नोकरी देण्याच्या नावाखाली मानवी तस्करी
By | Updated: December 4, 2020 04:12 IST2020-12-04T04:12:45+5:302020-12-04T04:12:45+5:30
टोळीचा पर्दाफाश : एक जण गजाआड नवी दिल्ली : नोकरी देणाऱ्या एजन्सीच्या नावाखाली मानवी तस्करी करणाऱ्या टोळीचा राष्ट्रीय तपास ...

नोकरी देण्याच्या नावाखाली मानवी तस्करी
टोळीचा पर्दाफाश : एक जण गजाआड
नवी दिल्ली : नोकरी देणाऱ्या एजन्सीच्या नावाखाली मानवी तस्करी करणाऱ्या टोळीचा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पर्दाफाश केला असून, यात अडकलेल्या एकाला गजाआड केले आहे.
एनआयए प्रवक्त्याने सांगितले की, झारखंडच्या खुंटी येथील रहिवासी गोपाल ओरांव (२८) याला बुधवारी अटक करण्यात आली आहे. यापूर्वीच अटक करण्यात आलेल्या पन्ना लाल महतो याच्या तो जवळचा आहे व मानवी तस्करीच्या टोळीत सक्रीय आहे. मागील वर्षी १९ जुलै रोजी खुंटीमध्ये आयपीसी व बंधुआ मजूर प्रथा (निर्मूलन) अधिनियम कलमांतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आले होते. एनआयएने चार मार्च रोजी याबाबत गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली होती.
महतो व त्याची पत्नी सुनीता देवी दिल्लीमध्ये तीन प्लेसमेंट एजन्सीच्या नावावर हे रॅकेट चालवित होता. एनआयए अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टोळी दिल्ली व परिसरातील राज्यांत नोकरी देण्याच्या बहाण्याने झारखंडमधून गरीब व अल्पवयीन मुले-मुलींना आणत होते. परंतु त्यांच्याकडून पैसा देत नव्हते. ओरांव हा सर्वांना या कामात मदत करीत होता.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, झारखंडच्या पाकुड, साहिबगंज, गुमला व खुंटी या चार जिल्ह्यांतील टोळीच्या निवासी ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली. यात गुन्ह्याशी संबंधित अनेक कागदपत्रे, रेल्वे तिकिटे व मोबाईल फोन जप्त केले. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.
.........
झारखंडमधील सचिवालय व सरकारी कार्यालये तंबाखूमुक्त बनणार
रांची : झारखंडमधील सचिवालय, पोलीस मुख्यालय, जिल्हा व विभागस्तरीय सरकारी कार्यालये तंबाखूमुक्त बनविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
झारखंडचे मुख्य सचिव सुखदेव सिंह यांनी राज्य तंबाखू नियंत्रण समन्वय समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत याबाबतचे आदेश दिले. राज्य सरकारचे मुख्यालय प्रोजेक्ट भवन, नेपाळ हाऊस, पोलीस मुख्यालयासह जिल्हा व विभाग स्तरावरील कार्यालये तंबाखूमुक्त क्षेत्र झाल्याचे फलक लावण्याचे आदेशही दिले आहेत. खाजगी कंपन्यांचे मुख्य प्रवेशद्वार व अन्य प्रमुख ठिकाणीही तंबाखूमुक्त क्षेत्र व गैर धूम्रपान क्षेत्राचे फलक लावण्याबाबत उद्योग विभागाच्या संचालकांना निर्देश देण्यात आले आहेत.
