मकबरा न पाहताच शेकडो पर्यटक गेले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:27 IST2020-12-17T04:27:19+5:302020-12-17T04:27:19+5:30

ऑनलाइन तिकीट काढण्याची प्रक्रिया अतिशय क्लिष्ट आहे. अनेकदा ‘क्यूआर’ कोड स्कॅन होत नाही. त्यामुळे पर्यटकांना वेबसाईटवर जाऊन तिकिटासाठी ...

Hundreds of tourists returned without seeing the tomb | मकबरा न पाहताच शेकडो पर्यटक गेले परत

मकबरा न पाहताच शेकडो पर्यटक गेले परत

ऑनलाइन तिकीट काढण्याची प्रक्रिया अतिशय क्लिष्ट आहे. अनेकदा ‘क्यूआर’ कोड स्कॅन होत नाही. त्यामुळे पर्यटकांना वेबसाईटवर जाऊन तिकिटासाठी प्रयत्न करावा लागतो. ऑनलाइन पेमेंटसाठी जी लिंक देण्यात आली आहे, ती सदोष असून, चटकन ओपन होत नाही. अनेकांना इंटरनेटच्या अडचणी येत आहेत. लिंक ओपन झाली, तर त्याद्वारे पर्यटकांचे आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा अन्य ओळखपत्रे स्कॅन करण्याची मागणी होत आहे. बहुतांश पर्यटक ओळखपत्रे सोबत घेऊन आलेले नव्हते. ही सगळी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तिकीट डाऊनलोड करणे, डाऊनलोड झालेले तिकीट मोबाईलमध्ये नेमके कुठे सेव्ह आहे, हे शोधणे अनेकांना कठीण होत आहे. अनेक जणांच्या मोबाईलमध्ये ऑनलाइन बँकिंग सुविधा उपलब्ध नाही, त्यामुळेही अनेकांना परत जावे लागले.

चौकट :

कर्मचाऱ्यांची वानवा

ऑनलाइन तिकीट काढण्यात पर्यटकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी बीबी-का-मकबरा परिसरात पुरेसे कर्मचारी नाहीत. रविवारी केवळ एक कर्मचारी तिकीट स्कॅनिंगचे काम करीत होता. एक तिकीट स्कॅन करण्यासाठी कमीत कमी एका मिनिटाचा वेळ लागतो. यामुळेही रांगेत उभे राहून पर्यटक वैतागले होते.

चौकट :

पार्किंगचे पैसे चालतात का?

मकबरा पाहण्यासाठी ऑनलाइन तिकीटच काढावे, असा प्रशासनाचा आग्रह आहे; पण याच मकबऱ्याच्या बाहेर असलेल्या पार्किंगमध्ये सर्रास पैशाची देवाण-घेवाण सुरू आहे. एकीकडे ऑनलाइन तिकीट काढणे न जमल्याने पर्यटकांना वापस पाठवायचे आणि दुसरीकडे त्यांच्याकडून पार्किंगचे पैसे घ्यायचे, यामुळे कोरोना पसरत नाही का, असा संतापही अनेक पर्यटक व्यक्त करीत होते.

चौकट :

मकबरा हाऊसफुल्ल

पर्यटन स्थळांमध्ये सकाळच्या सत्रात १ हजार आणि सायंकाळच्या सत्रात १ हजार पर्यटक येऊ शकतात, असा प्रशासनाचा आदेश आहे. रविवारी सायंकाळी ४.३० वाजताच १ हजार पर्यटक आल्याने सायंकाळच्या प्रवेशाची मर्यादा संपून गेली. त्यामुळे यानंतर जे लोक आले, त्यांना बाहेरूनच मकबरा पाहून परतावे लागले. ज्या लोकांना मोठ्या प्रयत्नांनी ‘क्यूआर’ कोड स्कॅनिंग करता आला, त्यांनाही प्रवेश मर्यादा संपल्याने मकबरा पाहता आला नाही.

Web Title: Hundreds of tourists returned without seeing the tomb