पीआर कार्ड देण्यास अडवणूक
By Admin | Updated: July 22, 2014 00:17 IST2014-07-21T23:42:18+5:302014-07-22T00:17:53+5:30
संजय कुलकर्णी , जालना येथील तालुका नगरभूमापन कार्यालयात रितसर अर्ज करून पीआर कार्ड (आखीव पत्रिका) देण्याची मागणी केल्यानंतरही ते देण्यास टाळाटाळ होत असल्याचा प्रकार ‘लोकमत’ ने सोमवारी उघडकीस आणला.

पीआर कार्ड देण्यास अडवणूक
संजय कुलकर्णी , जालना
येथील तालुका नगरभूमापन कार्यालयात रितसर अर्ज करून पीआर कार्ड (आखीव पत्रिका) देण्याची मागणी केल्यानंतरही ते देण्यास टाळाटाळ होत असल्याचा प्रकार ‘लोकमत’ ने सोमवारी उघडकीस आणला.
शहरातील कुठल्याही जागेचे, घराचे पीआरकार्ड मिळविण्यासाठी नागरिकांना प्रशासकीय इमारतीच्या आवारातील सेतू सुविधा केंद्रात अर्ज करावा लागतो. त्यासाठी २२ रुपये ५० पैसे शुल्क व अर्जाचे १० रुपये भरल्यानंतर पीआरकार्ड केव्हा मिळणार, याच्या तारखेसह पावती दिली जाते. सर्वसाधारणपणे तीन-चार दिवसांचा कालावधीची मुदत पीआरकार्ड देण्यासाठी घेतली जाते. चार दिवसानंतर परत सेतू सुविधा केंद्रात पीआरकार्ड च्या मागणीसाठी गेल्यानंतर ‘पीआरकार्ड येथे मिळत नाही, त्यासाठी नगरभूमापन कार्यालयात जा’ असे उत्तर या केंद्रातून देण्यात येते.
१७ जुलै रोजी पीआरकार्ड मिळण्यासाठी सेतू केंद्रात अर्ज केल्यानंतर २१ तारखेला ते मिळेल, अशी पावती देण्यात आली. मात्र २१ जुलै रोजी या केंद्रात गेल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी वरीलप्रमाणे उत्तर दिले. त्यामुळे तालुका नगर भूमापन कार्यालयात गेल्यानंतर नगर भूमापक तेथे उपस्थित नव्हते. अन्य एका कर्मचाऱ्यास विचारणा केली असता, त्यांनी शेजारील कॅबीनकडे बोट दाखवून ‘तेथे मिळेल’ असे सांगितले. कॅबीनमधील कर्मचारी पीआरकार्ड देण्याचे काम करत होते.त्यांना याबाबत विचारणा केली असता, त्यांनी नंतर या, असे सांगितले. त्याचवेळी तेथील एका दलालांकडून १००-२०० रुपये द्या, पीआरकार्ड घेऊन जा, असे सांगण्यात आले.
सुमारे १५-२० मिनिटांच्या अंतराने तेथे गेल्यानंतर संबंधित कर्मचारीही तेथे हजर नव्हते. याविषयी विचारणा केल्यानंतर लाईट नाही, संबंधित कर्मचाऱ्याची प्रकृती ठीक नाही, अशी उत्तरे देऊन टाळाटाळ करण्याचा प्रयत्न झाला.
सदर प्रकाराची चौकशी करणार - नायक
याबाबत जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांची भेट घेऊन त्यांना हा प्रकार लक्षात आणून दिला. त्यावर त्यांनी याबाबत चौकशी करू, असे सांगितले. सेतू सुविधा केंद्रावर नियंत्रण ठेवणाऱ्या विभागाशीही संपर्क साधला असता, त्यांनी लेखी तक्रार देण्याचे सुचविले.
सेतू सुविधा केंद्राद्वारे अर्ज करून पीआरकार्डची मागणी केल्यानंतर ते याच केंद्रात मिळत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून पीआरकार्डची मागणी सेतू केंद्रात व ते मिळविण्यासाठी प्रत्यक्ष नगर भूमापन कार्यालयात जावे लागते. तेथे नागरिकांकडून पैसे उकळण्याचा प्रकार होतो, अशा तक्रारीही काही जणांनी केल्या.