वनसंवर्धनाकडे होतेय दुर्लक्ष...
By Admin | Updated: July 23, 2014 00:34 IST2014-07-22T23:48:16+5:302014-07-23T00:34:09+5:30
गंगाराम आढाव , जालना शासनाकडून वृक्ष लागवड व संवर्धनासाठी विविध योजना राबवून दरवर्षी त्यावर कोट्यवधी रूपये खर्च होतो.

वनसंवर्धनाकडे होतेय दुर्लक्ष...
गंगाराम आढाव , जालना
शासनाकडून वृक्ष लागवड व संवर्धनासाठी विविध योजना राबवून दरवर्षी त्यावर कोट्यवधी रूपये खर्च होतो. मात्र खर्च झालेला निधी कितपत कारणी लागला याकडे कोणी लक्षच देत नसल्याने शासनाच्या योजनांतून नुसती उधळपट्टीच होत असल्याचे चित्र जालना जिल्ह्यात निर्माण झालेले आहे.
जालना जिल्ह्यात १० हजार १४० हेक्टर वनक्षेत्र असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यातील हे वनक्षेत्र भौगोलिक क्षेत्राच्या १९ टक्के तर राज्याच्या तुलनेत फक्त ०. १२ टक्के एवढे अत्यल्प आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ८० टक्के भागात हरित पट्ट्याचा अभाव आहे. अशीच परिस्थिती राज्यात आहे. त्यामुळे राज्यात हरिताच्छादन होण्याकरिता महाराष्ट्र शासनाने २०११ मध्ये शतकोटी वृक्षलागवड योजना आणि आता २२ जानेवारी पासून ‘हरित महाराष्ट्र’ ही योजना आणली आहे. वृक्ष लागवड व वृक्षसंवर्धन ही दोन उद्दिष्टे या योजनेत ठेवली आहेत. जिल्ह्यात मागील वर्षी शतकोटी योजनेतंर्गत कृषी विभाग, वन विभाग, जिल्हा परिषद व सामाजिक वनीकरण या विभागाला जिल्ह्यात ३८ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते.
त्यांचे ५५ टक्के उद्दिष्ट पूर्ण झालेले आहे. वृक्ष लागवडीचे दिलेले उद्दिष्टही जिल्ह्यात काही कार्यालयाने पूर्ण केलेले नाही. विशेष म्हणजे मागील वर्षी जिल्ह्यात ८१ रोपवाटीकांमध्ये ३० लाख ६५ हजार ८ वृक्ष रोपे तयार करण्यात आली होती. विविध शाळा, ग्रामपंचायत यांनी वृक्ष लागवड योजनेत सहभाग घेवून वृक्ष लागवड केली.जिल्ह्यात दरवर्षी वृक्ष लावगवडीचे उद्दिष्ट दिले जाते. त्यानुसार खड्डे खोदण्यावर खर्च केला जातो. खड्डे रेकॉर्डवर दाखवण्यात येतात. तसेच वृक्ष लागवडीचा आकडाही दाखवला जातो. मात्र प्रत्यक्षात लागवड केलेल्या वृक्षांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
संवर्धन गरजेचे
सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने विविध वृक्षांचे शाळा महाविद्यालय तसेच ग्रामपंचायत व जिल्ह्यातील रस्त्यावर केले जात आहे. त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. त्यासाठीच संवर्धनासाठी संबंधित शाळांना, महाविद्यालय यांनी लागवड केलेल्या वृक्षांची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात येत असल्याचे सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
उद्दिष्ट जास्त रोपे कमी
वनीकरण विभागाला या वर्षी २ लाख वृक्षांचे उद्दिष्ट देण्यात आले.मात्र बदनापूर तालुक्यातील दुधनवाडी येथील रोपवाटीकेत ३० हजार रोपे व जालना शहरातील मध्यवर्ती रोपवाटीकेत ७५ हजार एवढीच रोपे उपलब्ध आहे. त्यामुळे रोपे कमी अन् उद्दिष्ट जास्त अशी अवस्था आहे.
५० हजार वृक्ष लावणार
यावर्षी वनविभागाला शतकोटी योजनेतंर्गत ५० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यासाठी वनविभागाच्या जालन्यातील रोपवाटिकेत ९० हजार रोपे तयार आहेत. वृक्ष लागवडीसाठी वनविभागाने ४३ हजार खड्डे खोदून ठेवले आहेत. चांगला पाऊस पडला की वृक्षलागवड करण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन कासार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
संवर्धनाचे उद्दिष्ट हवे
ज्याप्रमाणे विविध योजनेच्या माध्यमातून शासन लाखो रूपये खर्च करून विविध वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट शासनाच्या विविध विभागाला देण्यात येते. त्याच प्रमाणे लागवड केलेल्या वृक्षांच्या संवर्धनासाठीही टार्गेट देणे गरजेचे आहे.
वृक्षतोड सुरुच
जिल्ह्यात एकीकडे वृक्षलागवड व संवर्धनाबाबत कार्यक्रम राबवून दरवर्षी लाखो रूपये खर्च करण्यात येतो. मात्र वनविभाग, सामाजिक वनीकरण विभागाने मागील अनेक वर्षांपासून लावलेल्या व आता चांगले मोठे झालेल्या वृक्षांकडे दुर्लक्ष केल्याने आज वनविभागाच्या जागेवरील वनातील झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत आहे. तसेच जिल्ह्यातील रस्त्याच्या कडेला असलेल्या अनेक झाडांचीही कत्तल होत आहे. शहरालगत असलेल्या वनविभागच्या नर्सरीमधील तर बहुतांश झाडांची कत्तल झालेली आहे. त्यामुळे ही नर्सरी फक्त नावालाच शिल्लक आहे. याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. वृक्ष संवर्धन दिन साजरा करताना आज आहेत त्या वृक्षांच्या संवर्धनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वनसंवर्धन चळवळ तीव्र व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.