छत्रपती संभाजीनगर: राज्यातील महायुती सरकारच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी करावी, या मागणीसाठी उद्धवसेनेच्यावतीने आज, सोमवारी क्रांती चौकात यांना जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. 'कलंकित मंत्र्यांची मला लाज वाटते, रमी खेळणाऱ्या मंत्राची लाज वाटते..हनी ट्रम्प मध्ये अडकलेल्या मंत्र्यांची लाज वाटते, भ्रष्टाचारी मंत्र्यांचे करायचं काय, खाली मुंडक वर पाय'', आंदोलकांच्या अशा घोषणांनी क्रांती चौक परिसर दणाणला.
राज्यभर ठाकरेसेनेचे वतीने सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. शहरात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी 'मला लाज वाटते' ही नाटिका सादर करण्यात आली. या पथनाट्यात मुलगी डान्स करते आणि तिच्यावर मंत्री नोटा उधळत आहेत, असा प्रसंग दाखवण्यात आला. शिवाय रमी खेळ, जादू टोना करत बसलेला मंत्री, आणि हनीट्रॅपचे प्रसंग सादर करण्यात आले. जोरदार घोषणाबाजी आणि नाटकाद्वारे आंदोलकांनी डागाळलेल्या मंत्र्यांवर निशाणा साधण्यात आला.
या आंदोलनात माजी आमदार उदयसिंग राजपूत, शिवसेना महानगर प्रमुख राजू वैद्य, संतोष खिडके, दिग्विजय शेरखाने, वीरभद्र गादगे, ज्ञानेश्वर डांगे, कमलाकर जगताप, सुकन्या भोसले, आशा दातार, दिपाली बोरसे, राजेंद्र दानवे, राखी परदेशी, मीरा देशपांडे आदी शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्ह्यातील पदाधिकारी सहभागी होते.