पोलिसांनी मनावर घेतले तर...
By | Updated: December 3, 2020 04:10 IST2020-12-03T04:10:18+5:302020-12-03T04:10:18+5:30
वाळूज महानगर : ती रक्कम फक्त १४०० रुपये. सध्या नाममात्रच; पण पोलिसांबद्दल विश्वासार्हता निर्माण करणारी. पोलिसांनी मनावर घेतले तर ...

पोलिसांनी मनावर घेतले तर...
वाळूज महानगर : ती रक्कम फक्त १४०० रुपये. सध्या नाममात्रच; पण पोलिसांबद्दल विश्वासार्हता निर्माण करणारी. पोलिसांनी मनावर घेतले तर गुन्हेगार पकडले जातात व फिर्यादीलाही न्याय मिळतो, यावर शिक्कामोर्तब करणारी ही घटना.
दोन दशकांपूर्वी बजाजनगरात लुटमारीचा गुन्हा घडला. पोलिसांनी शोध घेत गुन्ह्यातील आरोपी पकडले. त्यांच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला. प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने ती रक्कम फिर्यादीला परत करण्याचा आदेश दिला; परंतु दरम्यानच्या काळात फिर्यादीचाही मृत्यू झाला. पोलिसांनी फिर्यादीच्या भावाचा शोध घेऊन ती रक्कम त्यांच्या स्वाधीन केली.
या प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी, योगेश वामरान उघडे (रा. निलकमल हौसिंग सोसायटी) यांना सन १९९९ मध्ये अज्ञात आरोपीने मारहाण करून त्यांच्या खिशातील रोख रक्कम हिसकावून घेतली. उघडे यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध लुटमारीचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी लुटमार प्रकरणातील आरोपीस जेरबंद करून लुटीचा ऐवज व रोख १४०० रुपये आरोपीकडून जप्त केले. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर आरोपीच्या ताब्यातून जप्त रक्कम फिर्यादीस परत करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना बजावले होते. पोलिसांनी फिर्यादी योगेश उघडे याचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, ते बजाजनगरातून इतरत्र वास्तव्यासाठी गेले होते. त्याचा नवा पत्ता माहीत नसल्यामुळे ती रक्कम पोलिसांकडे पडून होती.
न्यायालयाच्या आदेशानंतर पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे, निरीक्षक मधुकर सावंत, पोहेकॉ. रमाकांत पठारे यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने फिर्यादीच्या आईचा पत्ता मिळवून तिच्याशी संपर्क केला. फिर्यादीच्या आईने योगेशचा मृत्यू झाला असून त्या नाशिकला राहत असल्याचे सांगितले. तसेच औरंगाबादला वास्तव्यास असणारा दुसरा मुलगा उमेश उघडे याचा पत्ता व मोबाईल नंबर पोलिसांना दिला. पोलिसांनी उमेश उघडे यांचा शोध घेऊन लुटमारीचे १४०० रुपये त्यांच्या स्वाधीन केले. भावाच्या मृत्यूनंतरही तब्बल २१ वर्षांनी लुटमारीची रक्कम पोलिसांनी परत केल्यामुळे उमेश याने पोलिसांचे आभार मानले.