चोर पकडले, तर पोलीस ठाण्यात आणा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:08 IST2021-01-08T04:08:35+5:302021-01-08T04:08:35+5:30
वाळूज महानगर : वाळूजला सोमवारी रात्री दुचाकीतून पेट्रोल चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना दक्ष नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिला. ही ...

चोर पकडले, तर पोलीस ठाण्यात आणा...
वाळूज महानगर : वाळूजला सोमवारी रात्री दुचाकीतून पेट्रोल चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना दक्ष नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिला. ही माहिती पोलीस ठाण्यात दिल्यानंतर ठाणे अंमलदाराने ‘चोर पकडले, तर तुम्हीच पोलीस ठाण्यात आणून सोडा’ असे अजब फर्मान सोडल्याने नागरिकांनी चोरट्यांना सोडून दिले.
सध्या पोलीस दलाच्या वतीने ‘दक्ष नागरिक- सुरक्षित परिसर’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांत जनजागृती केली जात आहे. या उपक्रमांतर्गत वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे यांनी नागरिकांत जनजागृती अभियान राबविण्यास सुरुवात केली. वाहने चोरी होण्याची शक्यता असल्याने ती संरक्षक भिंतीच्या आत लावा, वाहनाला जीपीएस सिस्टीम लावा, दुचाकीला लॉक, साखळदंड लावा, सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असलेल्या ठिकाणीच वाहने उभी करा आदींविषयी पोलीस प्रशासनातर्फे व्हॉटस्ॲप व सोशल मीडियामधून जनजागृती केली जात आहे. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या जनजागृती अभियानाला पोलीस कर्मचारी हरताळ फासत असल्याची प्रचीती वाळूजच्या नागरिकांना सोमवारी रात्री आली. येथील अविनाश कॉलनीत सोमवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास पाच ते सहा किशोरवयीन चोरटे हातात पेट्रोलच्या कॅन घेऊन जाताना दक्ष नागरिकांना दिसले. संशय आल्याने दोन तरुणांनी पाठलाग करून त्या दोन चोरट्यांना पकडले असता त्यांनी दुचाकीमधून पेट्रोल चोरल्याची कबुली दिली. गेल्या अनेक दिवसांपासून दुचाकीतील पेट्रोलची चोरी होत असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी या दोघा चोरट्यांना चोपही दिला.
या मग ठाण्यात
चोरट्यांना पकडल्यानंतर नागरिकांनी पोलीस ठाण्यात संपर्क साधून या चोरट्यांना जमाव मारहाण करीत असल्याने पोलीस पाठविण्याची विनंती केली. मात्र, ठाणे अंमलदार पोहेकॉ. विष्णू चाटे यांनी पोलीस ठाण्यात कुणीच नसून अधिकारी व कर्मचारी गस्तीवर गेल्याचे सांगितले. पुन्हा अर्ध्या तासाने नागरिकांनी पोलीस ठाण्यात संपर्क साधला. मात्र, दुसऱ्यावेळी ठाणे अंमलदार चाटे यांनी तुम्हीच चोरट्यांना पोलीस ठाण्यात घेऊन या, असा अनाहूत सल्ला दिला. नागरिकांनी नंतर मात्र दोघा चोरट्यांना सोडून दिले. यानंतर तासाभराने सहायक निरीक्षक अनिल कंकाळ, चालक किरण खिल्लारे, पोहेकॉ. नारायण लघाने घटनास्थळी आले, घटनास्थळी आलेले चालक पोहेकॉ. खिल्लारे यांनीही नागरिकांची उलटतपासणी करीत चोरट्यांना सोडून दिले, तर आम्हाला कशाला बोलावले, असे म्हणत नागरिकांशी वाद घातला. सहायक निरीक्षक कंकाळ यांनी वाद मिटविला.
----------------------------