आमदार व्हायचे असेल, तर माझ्यासोबत महिना-दोन महिने फिरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 08:11 PM2020-09-14T20:11:24+5:302020-09-14T20:14:05+5:30

जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्राच्या वाटपप्रसंगी अफलातून सल्ला

If you want to be an MLA, walk with me for a month or two | आमदार व्हायचे असेल, तर माझ्यासोबत महिना-दोन महिने फिरा

आमदार व्हायचे असेल, तर माझ्यासोबत महिना-दोन महिने फिरा

googlenewsNext
ठळक मुद्देकार्यकर्ता हा भुईमुगाच्या वेलाप्रमाणे असला पाहिजे.वेल उपटला, तर  त्याच्यासोबत खळखळ वाजणाऱ्या पाच-पन्नास शेंगा (कार्यकर्ते) निघतात.

औरंगाबाद : कोणाला आमदार व्हायचे असेल, तर माझ्यासोबत महिना-दोन महिने फिरा, तर आमदार व्हाल. फक्त शिरीषजी तुम्ही सोडून. पदवीधरचे गणित वेगळे असते, आमदार होण्याचे असे सोपे सूत्र केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी  शनिवारी येथे कार्यकर्त्यांना सांगितले. 

भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान व  सत्कार हर्सूल परिसरातील लॉनवर शनिवारी करण्यात आला. यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष आ. हरिभाऊ बागडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष विजय औताडे,  माजी मंत्री नामदेव गाडेकर,  जि.प. उपाध्यक्ष एल.जी. गायकवाड, माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, प्रवीण घुगे, शिरीष बोराळकर, इद्रिस मुलतानी,  डॉ. दिनेश परदेशी, दिलीप बनकर, सविता कुलकर्णी आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी दानवे म्हणाले, जिल्ह्यातील पाच मतदारसंघांत पक्ष मजबूत आहे. उर्वरित ठिकाणी काम करण्याची गरज आहे. पदाधिकाऱ्यांनी आधी ग्रामपंचायत निवडणुकींची तयारी करावी. दुसऱ्या टप्प्यात पदवीधर निवडणूक असणार आहे. त्याचीही तयारी करायची आहे, अशा सूचनाही त्यांनी उपस्थितांना केल्या. 

आपल्या खुसखुशीत शैलीत दानवे म्हणाले, भाजप  सक्षम कार्यकऱ्यांना नेता बनविणारा पक्ष आहे. कार्यकर्ता हा भुईमुगाच्या वेलाप्रमाणे असला पाहिजे. वेल उपटला, तर  त्याच्यासोबत खळखळ वाजणाऱ्या पाच-पन्नास शेंगा (कार्यकर्ते) निघतात. नाही तर गाजरासारखा असल्यास उपटल्यास एकटाच असतो. त्यामुळे तुम्हाला भुईमुगाच्या वेलासारखे व्हायचे की, गाजरासाखे हे एकदा ठरावा, असा मापदंड त्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना दिला. भाजपत सामूहिक नेतृत्व निर्माण करण्याची पद्धत आहे. एका अध्यक्षाला सलग दोन वेळेनंतर तिसऱ्यांदा अध्यक्षपद भूषविता येत नाही. त्यामुळे भाजपत सामान्य व काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळतो.  पक्षात मोठ्या पदावर जाऊन काम करण्याची संधी मिळते. दुसरीकडे काँग्रेस पक्षात सोनिया गांधी, राहुल गांधी म्हणतात, अध्यक्ष बदला; पण बदलण्याचा निर्णय घेत नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करीत पक्ष आणि जनतेसाठी वाहून घेण्याचे आवाहनही दानवे यांनी केले.

आ. हरिभाऊ बागडे म्हणाले, कोरोनाला रोखण्यात राज्य  सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे  कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यातून अस्तित्व निर्माण करून गावागावांत लोकांचा विश्वास संपादन केला पाहिजे.  जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांनी प्रस्ताविक केले. यात त्यांनी कोरोनाच्या काळात जिल्ह्यात केवळ भाजपने लोकांच्या हिताची कामे केली.  काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांनी मिरविण्याचे काम केल्याची टीका औताडे यांनी केली.

Web Title: If you want to be an MLA, walk with me for a month or two

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.