जलशुद्धीकरण केंद्राची स्वच्छता
By Admin | Updated: June 2, 2014 01:33 IST2014-06-02T01:15:40+5:302014-06-02T01:33:37+5:30
वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक क्षेत्र व बजाजनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार आल्यामुळे एमआयडीसी जल शुद्धीकरण केंद्राची अत्याधुनिक पद्धतीने स्वच्छता करीत आहे.

जलशुद्धीकरण केंद्राची स्वच्छता
वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक क्षेत्र व बजाजनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार आल्यामुळे एमआयडीसी जल शुद्धीकरण केंद्राची अत्याधुनिक पद्धतीने स्वच्छता करीत आहे. गेल्या आठवड्यात बजाजनगर तसेच औद्योगिक क्षेत्रात गाळयुक्त पिवळसर दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार उद्योजक तसेच नागरिकांनी केली होती. एमआयडीसीने याच वर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन जलवाहिनी टाकली आहे. पूर्वी जुनाट जलवाहिनीमुळे कमी दाबाने व दूषित पाणीपुरवठा होत होता. आता नवीन जलवाहिनी टाकूनही दूषित पाणीपुरवठ्याचे प्रमाण कमी झालेले नाही. एमआयडीसीच्या बजाज कंपनीजवळ असलेल्या जलकुंभाची नियमितपणे साफसफाई करण्यात येत नसल्यामुळे या परिसरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप उद्योजक व नागरिकांनी केला आहे. पुण्याचे तज्ज्ञ बोलावले पुणे येथील विहान कॉर्पोरेशन एजन्सीचे तज्ज्ञ विलास कुलकर्णी यांनी पाणीपुरवठा व्यवस्थेची पाहणी केली. एमआयडीसीला पाणीपुरवठा करणार्या जायकवाडी जलाशयातील पाणी कमी झाल्यामुळे ब्रह्मगव्हाण येथून घेण्यात येत असलेल्या पाण्यातून गाळ व शेवाळ येत आहे. त्यामुळे बजाजनगरमध्ये आठ दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. एमआयडीसीच्या वतीने बजाजगेटजवळील जलशुद्धीकरण केंद्राची रसायन वापरून स्वच्छता करण्यात आली. जलशुद्धीकरण केंद्रात साचलेला गाळ व शेवाळ काढून टाकण्यात आले. पाणीपुरवठा करणार्या जलवाहिनीचीही स्वच्छता करण्यात येत असल्याचे एमआयडीसीच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र नवाळे यांनी सांगितले. शुद्ध पाण्यासाठी दरमहा १० लाख वाळूज औद्योगिक परिसरासह तसेच बजाजनगर, पंढरपूर, वाळूज, रांजणगाव, जोगेश्वरी, सिडको वाळूज महानगर आदी भागांत शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी एमआयडीसी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेणार आहे. पाण्यातील विषारी घटक नष्ट करण्यासाठी अल्गिसाईट तसेच इतर रसायने वापरून शुद्ध पाणी दिले जाईल. यासाठी एमआयडीसीला दरमहा १० ते १२ लाख रुपये खर्च येणार असल्याचे नवाळे यांनी सांगितले.