अनैतिक संबंधावरुन पत्नीचा गळा दाबून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 22:53 IST2019-07-20T22:52:51+5:302019-07-20T22:53:05+5:30
पत्नीचे दुसऱ्यासोबत अनैतिक संबंध असल्याने संतापलेल्या पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली.

अनैतिक संबंधावरुन पत्नीचा गळा दाबून खून
वाळूज महानगर : पत्नीचे दुसऱ्यासोबत अनैतिक संबंध असल्याने संतापलेल्या पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना शनिवारी सकाळी रांजणगाव येथील पवननगर भागात घडली. ममता आनंद लोखंडे (२५) असे मृत पत्नीचे नाव आहे. पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी आनंद लोखंडे (३०) हा पोलीस ठाण्यात हजर झाला. पत्नीचा खून केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली.
आनंद सुरेश लोखंडे ह पत्नी ममता, मुले प्रज्ञा (५) व संघर्ष (अडीच वर्ष) यांच्यासह मुकुंदवाडी परिसरात रहात होता. तर त्याचे आई-वडिल रांजणगावात राहतात. या दाम्पत्याचा सुखाचा संसार सुरु असताचा ममताचे मुकुंदवाडीतील तरुणाबरोबर सूत जुळले. याची कुणकूण लागताच आनंद अस्वस्थ झाला. त्याने ममताला समजवण्याचा प्रयत्न केला.
मात्र, ममताने याकडे दुर्लक्ष करुन त्या तरुणाशी संपर्क कायम ठेवला. त्यामुळे या दाम्पत्यात खटके उडू लागले. त्यातच ८ जुलै रोजी ममता बेपत्ता झाली होती. आनंदने ११ जुलै रोजी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलीस तपासात ममता ही प्रमोद खनपटे (रा. मुकुंदवाडी) याच्यासोबत नाशिक येथील रेल्वे स्टेशन परिसरात असल्याचे कळले.
ही माहिती मिळताच आनंद नाशिक गेला आणि पोलिसांच्या मदतीने ममताला घरी आणले. समाजात बदनामी झाल्याने आनंद ममता व मुलांसह दोन दिवसांपूर्वीच रांजणगाव येथे आई-वडिलांकडे राहण्यास आला होता. आनंदने ममताचा मोबाईल स्वत:कडे ठेवला होता. यावरुन शुक्रवारी या दोघांत वाद झाला. शनिवारी सकाळी आनंदची आई नातवाला घेवून अंगणवाडीत गेली होती. तर वडिल घराच्या अंगणात बसले होते.
घरात दोघेच असताना त्यांच्यात पुन्हा वाद सुरु झाला. यातूनच संतप्त झालेल्या आनंदने ममताचा गळा आवळला. यातच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी आनंद सुरेश लोखंडे याच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास फौजदार विठ्ठल चासकर हे करीत आहेत.