बालके व किशोरांना तंबाखू सेवनापासून दूर ठेवण्यासाठी सर्व शैक्षणिक संस्थांच्या परिसरातील तंबाखू उत्पादने दुकानांतून तत्काळ हटविण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
राज्यात पान मसाला व अवैध तंबाखू येण्यापासून रोखण्यासाठी सीमावर्ती जिल्ह्यांच्या नाक्यांवर चेक पोस्ट लावण्यास सांगण्यात आले आहे. अन्य प्रवेशांच्या ठिकाणीही कडक बंदोबस्त करण्याचे आदेश दिले आहेत. पंचायत स्तरावर तंबाखू नियंत्रणाच्या कारवाया क्रियान्वित करण्यासही सांगितले आहे. मुख्य सचिवांनी ग्रामीण विकास पंचायत राज खात्याच्या सचिवांना पत्र पाठवून जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींच्या सदस्यांना पत्र पाठवून प्रत्येक बैठकीत तंबाखू नियंत्रणावर चर्चा करण्याचे निर्देश दिले.
प्रतिबंधित पान मसाला व अवैध तंबाखू विक्रेत्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मोहीम राबविण्यास सांगण्यात आले आहेत. याच बरोबर सरकारी नोकरांकडून तंबाखू सेवन न करण्याबाबतचे शपथपत्र घेण्याचेही निर्देश दिले आहेत. राज्य तंबाखू नियंत्रण समितीच्या चौथ्या बैठकीत हे सर्व निर्णय घेण्यात आले.
राज्य सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले की, राज्यात प्रतिबंधित पान मसाल्याचे उत्पादन, विक्री, साठा व वाहतूक करण्याबरोबरच त्यासंबंधी विविध कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने ही बैठक घेण्यात आली होती.
..........
२९,००० वकिलांना दिली विमा पॉलिसी
नवी दिल्ली : देशाच्या राजधानीतील सुमारे २९,००० वकिलांची प्रत्येकी १० लाख रुपयांची विमा पॉलिसी काढण्यात आली अहे. मुख्यमंत्री कल्याण योजनेंतर्गत हा उपक्रम घेण्यात आला. १ डिसेंबरपासून ही योजना लागू करण्यात आली आहे.
हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टीची शक्यता
चंडीगढ : हरियाणा व पंजाबमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदले गेले आहे. चंडीगढमध्ये किमान तापमान ९.६ अंश तापमान नोंदण्यात आले. हिमाचल प्रदेशमध्ये शुक्रवारी जोरदार पाऊस व बर्फवृष्टी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. लाहौल स्पिती जिल्ह्याच्या केलांगमध्ये ६.९ अंश तापमान होते.
मच्छीमारांच्या कुटुंबांना आर्थिक मदत
मंगळुरू : बोट दुर्घटनेत मरण पावलेल्या पाच मच्छीमारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे. प्रत्येक कुटुंबाला ६ लाखांची मदत देण्यात येणार आहे. अशा प्रकारच्या दुर्घटना घडू नयेत, यासाठी प्रत्येक मच्छिमाराला जीवरक्षक जॅकेटस अनिवार्य करावेत, असेही आदेश देण्यात आले आहेत.
४६.५२ लाखांचे भेसळयुक्त साहित्य जप्त
इंदूर : ४६.५२ लाखांचे भेसळयुक्त खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. गुप्त खबर मिळाल्यावरून हा छापा मारण्यात आला. जप्त केलेल्या साहित्यात खोबरा, साखर पूड, मैदा आदीचा समावेश आहे. मागील अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता.
तामिळनाडूत कोरोनाचे १,४१६ नवीन रुग्ण
चेन्नई : तामिळनाडूमध्ये गुरूवारी कोरोना व्हायरसचे १,४१६ नवे रुग्ण आढळले, तसेच १४ जणांचा मृत्यू झाला. याबरोबरच राज्यात एकूण रुग्णांची संख्या ७,८६,१६३ झाली व एकूण मृतांची संख्या ११,७४७ झाली. गुरूवारी १,४१३ रुग्णांना घरी जाऊ देण्यात आले.
..........
सपाकडून आघाडीबाबत सकारात्मक प्रतिसाद नाही : शिवपाल
उत्तर प्रदेश : अखिलेश यादव यांनीही तयारी दर्शविली होती
लखनौ : उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीकडून आघाडी करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न मिळणे दुर्भाग्यपूर्ण आहे, असे प्रगतिशील समाजवादी पार्टी—लोहिया (प्रसपा) प्रमुख शिवपाल सिंह यांनी म्हटले आहे.
