जांभूळबेट वृक्षलागवडीकडे दुर्लक्ष
By Admin | Updated: June 2, 2014 01:09 IST2014-06-02T01:05:57+5:302014-06-02T01:09:40+5:30
लक्ष्मण दुधाटे, पालम जिल्ह्याच्या वैभवात भर टाकणार्या निसर्गरम्य पर्यटनस्थळ जांभूळबेटात वृक्षलागवड करण्यास मोठा वाव आहे़
जांभूळबेट वृक्षलागवडीकडे दुर्लक्ष
लक्ष्मण दुधाटे, पालम जिल्ह्याच्या वैभवात भर टाकणार्या निसर्गरम्य पर्यटनस्थळ जांभूळबेटात वृक्षलागवड करण्यास मोठा वाव आहे़ परंतु, शासकीय यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याने मागील अनेक वर्षांत या परिसरात एकही नवीन रोपटे लावण्यात आलेले नाही़ यात आता जिल्हाधिकारी एस़ पी़ सिंह यांनी लक्ष देऊन नव्याने वृक्षलागवड करावी, अशी पर्यटकांमधून मागणी होत आहे़ पालम तालुक्यातील जांभूळबेट ही निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे़ गोदावरीच्या पात्रात जवळपास २५ हेक्टर परिसरात हिरव्यागर्द झाडीने हा परिसर नटलेला आहे़ गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे दरवर्षी बेटातील झाडे वाहून जात असल्याने झाडांची संख्या झपाट्याने कमी होत आहे़ निसर्गरम्य पर्यटनस्थळ असूनही शासनाने या बेटाच्या विकास कामासाठी एकही रुपया खर्च केलेला नाही़ या ठिकाणी सद्य:स्थितीत चिंच, जांभूळ, लिंब, गुलमोहर, सुबाभूळ, करंजी, काशीद आदी प्रकारची झाडे आहेत़ झाडांची संख्या विरळ होत असल्याने हे बेट उजाड होण्याच्या मार्गावर आहे़ या बेटाची शासन दप्तरी नोंद नसल्याने वृक्षलागवड मोहिमेस अडथळा निर्माण होत आहे़ मागील वर्षी रोजगार हमी योजनेंतर्गत भारतीय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व आयटीसी यांनी वृक्षलागवडीची सुरुवात केली होती़ परंतु, शासकीय यंत्रणेने फारसा प्रतिसाद न दिल्याने हे काम अर्ध्यावरच सोडण्याची वेळ आली होती़ या परिसराच्या चोहोबाजूंनी बांबूंची लागवड केल्यास पाण्याच्या प्रवाहात वाहून भागाचे संरक्षण होण्यास मदत मिळणार आहे़ शासकीय अधिकारी व कर्मचार्यांनी या बेटाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून वृक्षलागवड सुरू करण्याची मागणी पर्यटकांमधून होत आहे़ तरच जांभूळबेट नामशेष होण्यापासून वाचणार आहे़ (प्रतिनिधी)पालम तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागाचे वृक्षलागवडीचे काम चांगले आहे़ तालुक्यात केवळ याच विभागाची झाडे जिवंत पहावयास मिळत आहेत़ जांभूळबेट ही शासकीय मालमत्ता आहे़ सामाजिक वनीकरणाकडे वृक्ष लागवडीची जबाबदारी दिल्यास चांगले काम होऊ शकते़ जांभूळबेटाची शासकीय दप्तरात नोंद घेऊन वृक्षलागवडीच्या कामाला गती देण्याची गरज आहे़जांभूळबेटाच्या संवर्धनासाठी आयटीसी व भारतीय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मागील वर्षभरापासून प्रयत्न करीत आहे़ या संस्थेने विकासकामासाठी पुढाकार घेतला होता़ शासकीय यंत्रणेकडे फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने ही कामे बंद पडली आहेत़ ही संस्था जांभूळबेटाचा विकास करण्यासाठी इच्छुक आहे़ या संस्थेला शासकीय अधिकारी व कर्मचार्यांनी सहकार्य केल्यास जांभूळबेटाचा चेहरामोहरा बदलण्यास वेळ लागणार नाही़डिग्रस बंधार्याच्या बॅक वाटरमुळे जांभूळबेटाला पाण्याचा वेढा पडलेला आहे़ यामुळे बेटाच्या सौंदर्यात भर पडलेली आहे़ या बेटाच्या विकासासाठी शासकीय यंत्रणेने झपाटून कामाला लागण्याची गरज आहे़ शासकीय यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी यांनी नकारात्मक दृष्टिकोन बाजूला ठेऊन सकारात्मक दृष्टीची गरज आहे, तरच विविध प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल़