छत्रपती संभाजीनगर : बँकेचे कर्ज म्हटले की व्याज आलेच. पण शहरात एक अशी बँक आहे, जी कोणतेही व्याज आकारत नाही. ही बँक फक्त देण्याचेच काम करतेय. ही बँक म्हणजे मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड ठरलेल्या घाटी रुग्णालयातील ह्युमन मिल्क बँक. या बँकेच्या माध्यमातून गेल्या ६ महिन्यांत ‘एनआयसीयू’त दाखल ६५८ शिशूंना इतर मातांचे दूध मिळाले. मातेच्या अमृतसमान दुधामुळे शिशूंना जणू नवे आयुष्य मिळत आहे.
घाटी रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) रोटरी क्लबच्या माध्यमातून ही ह्युमन मिल्क बँक साकारण्यात आली आहे. प्रसुतीनंतर अनेक शिशूंना उपचारासाठी ‘एनआयसीयू’त दाखल करावे लागते. त्याच वेळी प्रसुतीनंतर अनेक मातांना पुरेसे दूध येत नाही, तर सिझेरियन प्रसुती, तसेच प्रकृती अस्वास्थ्यामुळेही काही मातांना ‘एनआयसीयू’त जाऊन शिशूंना दूध पाजता येत नाही. प्रसुतीनंतर काही मातांना स्वत:च्या शिशूच्या गरजेपेक्षा अधिक दूध येते, अशा मातांना परिचारिका या बँकेसाठी दूध दान करण्याचे आवाहन करतात. या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या बँकेसाठी अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सुरेश हरबडे, नवजात शिशू विभागप्रमुख डाॅ. एल. एस. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डाॅ. अमोल जोशी, डाॅ. अतुल लोंढे आणि मेट्रन संजीवनी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बालरुग्ण परिसेविका आम्रपाली शिंदे, फरा शेख, शीतल सानप, कल्याणी भुरेवाल, माधुरी राठोड, पूजा घोटूळ, दीपाली सोनवणे, अर्चना मुळीक, संतोष राठोड, रेखा दुधाळकर आदी प्रयत्न करीत आहेत. या बँकेसाठी पुरेशा परिचारिका मिळाल्यास आणखी सेवा वाढण्याची अपेक्षा आहे.
किती लिटर दूध संकलन, वितरण? गेल्या ६ महिन्यांत मातांकडून १०१ लिटर दुधाचे संकलन झाले. यात आवश्यक ती प्रक्रिया (पाश्चराइज्ड) करून ९४ लिटर दुधाचे ६५८ शिशूंना वितरण करण्यात आले.
प्रक्रिया केल्यानंतरच दूध शिशूंनामानवी दूध बँकेसाठी मातांकडून दूध संकलन करणे सुरू आहे. इतर शिशूंसाठी दूध देण्यासाठी माता आनंदाने तयार होत आहेत. संकलित दुधावर आवश्यक प्रक्रिया आणि तपासणी केल्यानंतर ‘एनआयसीयू’तील शिशूंना दिले जाते.- डाॅ. एल. एस. देशमुख, नवजात शिशू विभागप्रमुख, घाटी