शिवपाल यांनी म्हटले आहे की, समाजवादी पार्टीने आतापर्यंत माझ्या प्रस्तावावर कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही किंवा त्या पक्षाच्या नेतृत्वाशी कसलीही चर्चा झालेली नाही. माझी इच्छा असूनही चर्चा पुढे सरकत नाही, हे दुर्भाग्यपूर्ण आहे.
समाजवादी पार्टीपासून वेगळे होऊन प्रसपाची स्थापना करणाऱ्या शिवपाल यांनी यापूर्वी अनेकदा सपाशी आघाडी करण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. त्यानंतर सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही म्हटले होते की, प्रसपा त्यांच्याबरोबर आली तर त्यांच्या नेत्याला कॅबिनेट मंत्रिपद दिले जाईल. आम्हाला प्रसपाशी आघाडी करण्यात कोणतीही अडचण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
शिवपाल यांनी स्पष्ट केले आहे की, आघाडी केली तरी प्रसपाचे स्वतंत्र अस्तित्व कायम राहील. या पक्षाचे एकांगी विलीनीकरण करण्याचा प्रस्तावही त्यांनी फेटाळून लावला आहे. प्रसपा आपले पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वास देऊ इच्छिते की, त्यांच्या सन्मानाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
आम्ही पक्षसंघटन मजबूत करण्यावर सतत काम करीत आहोत. येत्या २४ डिसेंबर रोजी प्रसपा संपूर्ण उत्तर प्रदेशातील प्रत्येक गावात पदयात्रांचे आयोजन करीत आहे. प्रत्येक गावात पोहोचणे व पक्षाचे विचार जनतेपर्यंत घेऊन जाणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे, असेही त्यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पार्टी तसेच शिवपाल यांच्या प्रगतिशील समाजवादी पार्टी—लोहिया (प्रसपा)ने तयारी सुरू केली आहे.
.................
गैरभाजप पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन
प्रगतिशील समाजवादी पार्टी—लोहिया (प्रसपा) प्रमुख शिवपाल सिंह यांनी म्हटले आहे की, गैरभाजप पक्षांनी एकत्र येण्याचे मी पुन्हा एकदा आवाहन करीत आहे. वेगवेगळ्या माध्यमांतून व संवादाच्या विविध व्यासपीठांवरून मी अनेकदा ही बाब सांगितलेली आहे की, समाजवादी विचारधारा असलेल्यांनी एका व्यासपीठावर यावे व सर्वांचा सन्मान होईल तसेच राज्याचा विकास होईल, असे काम करावे.
...........
भारत-बांगलादेश सीमा चर्चा प्रथमच दिल्लीबाहेर होणार
दरवर्षी दोनदा चर्चा : दोन्ही देशांचे महासंचालक सीमेचा दौराही करणार
नवी दिल्ली : भारत-बांगलादेशची महासंचालक स्तरावरील सीमा चर्चा या महिन्यात गुवाहाटीमध्ये होणार आहे. दरवर्षी दोनदा होणारी ही चर्चा दिल्लीबाहेर होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) व त्यांचे समकक्ष बॉर्डर गार्ड बांगलादेश (बीजीबी) यांच्यात ५१वी उच्चस्तरीय चर्चा २२ डिसेंबर रोजी सुरू होणार आहे. या चर्चेत दोन्ही देश सीमेवरील गुन्हे रोखणे तसेच दोन्ही देशांतील सहकार्य वाढविण्यावर चार दिवस चर्चा करतील. आसामची राजधानी बीएसएफच्या गुवाहाटी फ्रंटियरचे मुख्यालय आहे. या जवानांवर भारत-बांगलादेशाच्या एकूण ४०९६ किलोमीटर लांबीच्या सीमेपैकी ४९५ किलोमीटर सुरक्षेची जबाबदारी आहे. ही सीमा आसाम व पश्चिम बंगालच्या काही भागांनाही लागून आहे.
