भाविकांच्या दिमतीला शंभर बसगाड्या !
By Admin | Updated: September 19, 2014 00:59 IST2014-09-19T00:55:53+5:302014-09-19T00:59:55+5:30
उस्मानाबाद : श्री तुळजाभवानी देवीजींच्या शारदीय नवरात्र महोत्सवासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या उस्मानाबाद विभागाकडून १०० बसेसची सोय करण्यात आली आहे़

भाविकांच्या दिमतीला शंभर बसगाड्या !
उस्मानाबाद : श्री तुळजाभवानी देवीजींच्या शारदीय नवरात्र महोत्सवासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या उस्मानाबाद विभागाकडून १०० बसेसची सोय करण्यात आली आहे़ तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरातील जुन्या व नव्या बसेसवर थांब्याची सोय करण्यात आली आहे़
श्री तुळजाभवानी देवजींच्या शारदीय नवरात्र महोत्सवास २५ सप्टेंबर रोजी घटस्थापनेने प्रारंभ होत आहे़ नवरात्रोत्सवात सप्तमी, दसरा, द्वादशी, चर्तुदशी, पंचमी, अष्टमी, त्रयोदशी, पौर्णिमा आदी दिनी राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक देवीजींच्या दर्शनासाठी येतात़ तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे येण्यासाठी रेल्वेची सुविधा नसल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे़ या भाविकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या उस्मानाबाद विभागाकडून १०० बसेसची सोय करण्यात आली आहे़ उस्मानाबादसह भूम, परंडा, कळंब, उमरगा, तुळजापूर आदी आगारातून या बसेस सोडण्यात आल्या आहेत़ शिवाय औरंगाबाद, पुणे विभागासह कर्नाटकातीलही महामंडळाच्या बसेस भाविकांच्या सेवेसाठी धावणार आहेत़
पौर्णिमेसाठी १००० बसेस
नवरात्रोत्सवानंतरच्या एकादशी ते द्वितीया या कालावधीत व कोजागिरी पौर्णिमेला कर्नाटक, सोलापूरसह राज्याच्या कानाकोपऱ्यातील भाविक मोठ्या संख्येने तुळजापुरात येतात़ या भाविकांच्या सेवेसाठी औरंगाबाद प्रदेशाकडून ६५०, पुणे विभागाकडून ३५० अशा १००० बसेसची सोय करण्यात येणार आहे़
लातूर मार्गासाठी ५० बसेस
गत दोन वर्षात उस्मानाबाद, लातूर मार्गावरील पंचमी तिथीला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे़ त्यामुळे २८ व २९ सप्टेंबर रोजी या दोन मार्गावर गतवर्षीच्या तुलनेत बसमध्ये वाढ करण्यात येणार असल्याचे विभाग नियंत्रक भानप यांनी सांगितले़ वाढीव बसेसमुळे भाविकांची गैरसोय दूर होण्यास मदत होईल. (प्रतिनिधी)
कर्नाटक राज्यातून येणाऱ्या-जाणाऱ्या बसेससाठी नवीन बसस्थानकात सोय करण्यात आली असून, तीन सत्रात एक पर्यवेक्षक, तीन वाहतूक नियंत्रक कार्यरत राहणार आहेत़ तसेच गुलबर्गा येथील स्थानकावर प्रत्येकी चार कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत़ तर जुन्या बसस्थानकात जिल्ह्यातील मार्गावर केल्या जाणाऱ्या वाहतुकीचे नियोजन करण्यात येणार आहे़ यात तीन सत्रात दोन पर्यवेक्षक, सहा वाहतूक नियंत्रक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक, वाहतूक निरीक्षक कार्यरत राहणार आहेत़