मी पुन्हा एकदा सामान्य व्यक्तीप्रमाणे जीवन जगतोय...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 00:07 IST2018-10-24T00:06:08+5:302018-10-24T00:07:12+5:30
यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली आणि पुन्हा एकदा सामान्य व्यक्तीप्रमाणे जीवन जगत असल्याचे ‘सीएमआयए’चे माजी अध्यक्ष गौतम नंदावत म्हणाले.

मी पुन्हा एकदा सामान्य व्यक्तीप्रमाणे जीवन जगतोय...
औरंगाबाद : आयुष्यात दुसऱ्यांसाठी रुग्णालयात गेलो; परंतु स्वत:च्या एखाद्या आजारासाठी कधीही रुग्णालयाची पायरी चढलो नव्हतो. इंजेक्शनची भीती वाटत असे. अशा सगळ्यात ६ सें.मी.च्या ट्युमरमुळे यकृताची चलनप्रक्रिया थंडावली. तीन महिन्यांपेक्षा अधिक आयुष्य नसल्याचे सांगितले जात होते; परंतु यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली आणि पुन्हा एकदा सामान्य व्यक्तीप्रमाणे जीवन जगत असल्याचे ‘सीएमआयए’चे माजी अध्यक्ष गौतम नंदावत म्हणाले.
शहरातील युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये आॅगस्टमध्ये त्यांच्यावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली. गुंतागुंतीची ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर मंगळवारी पत्रकार परिषदेत माहिती देताना ते बोलत होते. यावेळी युनायटेड सिग्मा हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. उन्मेष टाकळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय रोटे, मुंबई येथील अपोलो हॉस्पिटलचे डॉ. विक्रम राऊत यांची उपस्थिती होती. या दोन्ही रुग्णालयातील तज्ज्ञांनी ही शस्त्रक्रिया केली. डॉ. टाकळकर म्हणाले, ब्रेन डेड व्यक्तीचे यकृत अथवा नातेवाईकांचे अर्धे यकृत घेऊन प्रत्यारोपण शक्य असते. दोन्ही रुग्णालयाच्या सहकार्याने आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. सिग्मा हॉस्पिटलमधील हे दुसरे यकृत प्रत्यारोपण होते. अवयवदानाची ही प्रक्रिया अधिक सक्षम व्हावी. त्यातून अधिक रुग्णांना फायदा होईल.
शहरातच शस्त्रक्रियेचा विश्वास
कुटुंबातील व्यक्तींचे यकृत वैद्यकीय कारणांमुळे प्रत्यारोपित करता आले नाही. अखेर सिग्मा हॉस्पिटलमध्ये यकृत उपलब्ध झाले आणि शस्त्रक्रियाही झाली. यापूर्वी १९९८ मध्ये नातेवाईकाच्या स्टेंटची शस्त्रक्रिया शहरातच झाली होती. त्यामुळे यकृत प्रत्यारोपणही शहरातच होईल, असा विश्वास होता, असे गौतम नंदावत म्हणाले.
पारदर्शकपणे होते प्रत्यारोपण
दरवर्षी किमान देशात ३० हजार लोकांना यकृत प्रत्यारोपणाची गरज असते. प्रत्यक्षात १५०० ते २ हजार लोकांनाच यकृत उपलब्ध होते. यकृत, किडनी प्रत्यारोपणाअभावी अनेक जण मृत्युमुखी पडतात. त्यामुळे अवयवदानामुळे एखाद्याचा जीव कसा वाचतो, हे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. ही सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडत असते. त्यावर शासनाचीही देखरेख असते, असे डॉ. विक्रम राऊत म्हणाले.