बीएसएफची विशेष जल शाखा आसाममध्ये धुबरीसह सीमावर्ती भागांना लागून असलेल्या नद्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळत आहे. त्याचेही काम याच मुख्यालयांतर्गत चालते.
१९९३मध्ये सुरू झालेली ही चर्चा दिल्लीबाहेर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सीमेजवळ होत असलेल्या या बैठकीदरम्यान दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आसामच्या काही सीमावर्ती भागांचा संयुक्त दौरा करण्याची संधीही मिळू शकते. त्यामुळे येथे त्याचे आयोजन करण्यात आले आहे. सप्टेंबरमध्ये बीएसएफ महासंचालक राकेश अस्थाना यांच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळ या चर्चेसाठी ढाक्यात गेले होते. सूत्रांनी सांगितले की, बीजीबीचे समकक्ष मेजर जनरल शफीनुल इस्लाम यांच्याबरोबर होणाऱ्या चर्चेचे नेतृत्व अस्थाना करतील. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन्ही देश व सुरक्षा दलांमध्ये सध्या चांगले संबंध आहेत व दोन्ही बाजूंनी हे संबंध बळकट करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहेत.
मागील बैठकीत अस्थाना यांनी म्हटले होते की, सीमेवर गुन्हेगार ठार होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. भारताचे जवान सीमापारच्या असामाजिक तत्त्वांकडून धोका निर्माण झाल्यावरच गोळीबार करतात. सीमेवर गुन्हेगाराचा मृत्यू किंवा त्याला पकडले जाण्याशी नागरिकतेविषयी संबंध नाही.
........................
या विषयांवर होणार चर्चा
१) भारत-बांगलादेश संयुक्त सीमा सुरक्षा व्यवस्थापन.
२) कुंपण नसलेल्या भागांमध्ये कुंपण घालणे.
३) सीमेपलीकडून होणाऱ्या गुन्ह्यांना लगाम घालणे.
४) सीमेवर काही जणांची हत्या.
.............
खासदार रिता बहुगुणाविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट
लखनौ : निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपच्या खासदार रिता बहुगुणा जोशी यांच्याविरुद्ध विशेष लोकप्रतिनिधी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. न्या. पी. के. राय यांनी बहुगुणा यांच्या जामीनदारांविरुद्धही नोटीस जारी केली असून या प्रकरणाची सुनावणी पुढील सुनावणी ४ जानेवारी रोजी ठेवली आहे. १७ फेब्रुवारी २०१२ रोजी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची वेळ संपल्यानंतर प्रचार करीत होत्या, या आरोपावरून त्यांच्याविरुद्ध खटला दाखल करण्यात आला आहे.
विधानसभेत गदारोळ, तेलगू देसमचे ७ आमदार निलंबित
अमरावती : आंध्र प्रदेश विधानसभेत गोंधळ घातल्याने तेलगू देसमच्या उपनेत्यासह सात आमदारांना गुरुवारी दिवसभरासाठी निलंबित करण्यात आले. थेट लाभ हस्तांतर योजनेवरील चर्चेदरम्यान वाय एस काँग्रेस आणि तेलगू देसमच्या सदस्यांत जोरदार खडाजंगी झाली. आम्हाला बोलू द्या, अशी मागणी करीत तेलगू देसमच्या सदस्यांनी निषेध करीत सभात्याग केला.
पंजाबच्या माजी पोलीसप्रमुखांना अटकपूर्व जामीन
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने पंजाबचे माजी पोलीसप्रमुख सुमेध सिंग सैनी यांना गुरुवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला. १९९१ मध्ये एका बेपत्ता कनिष्ठ अभियंत्याच्या मृत्यू प्रकरणात पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन नाकारला होता. एक लाखाच्या वैयक्तिक जातमुचलका आणि एवढ्याच रकमेच्या दोन हमीपत्रावर त्यांची जामिनावर सुटका करण्याचे निर्देशही पोलीस आणि उच्च न्यायालयाला दिले आहेत.
