शेकडो घरावरील पत्रे उडाले
By Admin | Updated: May 30, 2014 00:26 IST2014-05-29T23:49:52+5:302014-05-30T00:26:18+5:30
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सांगवी काटी, गोंधळवाडी, सुरतगाव परिसरात गुरूवारी दुपारी वादळी वार्यासह पाऊस झाला़

शेकडो घरावरील पत्रे उडाले
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सांगवी काटी, गोंधळवाडी, सुरतगाव परिसरात गुरूवारी दुपारी वादळी वार्यासह पाऊस झाला़ गोंधळवाडी शिवारातील पोल्ट्री फॉर्मवरील पत्रे उडाल्याने खाली दगडे पडून ५० कोंबड्यांचा मृत्यू झाला़ तर अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले. राष्ट्रीय महामार्गावर झाडे पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती़ सांगवी काटी शिवारात मुख्य वीज वाहिनीचे पाच पोल जमीनदोस्त झाल्याने दोन गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता़ गावच्या पूर्वेस अजमेर शेख, बाबूलाल शेख यांच्यासह इतर जवळपास ३० जणांच्या घरावरील पत्रे वार्यामुळे उडून गेल्याने संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले़ गोंधळवाडी गावच्या जवळच भगवान माने यांच्या शेतातील ५० वर्षापूर्वीचे वडाचे झाड उन्मळून पडले़ वीजतारा तुटल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता़ तर माणिक सुग्रीव मोटे यांच्या शेतातील पोल्ट्रीफार्मवरील पत्रे उडाल्याने दगडे पडून ५० कोंबड्या जागीच ठार झाल्या़ सुरतगाव येथेही जवळपास ५० जणांच्या घरावरील पत्रे उडाले असून, सुभाष जाधव यांच्या घरावर बाभळीचे झाड पडून नुकसान झाले़ प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सांगवीचे उपसरपंच हरिभाऊ मगर, अजमेर शेख, बाबूलाल शेख, गोंधळवाडी येथील भगवान माळी, सरपंच अमृत मोटे, पोपट मोटे, राजाभाऊ मोटे, सुरतगाव येथील विठ्ठल गुंड, नवनाथ सुरते, पांडुरंग गुंड, बब्रुवान गुंड यांनी केली आहे़ (वार्ताहर) दोघे जखमी मुरूम : मुरूम शिवारात गुरूवारी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला़ विजांच्या जोरदार कडकडाटामुळे दुचाकीवरून जाणारे महेश बाबाशेट्टी, अश्रुद्दीन कुरेशी हे दोघे खाली पडल्याने गंभीर जखमी झाले़ तर जखमींवर मुरूम येथे प्रथमोपचार करून उमरगा येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ मुख्य वीजवाहिनी वादळी वार्याने बंद पडल्याने गुंजोटी, मुरूम, आलूर येथील तिन्ही सबस्टेशन बंद पडले़ त्यामुळे परिसरातील वीज रात्रभर गायब होती़ मुरूम-मुरूममोड मार्गावर वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प होती़