मनपाचे दुर्लक्ष : विसावा उद्यानाचे सौंदर्य हरवले

By Admin | Updated: May 9, 2014 00:30 IST2014-05-09T00:27:34+5:302014-05-09T00:30:06+5:30

भारत दाढेल , नांदेड शहरातील प्रमुख उद्यान असलेल्या माता गुजरीजी विसावा उद्यानाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने या उद्यानाला अवकळा निर्माण झाली आहे़

Ignoring Municipal Corporation: The beauty of the Visawa garden is lost | मनपाचे दुर्लक्ष : विसावा उद्यानाचे सौंदर्य हरवले

मनपाचे दुर्लक्ष : विसावा उद्यानाचे सौंदर्य हरवले

भारत दाढेल , नांदेड महापालिकेने २००८ - ०९ मध्ये लाखो रूपये खर्च करून विकसीत केलेल्या व शहरातील प्रमुख उद्यान असलेल्या माता गुजरीजी विसावा उद्यानाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने या उद्यानाला अवकळा निर्माण झाली आहे़ लहान मुलांच्या खेळण्यासाठी आधुनिक खेळणीचा अभाव असलेले हे उद्यान नागरिकांसाठी रात्रीच्या भोजनाचे स्थळ ठरले आहे़ शहरात जेएनएनयुआरएम व गुरू - त्ता - गद्दी त्रिशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने विविध विकासकामे करण्यात आले़ यामध्ये विसावा उद्यानाच्या सौंदर्यीकरणात भर घालण्यात आली़ ज्युरासिक पार्कचा सेट तयार करून त्यामध्ये वेगवेगळे डॉयनासॉर तयार करण्यात आले़ महाकाय डॉयनॉसारच्या निर्मितीमुळे या उद्यानाची शोभा वाढली़ प्रवेशद्वारापासून तयार केलेले कटडे, आधुनिक प्रकाश योजनेला संगीताची जोड व मानवी चेहर्‍याच्या पुतळ्याच्या बाजुने धो - धो पडणारे पाणी़़़ यामुळे हे दृश्य एखाद्या चित्रपटातील सेटची आठवण करून देणारा होता़ डॉयनासॉरच्या हालचालीमुळे तर लहान मुले अक्षरक्ष: घाबरायचे़ शेजारी असलेल्या उंचावरील झोपड्यातून घसरगुंडीची आनंद घेणारे मुले तसेच छोट्याशा रेल्वे फलाटावरून धावणारी रेल्वे यांची गंमत लहान मुले घेत असे़ मात्र या ज्युरासिक पार्कच्या देखभालीकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आणि अल्पावधीतच हे ज्युरासिक पार्क ओसाड बनले़ यातील डॉयनासॉरच्या पुतळ्यांची मोडतोड होवून त्यांच्या हालचाली बंद झाल्या़ तसेच त्यांचा रंग ही उदास झाला़ कोसळणार्‍या पाण्याचा प्रवाह थांबला़ झुक- झुक धावणारी रेल्वेही मध्ये मध्ये बंद पडते़ अवघ्या तीन, चार वर्षातच या ज्युरासिक पार्कला अवकळा आली़ त्यामुळे नागरिक तसेच बच्चे कंपनीचे आकर्षणही थांबले़ विशेष म्हणजे विसावा उद्यानाच्या प्रवेशद्वारावर ५ रूपयांचे शुल्क देवून प्रवेश मिळविल्यानंतरही ज्युरासिक पार्कसाठी ८, १० रूपये शुल्क आकारले आहे़ आता दोन्ही प्रवेश द्वारावर पैसे देवून ज्युरासिक पार्क पाहण्यासाठी गेलेल्या नागरिकांना उदास झालेल्या डायनासॉरचे पुतळे दिसतात़ विद्युत दिवे बंद सध्या उन्हाळी सुट्यांचा हंगाम असल्यामुळे विसावा उद्यानात दररोज तीन हजारावर नागरिक येत आहेत़ मात्र सायंकाळ होताच उद्यानात बहुतांश भाग अंधारात