टेम्पो-बसची टक्कर, सहा ठार, तीन जखमी
बांदा : टेम्पो आणि बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात सहा जण ठार, तर अन्य तीन जण जखमी झाले. गुरुवारी रात्री सात वाजता जमालपूर गावानजीक हा अपघात घडला. टेम्पोतील सहा जण जागीच ठार झाले. मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी दु:ख व्यक्त करीत मृतांच्या कुटुंबियांना मदत करण्याचे आणि जखमींवर योग्य उपचार करण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.
स्फोटक भुकटी जाळताना पाच बालके भाजली
फर्रुकाबाद (उत्तर प्रदेश): फटाक्यातून काढलेल्या स्फोटक भुकटी जाळताना पाच बालके गंभीरपणे भाजली. गंगा दरवाजा भागात गुरुवारी ही घटना घडली. पाच ते आठ वर्षे वयोगटातील ही मुले घराजवळच्या एका ओसाड इमारतीत खेळत होती. त्यांना आधी सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आल्यानंतर तेथून लोहिया इस्पितळात हलविण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.
कार-ट्रकची टक्कर, तीन ठार, दोन जखमी
रायगढ : कार आणि ट्रकची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात तीन जण ठार, तर अन्य दोन जण जखमी झाले. छत्तीसगढच्या रायगढ जिल्ह्यातील लौहासिंघा गावात बुधवारी रात्री ही घटना घडली. विवाह समारंभाहून ते ओडिशातील गावाकडे परतताना त्यांची कार रस्त्यात उलटलेल्या ट्रकला धडकली. तीन जण जागीच ठार झाले. जखमींना नजीकच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदी १५ डिसेंबर रोजी गुजरात दौऱ्यावर
अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ डिसेंबर रोजी गुजरातचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते कच्छ जिल्ह्यात भव्य अक्षय ऊर्जा प्रकल्प आणि विक्षारण सयंत्राची पायाभरणी करतील, असे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी सांगितले. सौरपटासह पवनचक्कींचा समावेश असलेला कच्छमधील हा प्रस्तावित अक्षय ऊर्जा प्रकल्प जगातील सर्वांत मोठा असेल. त्याची वीजनिर्मिती क्षमता ३० हजार मेगावॅट असेल. विक्षारण सयंत्रामुळे कृषी आणि उद्योग क्षेत्राला स्वच्छ पाणी मिळेल. तसेच पेयजलही मिळेल.
जम्मू-काश्मीरमधील तीन सरकारी कर्मचारी निलंबित
जम्मू : निवडणुकीच्या कामात हयगय केल्यावरून तीन सरकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबन कालावधीदरम्यान ते अतिरिक्त आयुक्तालयाच्या कार्यालयाशी संलग्न असतील. अतिरिक्त उपायुक्त पवन परिहार यांनी या कर्मचाऱ्यांच्या चौकशीसाठी एक अधिकारी नियुक्त केला आहे. निवडणुकीच्या कामात हयगय करणे आणि आचार संहितेचे उल्लंघन केल्यावरून किश्तवारमध्ये आजपर्यंत पाच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
मध्य प्रदेशात कार-टँकर अपघातात तीन ठार
सिहोर : रस्त्याकडेला उभ्या असलेल्या दुधाच्या टँकरवर कार धडकून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला. मध्य प्रदेशातील भोपाळ- इंदूर महामार्गावर गुरुवारी दुपारी दोन वाजता हा अपघात घडला. दोघे जागीच ठार झाले, तर एकाचा इस्पितळाच्या वाटेवर मृत्यू झाला. मृतांची ओळख पटली असून जोडप्यासह एका मुलीचा समावेश आहे. जखमीला नजीकच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
नक्षलवाद्यांनी दडविलेली शस्त्रे, स्फोटके जप्त
दुमका (झारखंड) : नक्षलवाद्यांनी एका जंगलात जमिनीत पुरून ठेवलेली शस्त्रे आणि स्फोटके सुरक्षा दलाने जप्त केली. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस आणि सशस्त्र सीमा बलाने धरमपूरमध्ये शोधमोहीम राबवून एक रायफल, जिवंत काडतुसे, जिलेटीन कांड्या, डिटोनेटर्स जप्त केले. नक्षलवाद्यांचे स्थानिक समर्थकांना शोधून त्यांना पकडण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
जयपूर- दिल्ली दुमजली ट्रेन तात्पुरती रद्द
जयपूर : कमी प्रवासी असल्याने उत्तर-पश्चिम रेल्वेने जयपूर-दिल्ली दुमजली ट्रेन तात्पुरती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ही ट्रेन ८ डिसेंबरपासून रद्द केली जाईल, असे उत्तर- पश्चिम रेल्वेचे उप-सरव्यवस्थापक शशी किरण यांनी सांगितले. १० ऑक्टोबरपासून ही ट्रेन सुरू करण्यात आली होती.
