पत्नीच्या दोन प्रियकरांना कंटाळून पतीची आत्महत्या
By Admin | Updated: May 13, 2014 13:30 IST2014-05-13T00:35:12+5:302014-05-13T13:30:39+5:30
वैजापूर : पत्नीच्या दोन प्रियकरांच्या जाचास कंटाळून राहत्या घरात गळफास लावून पतीने आत्महत्या केल्याची घटना ११ मे रोजी तालुक्यातील सिरसगाव येथे घडली.

पत्नीच्या दोन प्रियकरांना कंटाळून पतीची आत्महत्या
वैजापूर : पत्नीच्या दोन प्रियकरांच्या जाचास कंटाळून राहत्या घरात गळफास लावून पतीने आत्महत्या केल्याची घटना ११ मे रोजी तालुक्यातील सिरसगाव येथे घडली. याप्रकरणी दोन प्रियकरांविरुद्ध वीरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अप्पासाहेब पोपट कुटे (३५, रा.सिरसगाव) असे मृत पतीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, तालुक्यातील सिरसगाव येथील अशोक रामभाऊ डांगे व बापू कचरू कुटे या दोघांचे गेल्या तीन वर्षांपासून अप्पासाहेब कुटे यांच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. त्यांच्या या अनैतिक संबंधास अडथळा येऊ नये व बायको सोडून जावी म्हणून अशोक डांगे व बापू कुटे हे दोघे सतत अप्पासाहेब कुटे यांना शिवीगाळ करून दमबाजी करीत. त्यांच्या या सततच्या त्रासाला कंटाळून अप्पासाहेब कुटे यांनी ११ मे रोजी तालुक्यातील सिरसगाव शिवारातील राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. सकाळी १० ते ४ वाजेदरम्यान त्यांनी आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. याप्रकरणी वीरगाव पोलिसांनी प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद केली होती; परंतु अप्पासाहेब कुटे यांच्या खिशात लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना आढळून आली. त्यात त्यांनी अशोक डांगे व बापू कुटे या दोघांचे माझ्या पत्नीशी अनैतिक संबंध आहेत व हे मला त्रास देतात’ असे लिहून ठेवल्याचे वीरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक डी.एन. रयतुवार यांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी मयताचे पिता पोपट कुटे (५५, रा. सिरसगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध वीरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि डी.एन.रयतुवार करीत आहेत. (वार्ताहर)