सोयाबीनवर चक्रीभूंग्याचा प्रादुर्भाव
By Admin | Updated: August 23, 2014 00:46 IST2014-08-22T23:47:24+5:302014-08-23T00:46:03+5:30
परभणी : जिल्ह्यात सोयाबीन पिकाला किडीने घेरले आहे. चक्रीभूंगा आणि खोडमाशीचा प्रादूर्भाव वाढला आहे.

सोयाबीनवर चक्रीभूंग्याचा प्रादुर्भाव
परभणी : जिल्ह्यात सोयाबीन पिकाला किडीने घेरले आहे. चक्रीभूंगा आणि खोडमाशीचा प्रादूर्भाव वाढला आहे.
यावर्षी जिल्ह्यात पिकांची परिस्थिती नाजूक आहे. दोन महिने उलटल्यानंतरही पाऊस समाधानकारक झाला नाही. शेतकऱ्यांना दोन, काही ठिकाणी तीनवेळा पेरणी करावी लागली. पेरलेले कसेबसे जगविण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या जिल्ह्यात सोयाबीन आणि कापूस या दोन मुख्य पिकांवर शेतकऱ्यांची भिस्त आहे. पाऊस नसल्याने पिकांची वाढ मंद गतीने होत आहे. त्यातच रोगाचा प्रादूर्भाव झाला असल्याने पिके धोक्यात आली आहेत.
सोयाबीन पिकावर सध्या चक्रीभूंगा आणि खोडमाशीचा प्रादूर्भाव दिसत आहे. या किडींनी अंडी घालू नयेत म्हणून सुरुवातीला ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी, प्रादूर्भाव दिसू लागल्यास प्रादूर्भावग्रस्त फांद्या व खोड आतील अळीसह नष्ट करावे.
पिकाचे नियमित सर्व्हेक्षण करुन किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यास पुढील प्रमाणे फवारण्या कराव्यात. ट्रायझोफॉस ४० टक्के २० मि.ली., प्रोफेनोफॉस ५० टक्के २५ मि.ली., इथोफेनप्रॉक्स १० टक्के २० मि.मी. किंवा अॅसीफेट ७५ टक्के १५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावे.
खोड माशीच्या नियंत्रणासाठी वरील कोणत्याही एका कीटकनाशकासह थायोमीथोक्झाम २५ टक्के २-३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. फवारणीसाठी पॉवर स्प्रे असल्यास कीटकनाशकाची मात्रा तिप्पट करावी, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी प्रभाकर माळेगावकर व कीड नियंत्रक कमलाकर सुपेकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
चक्रीभूंगा ही खोड पोखरणारी सोयाबीनवरील मुख्य कीड आहे. पिकांचे ३५ टक्क्यापर्यंतचे नुकसान या किडीमुळे होते. या किडीचा प्रौढ भूंगा व अळी या दोन अवस्था नुकसानकारक असतात. मादी भूंगा पानाचे देठ किंवा खोड यावर दोन समान काचा करते व खालच्या खाचेवर अंडी घालण्यासाठी तीन छिद्र पाडते. खाच केलेला खोडाचा वरचा भाग दोन-तीन दिवसांत सुकण्यास सुरुवात होते व पानाच्या देठावर खाचा केल्यास पान वाळून जाते. अंड्यातून निघालेली अळी पानाचे देठ व खोड पोखरत जमिनीकडे जाते. या किडीच्या प्रादुर्भावामुळे झाडास शेंगा कमी लागतात व उत्पादनात घट होते.
खोड माशी या किडीमुळे सोयाबीनचे १०० टक्के नुकसान होऊ शकते. मादी माशी झाडाच्या वरच्या पानामध्ये अंडी घालते. अंड्यातून बाहेर पडलेली अळी पान पोखरुन शिरेपर्यंत पोहचून शिरेतून पानाच्या देठामध्ये शिरते. त्यानंतर अळी खोडात शिरते. अशा प्रकारे अळी आतील भाग खात जमिनीपर्यंत पोहचते व कोषामध्ये जाते. या किडीच्या प्रादुर्भावामुळे झाडास फुले व शेंगा कमी लागतात. शेंगामध्ये दाणे लहान व सुरकुतलले असतात. तसेच खोड माशीचा प्रादुर्भाव रोपावस्थेत झाल्यावर झाड पूर्णत: वाळून जाते. परिणामी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.