विजेच्या धक्क्याने वरातीमधील तीन मजुरांचा मृत्यू
लखनौ : वरातील विजेची छत्री घेऊन वाद्यवृंदासोबत चालत असलेल्या तीन मजुरांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. बुधवारी रात्री साडेदहा वाजता राणीखेडा गावात ही घटना घडली. वाद्यवृंदातील काही मजूर विजेच्या दिव्यांच्या छत्र्या घेऊन चालत असताना एका छत्रीचा रस्त्यावरील विजेच्या रोहित्राला स्पर्श झाल्याने छत्रीत वीज प्रवाह उतरल्याने विजेच्या धक्क्याने तीन मजुरांचा मृत्यू झाला.
भाजप अध्यक्ष नड्डा आजपासून उत्तराखंड दौऱ्यावर
डेहराडून : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा शुक्रवारपासून उत्तराखंडचा चार दिवसांचा दौरा करणार आहे. पहिल्या दिवशी ते हरिद्वारमध्ये संतांची भेट घेतली. सायंकाळी गंगापूजन आणि आरतीत सहभागी होतील. उर्वरित तीन दिवस ते डेहराडूनमध्ये संघटनात्मक १४ बैठका घेतील, असे प्रदेश भाजप अध्यक्ष बन्सीधर भगत यांनी सांगितले.
..........
गुन्हेगारी टोळ्या बनावट कोरोना लसी तयार करण्याची भीती
इंटरपोलचा इशारा; पुरवठ्यातही अडथळे आणण्याची शक्यता
वॉशिंग्टन : जगभरातील संघटित गुन्हेगारी टोळ्या बनावट कोरोना लसी तयार करून बाजारपेठेत आणण्याची शक्यता आहे, असा इशारा इंटरपोलने सर्व देशांना दिला आहे.
इंटरपोलने म्हटले आहे की, कोरोना लसी चोरण्याचे, तिच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्नही या टोळ्यांकडून केले जाऊ शकतात. फायझर-बायोएनटेकची कोरोना लस पुढच्या आठवड्यापासून इंग्लंडमधील नागरिकांना दिली जाणार आहे. अॅस्ट्राझेनेका, ऑक्सफर्ड विद्यापीठ तयार करत असलेली लसही लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या लसींवर जगभरातील गुन्हेगारी टोळ्यांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे. आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हे गुन्हेगार बनावट वेबसाइट तयार करून त्याद्वारे लोकांना फसविण्याची शक्यता आहे.
(वृत्तसंस्था)
---------
साथ लगेचच आटोक्यात येणार नाही
येत्या तीन ते सहा महिन्यांत पुरेशा प्रमाणात कोरोना प्रतिबंधक लसी उपलब्ध होणार नसून त्यामुळे लगेचच कोरोना साथीवर लगेचच नियंत्रण मिळण्याची शक्यता नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. या संघटनेचे पदाधिकारी माइक रियान यांनी सांगितले की, कोरोना साथीचा फैलाव रोखण्यासाठी लोकांनी फिजिकल डिस्टन्सिंग राखावे तसेच मास्कही वापरावा.
