बंबाटनगर, एशियाड काॅलनीत घरे बांधली चांगली, पण रस्तेच नाहीत; जलवाहिनी, ड्रेनेजलाइन दूरच

By साहेबराव हिवराळे | Published: March 28, 2024 12:16 PM2024-03-28T12:16:52+5:302024-03-28T12:19:11+5:30

एक दिवस, एक वसाहत: या वसाहती विकासापासून कोसो दूर असल्याची खंत रहिवाशांतून व्यक्त होत आहे.

In Bambatnagar, Asiad Colony, houses are well built, but there are no roads; water lines, drainage lines are far away | बंबाटनगर, एशियाड काॅलनीत घरे बांधली चांगली, पण रस्तेच नाहीत; जलवाहिनी, ड्रेनेजलाइन दूरच

बंबाटनगर, एशियाड काॅलनीत घरे बांधली चांगली, पण रस्तेच नाहीत; जलवाहिनी, ड्रेनेजलाइन दूरच

छत्रपती संभाजीनगर : बीड बायपासच्या बाजूला बंबाटनगर, एशियाड कॉलनीत रहिवाशांना स्वत:चे घर गाठणे म्हणजे मोठे कठीण काम वाटते. पावसाळ्यात चिखलातील टायरची नक्षी आजही पावसाळ्यातील कसरत दर्शवते. येथे हक्काचे छान घर पाहिजे म्हणून रहिवाशांनी सुंदर घरे बांधली; परंतु चार पाहुणे घरी बोलावणे म्हणजे रहिवाशांना अडचण वाटते. उन्हाळा आणि हिवाळ्यात टँकरच्या पाण्याशिवाय पर्याय नाही. शहरात होत असलेल्या जलवाहिनीचे पाइपदेखील या परिसरात आलेले आहेत; परंतु ते अद्याप टाकलेले नाहीत. या वसाहती विकासापासून कोसो दूर असल्याची खंत रहिवाशांतून व्यक्त होत आहे.

आजारी व्यक्तीला बायपासपर्यंत उचलून न्यावे लागते
उन्हाळा व हिवाळा किमान आडवळणी रस्त्याने बायपासला किंवा शहरात जाता येते; परंतु पावसाळ्यात आतील भागात रिक्षा येत नाहीत. रुग्णवाहिकादेखील चिखलात रुतते, येण्यास चालक नकार देतो. मग रुग्णांंना एक- दीड किलोमीटर पाठीवर उचलून न्यावे लागते.
-मुकुंद वाकळे, रहिवासी

कचरा जाळून वायू प्रदूषण
काॅलनीत प्रवेशापूर्वीच अस्वच्छतेसोबत दुर्गंधीने स्वागत होते. रस्त्याचा कचरा डेपो केला असून, त्याकडे लक्ष दिले जात नाही. रस्त्यावर कचरा जाळून वायू प्रदूषण केले जाते.
-बाबूराव भगत

ड्रेनेजलाइन टाकण्याची गरज
या भागात राहणाऱ्या नागरिकांना घरासमोर हातपंप आणि परिसरात सेफ्टी टँक बसवावे लागतात. सांडपाण्यासाठी शौचखड्डेही तयार केले जातात. परंतु सेफ्टी टँक भरला की मनपाची गाडी बोलावून तो साफ करावा लागतो. अनेकदा गाडी येत नसल्याने खासगी वाहने बोलवावी लागतात. कॉलनीत ड्रेनेजलाइन टाकण्याची गरज आहे.
- सुनील निकाळजे, रहिवासी

जलवाहिनी टाकावी
जलकुंभाचे भूमिपूजन करण्यात आले. पण काम अद्यापही सुरू नाही. पाण्याचे पाइप आणून टाकलेले आहेत. जलवाहिनी टाकून महानगरपालिकेचे पाणी नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे.
- प्रभाकर बनसोडे, रहिवासी

कर घेता; विकास कधी? 
बंबाटनगर, एशियाड काॅलनीतील नागरिक महानगरपालिकेकडे कर भरतात. त्या तुलनेत कोणत्याही सुविधा देण्यात येत नाहीत. कचरा उचलण्यासाठी घंटागाड्यादेखील घरापर्यंत येत नाहीत. रस्ते, पाणी, ड्रेनेजलाइन या मूलभूत सेवासुविधा मनपाने उपलब्ध करून देण्याची मागणी आहे.
- राहुल भद्रे, रहिवासी

Web Title: In Bambatnagar, Asiad Colony, houses are well built, but there are no roads; water lines, drainage lines are far away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.