अमावस्येलाच शहरात लटकले शेकडो कोहळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:28 IST2020-12-17T04:28:03+5:302020-12-17T04:28:03+5:30
काळ्या बाहुलीचा प्रभाव कमी : पुण्याहून होते २ टेम्पो भरून आवक औरंगाबाद : अमावस्येच्या दिवशी शहरात अनेक घरात, ...

अमावस्येलाच शहरात लटकले शेकडो कोहळे
काळ्या बाहुलीचा प्रभाव कमी : पुण्याहून होते २ टेम्पो भरून आवक
औरंगाबाद : अमावस्येच्या दिवशी शहरात अनेक घरात, दुकानासमोर काळ्या बाहुली लटकविल्या जातात. मात्र, आता काळ्या बाहुल्यांचा प्रभाव कमी होत असून कोहळ्याचा विक्रीचा प्रभाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. कारण ८० ते १०० रुपये मोजून कोहळा खरेदी केला जात आहे.
आग्रा येथे कोहळ्यापासून प्रसिध्द मिठाई ‘पेठा’ तयार केला जातो. कोहळ्याची भाजी आरोग्यासाठी लाभदायी असते. पण, मागील काही महिन्यांपासून आपल्या शहरात कोहळ्याचा वापर अमावस्येच्या दिवशी जास्त होताना दिसून येत आहे. एवढेच नव्हे तर दर अमावस्येला कोहळ्याची विक्री वाढताना दिसत आहे. शनिवारी शहरात पुण्याहून २ टेम्पो भरून कोहळे विक्रीला आले होते. रस्त्यावर बसणारे विक्रेते काळ्या बाहुलीसोबत कोहळे विकताना दिसत होते. एरव्ही १० रुपयांची भाजी खरेदी करताना घासाघीस करणारे ग्राहक हे कोहळे ८० ते १०० रुपये देऊन विकत घेताना दिसून आले. या कोहळ्यासोबत जाळीही दिली जाते. त्या जाळीत टाकून ते कोहळे घरावर, दुकानासमोर लटकविण्यात येतात. नजर लागू नये म्हणूनही कोहळे लटकविले जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, कोहळे लावल्याने नजर लागत नाही, हा वादाचा विषय आहे; पण कोहळ्यांचा परिणाम मात्र काळ्या बाहुल्यांच्या विक्रीवर झाला आहे हे नक्की.
चौकट
लाखाची उलाढाल
कोहळे खाण्याऐवजी ते अंधश्रद्धा म्हणा की श्रद्धेपोटी घरासमोर लटकविले जातात. मात्र, अमावस्येला या कोहळ्यांच्या विक्रीत सुमारे १ लाख रुपयांची उलाढाल बाजारात झाली आहे.