-----------------
नाताळ, नववर्षाच्या निर्य़ातीवर मंदीचे सावट
नोव्हेंबरमध्ये ९.७ टक्क्यांची घट : शेतकरी आंदोलनाचाही फटका
नवी दिल्ली : कोरोनामुळे आधीच गाळात जाणाऱ्या विविध उद्योगांना शेतकरी आंदोलनाचा मोठा फटका बसला आहे. नोव्हेंबरमध्ये भारताकडून इतर देशांना होणारी निर्यात ९.७ टक्क्यांनी कमी झाली.
यामागे मोठे कारण तेलाच्या किमती घसरल्याचेही एक कारण असल्याचे फेडरेशन आफ इंडियन एक्स्पोर्ट आर्गनायझेशन्सचे अध्यक्ष शरद कुमार सराफ यांनी सांगितले आहे. नोव्हेंबरमध्ये निर्यात घटल्याने या क्षेत्रास २५.७७ बिलिअन अमेरिकन डॉलर्सचा फटका बसला.
पंजाब, हरयाणातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर धडकणे, पंजाबमध्ये रेल्वे वाहतूक खंडित झाल्यामुळेही निर्यातीवर परिणाम झाला. निर्यात संघटनेच्या आकेडवारीनुसार मोठ्या प्रमाणावर पेट्रोलजन्य पदार्थांचा पुरवठा खंडित झाला. मोठे मालवाहू कंटेनर्सच्या वाहतुकीवर निर्बंध आलेत, असेही सराफ यांनी सांगितले.
मात्र, येत्या काही महिन्यांमध्ये अनेक उद्योग पुन्हा नियमितपणे, पूर्ण क्षमतेने सुरू होतील. कोरोना लसीवर संशोधन सुरू आहे. काही देशांमध्ये लसीकरण सुरू होईल. लस बाजारात आल्यास २०२०-२१ आर्थिक वर्ष संपताना आतापर्यंत गाळामध्ये जाणाऱ्या कापड उद्योगात २९० बिलिअन अमेरिकन डॅलर्सची उलाढाल होईल, असाही दावा सराफ यांनी केला.
अनेक देशांमधून निर्यातीची विचारणा होत असल्याचे नमूद करून ते म्हणाले, यामुळे निर्यातवाढ होण्याची आशा आहे. जागतिक बाजारात पुन्हा एकदा मागणी वाढू लागल्याचे हे निदर्शक आहे. पारंपरिक क्षेत्रासाठी ख्रिसमस व नवीन वर्षाचा सेल जणू काही लिटमस टेस्ट असतो. त्यासाठी निर्यातीत काही अडचणी येणार नसल्याची आशा त्यांनी व्यक्त केली. तेलबिया, तेल, लोह, तांदूळ, चिनीमातीच्या वस्तू, हातमाग, काचेच्या वस्तू, हाताने बनवलेला गालिचा, ज्यूटपासून बनवलेल्या वस्तू, तंबाखू, कापूस, धागा, औषधी, फळे, चहा, मोती, दागिने, मांस, दूध व दूग्धजन्य पदार्थ, इलेक्ट्रॅनिक वस्तूंना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी असल्याचे ते म्हणाले. चामड्यापासून बनवलेल्या वस्तू, प्लास्टिक, जहाजबांधणी उद्योगाशी संबंधित यंत्र, काजूलाही मागणी वाढल्याचे ते म्हणाले. कोरोनाचा फटका आयातीलाही बसला आहे. नोव्हेंबरअखेर त्यात ३३.३९ बिलियन अमेरिकन डॅलर्सची घट झाली. गतवर्षीच्या तुलनेत १३ टक्क्यांची घट झाली आहे.
.............