असतो़ उद्यानातील विद्युत दिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत़ केवळ २० दिवे सुरू असून त्या मंद प्रकाशात लहान मुले खेळतात़ काही विद्युत खांबावरील तारा उघड्यावर पडल्या असून त्यामुळे नागरिकांना शॉक बसल्याचेही सांगण्यात आले़ विसावा उद्यानाच्या शेजारी विस्तारीत उद्यानाचे काम करण्यात येत आहे़ त्यामुळे झाडे- झुडपे काढून टाकण्यात येत आहेत़ तेथील सापांचा वावर विसावा उद्यानात होत असल्याचेही नागरिकांनी सांगितले़ कारंजे बंद उद्यानाच्या उत्तर दिशेला असलेले कारंजे गेल्या अनेक महिन्यापासून बंद आहेत़ वर्तुळाकार असलेल्या हौदात पाणीच नसल्यामुळे कोरड्या हौदाच्या आजुबाजुचे गवत वाळले आहे़ याठिकाणी असलेल्या सिंमेट खुर्च्यावर नागरिक कुरकुरे, आईसक्रीम, वडपाव खावून त्याच ठिकाणी कचरा टाकतात़ उद्यानात कचरा टाकण्याची सोय काही ठिकाणी आहे़ परंतु त्याठिकाणी नागरिक कचरा टाकत नसल्याचे येथील कर्मचार्‍यांनी सांगितले़ जुनीच खेळणी उद्याना लहान मुलांसाठी घसरगुंडी व इतर खेळणी आहे़ परंतु अनेक वर्षापासून तीच खेळणी असल्याने बच्चे कंपनीचा हिरमोड होतो़ तेच तेच खेळणे नको असल्याचे सांगत लहान मुले फुटबॉल खेळण्यात दंग होतात़ आधुनिक खेळण्यांचा अभाव असल्यामुळे लहान मुलांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे़ सुविधांचा अभाव सध्या असलेल्या उद्यानाचीही अवकळा झाली आहे़ याठिकाणी ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांसाठी कोणतीही सुविधा नाही़ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, आसनव्यवस्था, लहान मुलांची खेळणी, प्रकाश योजना, कारंजे या सुविधा नसल्यामुळे नागरिकांचा हिरमोड होत आहे़ उद्यानात स्वच्छता गृहाची व्यवस्था नाही़ उद्यानाच्या एका कोपर्‍यात खाजगी तत्वावर स्वच्छता गृह आहे़ परंतु त्याचा लाभ पैसे देवून मिळतो़ प्रत्येक ठिकाणी पैसे देवून सुविधा मिळावाव्या लागत असल्याने नागरिकांच्या खिशाला चांगलीच चाट बसते़ खेळणी वाढवावीत. शहरातील विसावा उद्यान हे सर्वात मोठे व मध्यवर्ती उद्यान आहे़ उन्हाळ्यात विसावा उद्यानात अबालवृद्धांची गर्दी असते़ मीही सुट्टीच्या दिवशी नातलगांच्या मुलांना घेऊन खेळण्यासाठी येते़ पण काही मोजकीच खेळणी असल्याने मुलांना फार काळ खेळता येत नाही़ महापालिकेने उद्यानात खेळणी वाढविण्याची आवश्यकता आहे़ - अक्षता माकणे विसावा उद्यानत खेळण्यांची अवस्था म्हणावी तेवढी चांगली नाही़ खेळणी खूपच जुनी आहेत़ महापालिकेने ही खेळणी बदलून नवीन खेळणी बसविण्याची आवश्यकता आहे़ त्यासाठी प्रयत्न व्हावेत़ तसेच विद्युत दिवे व पाण्याची व्यवस्था करावी़ उद्यानाच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी़ एवढीच इच्छा आहे़ - शिवाणी चाभरेकर

Web Title: Ignoring Municipal Corporation: The beauty of the Visawa garden is lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.