क्षमता वाढविल्यास संधी आपोआप मिळेल
By Admin | Updated: April 20, 2016 00:21 IST2016-04-20T00:13:31+5:302016-04-20T00:21:20+5:30
औरंगाबाद : नाट्यक्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला तुमची क्षमता वाढवावी लागेल.

क्षमता वाढविल्यास संधी आपोआप मिळेल
औरंगाबाद : नाट्यक्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला तुमची क्षमता वाढवावी लागेल. क्षमता वाढल्यानंतर आपोआप व्यावसायिक लोक असतील, प्रयोगवाले असतील किंवा शासनवाले असतील. त्यांना तुम्हाला संधी द्यावीच लागेल किंबहुना ते संधी देत नसतात ती तुम्ही निर्माण करत असतात, असा विश्वास ज्येष्ठ रंगकर्मी कमलाकर सोनटक्के यांनी व्यक्त केला.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तसेच स्वतंत्रते भगवती बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बालरंगभूमी शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ रंगकर्मी कमलाकर सोनटक्के यांच्या हस्ते झाले. हे शिबीर बालरंगभूमीसाठी काम करणारे लेखक, दिग्दर्शक आणि शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आले होते; पण म्हणावा तेवढा प्रतिसाद या शिबिरास मिळाला नाही. यावेळी व्यासपीठावर चंद्रशेखर पाठक, सूर्यकांत पाठक, शिवाजी शिंदे आणि कमलताई सोनटक्के यांची उपस्थिती होती. दौलताबादजवळील दत्तधाम संस्थान मंदिराच्या सभागृहात घेण्यात आलेल्या या शिबिरात मार्गदर्शन करताना कमलाकर सोनटक्के म्हणाले की, नाट्य परिषदेला सुद्धा शिकण्यासाठी बालरंगभूमीसारख्या शिबिराची योजना फार उद्बोधक ठरेल. यापूर्वीची जेवढी शिबिरे झाली ती सुनियंत्रित झाली. नाटकामध्ये त्याज्य काहीही नाही. पूर्वीच्या नाटकांना दिग्दर्शक नसायचा तो तालीम मास्टर असायचा. नाटकाच्या संस्थाही फार मोठ्या लक्षाधीश माणसांनी चालवलेल्या नाहीत. ती तुमच्यासारखीच अस्वस्थ लोकं होती.
सूत्रसंचालन करून पार्थ बावस्कर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निर्मला अस्वलीकर यांच्यासह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.