शहरांची नावे बदलून प्रश्न सुटत असतील तर आमचा पाठिंबा : नाना पटोले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2021 18:39 IST2021-08-16T18:37:19+5:302021-08-16T18:39:04+5:30
Nana Patole प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांना टोला लगावला.

शहरांची नावे बदलून प्रश्न सुटत असतील तर आमचा पाठिंबा : नाना पटोले
औरंगाबाद: आमच्या दृष्टीने बेरोजगारी, महागाई, विषमता यासारखे महत्वाचे प्रश्न आहेत. हे प्रश्न सुटले पाहिजेत. नावे बदलून असे प्रश्न सुटत असतील तर नामांतराला आमचा पाठिंबा आहे. असा टोला आज येथे प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई ( Subhash Desai ) यांना लगावला. देसाई यांच्या हीच वेळ आहे संभाजीनगर नाव देण्याची या भूमिकेला पटोले यांनी छेद दिला. पत्रकारांशी वार्तालाप करीत असताना ते म्हणाले की, नामांतराचा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आल्यावर कोण काय मांडतो ते बघू. ( If changing the names of cities solves the problem, then our support! : Nana Patole)
स्वातंत्र्याची लढाई लढून कॉंग्रेसने या देशाला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त केले. आता मोदी विरुध्दची लढाई लढण्यास कॉंग्रेस सज्ज असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले. त्यांनी आरोप केला की, केंद्र सरकारचा संविधान व्यवस्थेवर विश्वास नाही. फाळणीदिन साजरा करण्याचे आवाहन करण्याची मनोवृत्ती कशाचे द्योतक आहे. पंतप्रधानच या देशाचे तुकडे करण्याचा प्रयत्न करीत आहेत. भाजपची भूमिका आरक्षण विरोधी आहे. रा.स्व. संघाची भूमिका हीच भाजपची भूमिका हे आता लपून राहिलेले नाही, असे ते म्हणाले.
प्रथम संविधान मग धर्म असे सांगत पटोले यांनी, कॉंग्रेसने जाती धर्माच्या पलिकडे जाऊन स्वातंत्र्याची लढाई लढवली. आताही सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन राजकारण करण्याची कॉंग्रेसची भूमिका आहे.