कोल्हावाडी येथील दिगंबर भिसे या शेतकऱ्याने सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून लाखोंचे उत्पन्न घेत शेतकऱ्यांना मानसिक बळ व प्रेरणा देण्याचे काम केले आहे़

The income generated by organic farming | सेंद्रीय शेतीतून मिळविले लाखोंचे उत्पन्न

सेंद्रीय शेतीतून मिळविले लाखोंचे उत्पन्न

मोहन बारहाते, मानवत
सततचा दुष्काळ त्यामुळे जमिनीतील खोल गेलेली पाणी पातळी, रासायनिक खते आणि किटक नाशकांमुळे कमी झालेली उत्पादन क्षमता यावर मात करीत कोल्हावाडी येथील दिगंबर भिसे या शेतकऱ्याने सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून लाखोंचे उत्पन्न घेत शेतकऱ्यांना मानसिक बळ व प्रेरणा देण्याचे काम केले आहे़
कोल्हावाडी येथील दिगंबर भिसे यांनी २०१४ मध्ये जी-९ या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ऊतीसंवर्धित केळीची दोन एकरात लागवड केली़ ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था केली़ केळीला कुठलाही रासायनिक खत न वापरता केवळ शेणखताचा वापर केला़ परिणामी या पिकास चांगले उत्पादन झाले़ दोन एकरात ६०० क्विंटल केळीचे उत्पादन झाले़ तर केळीला ८०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला़ या तून खर्च वजा जाता त्यांना ३ लाख ५० हजार रुपयांचा नफा मिळाला़ यावर्षी त्यांनी पीलबाग राखून ठेवला़ त्यातील ५० टक्के झाडांची वेन झाली आहे़ त्याच्याच बाजुला दोन एकर क्षेत्रफळावर कोबीची लागवड केली असून, कोबीचा एक गड्डा दोन किलो वजनाचा असून, या गड्डयाला परभणी येथील बाजारपेठेत २५ रुपये किलोचा भाव मिळत आहे़ या पिकातूनही त्यांना अडीच लाख रुपयांचे उत्पादन होण्याची अपेक्षा आहे़ याशिवाय त्यांनी टोमॅटोचीही लागवड केली आहे़ ठिबक सिंचनाचा वापर करून कमी पाण्यात जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे़ शेतकरी दिगंबर भिसे यांनी शेतीला सेंद्रीय खत मिळावे, यासाठी जाफर जातीच्या सहा म्हशी धुळे येथून खरेदी केल्या आहेत़ भिसे यांच्याकडे १५ जनावरे आहेत़
तंत्रज्ञान व प्रयत्नांची जोड आवश्यक
निसर्गाच्या लहरीपणाला तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांनी केवळ नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून चालणार नाही़ बदलत्या परिस्थितीत पिकातही बदल करावा लागणार आहे़ या शिवाय उपलब्ध साधनसामुग्री, पाणी व जोड धंदा स्वीकारल्यास शेतीतूनही चांगले उत्पादन काढता येते़ यासाठी तंत्रज्ञानाला प्रयत्नाची जोड आवश्यक आहे़
-दिगंबर भिसे,कोल्हावाडी

Web Title: The income generated by organic farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.