हायड्रो टेस्टविना सीएनजी वाहनांचा वापर सुरूच
By Admin | Updated: August 21, 2014 00:11 IST2014-08-20T23:57:21+5:302014-08-21T00:11:52+5:30
हायड्रो टेस्टविना सीएनजी वाहनांचा वापर सुरूच

हायड्रो टेस्टविना सीएनजी वाहनांचा वापर सुरूच
मुजीब देवणीकर, औरंगाबाद
पेट्रोल, डिझेलचे वाढते दर आणि वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी व्हावे, इंधन खर्च कमी व्हावा म्हणून शासनाने रिक्षा, बस, चारचाकी वाहनांमध्ये सीएनजी (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) आणि एलपीजीच्या (लिक्विड पेट्रोलियम गॅस) वापरास मान्यता दिली. त्यामुळे असंख्य वाहनधारकांनी याचा वापर सुरू केला. या वाहनांसाठी हायड्रो टेस्ट बंधनकारक असताना अनेक वाहने तशीच धावत आहेत. त्यामुळे वाहनांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
सीएनजी गॅस ज्या टाकीत भरावा लागतो, त्या टाकीची हायड्रो प्रेशर टेस्ट करावी, असा नियम केंद्र सरकारच्या विस्फोटक विभागाचा आहे. राज्य परिवहन आयुक्तांनीही हायड्रो प्रेशर टेस्ट करून घ्यावी, असे आदेशात म्हटले आहे. परंतु ज्या वाहनांनी गॅस कीट बसविले आहे, ते वाहनधारक आणि शासन अशा प्रकारची चाचणी करण्याबाबत उदासीन आहे. शहरात तब्बल ७ हजार सार्वजनिक वाहने कोणत्याही टेस्टशिवाय रस्त्यांवर धावत आहेत.
सीएनजी भरणाऱ्या केंद्रावर हायड्रो प्रेशर टेस्ट केली आहे की नाही, हे तपासणे अनिवार्य आहे. ज्या वाहनात गॅस कीटची टाकी बसविली आहे तेथून ब्रेक वायर किंवा एक्सल वायरचे टाकीबरोबर वारंवार घर्षण होते.
या सर्वांचा परिणाम म्हणून सिलिंडरची दाब क्षमता कमी होते. त्यानंतर सीएनजी सिलिंडर असुरक्षित बनते. असुरक्षित सिलिंडरचा स्फोट झाल्यास मोठी जीवित हानी होऊ शकते. शहरात अनेकदा भरधाव वाहनांनी पेट घेतला आहे. यामागचे कारण एकच की, हायड्रो प्रेशर टेस्ट करण्यात आलेली नाही.
दोन महिन्यांपूर्वी जळगाव रोडवर शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या एका रिक्षाला आग लागली होती. अशा घटना वारंवार घडत असतानाही आरटीओ प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाही. यासंदर्भात आरटीओ कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, औरंगाबादेत हायड्रो प्रेशर टेस्टची सुविधा उपलब्ध नाही.