नदीपात्रातील निघाल्या मात्र, धरणातील मोटारी सुरूच
By Admin | Updated: November 16, 2015 00:37 IST2015-11-15T23:53:55+5:302015-11-16T00:37:21+5:30
तेर : उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील तेरणा धरणातून मोठ्या प्रमाणात पाणीउपसा सुरू असल्याबाबत ‘लोकमत’ने रविवारी वृत्त प्रसिध्द केल्यानंतर

नदीपात्रातील निघाल्या मात्र, धरणातील मोटारी सुरूच
तेर : उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील तेरणा धरणातून मोठ्या प्रमाणात पाणीउपसा सुरू असल्याबाबत ‘लोकमत’ने रविवारी वृत्त प्रसिध्द केल्यानंतर नदीपात्रातून पाणीउपसा करणाऱ्या शेतकऱ्यांनी कारवाईच्या भीतीपोटी तातडीने आपल्या मोटारी काढून घेतल्या. परंतु, धरणातील मृतसाठ्यातून पाणी उपसा करणाऱ्या मोटारी अद्यापही कायम असल्याचे दिसून आले.
तेरसह येडशी, कसबे तडवळे आणि ढोकी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या तेरणा धरणात सध्या मृत साठा शिल्लक आहे. जिल्ह्यात सर्वत्रच सध्या तीव्र पाणीटंचाई असल्याने उपलब्ध पाणीसाठे पिण्यासाठी राखून ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. या अनुषंगाने प्रशासनाकडून पाणीउपसा करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई देखील होत आहे. मात्र, ‘बडे’ शेतकरी राजरोसपणे पाणीउपसा करीत असल्याचे चित्र आहे. तेरमध्ये देखील हीच परिस्थिती पहावयास मिळत आहे. तेर येथे संत गोरोबा काका मंदिरानजीक तेरणा नदीपात्राच्या खोलीकरण व रूंदीकरणात सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसानंतर साचलेल्या पाण्यातून शेतीसाठी उपसा सुरू होता. यासंदर्भात ‘लोकमत’ने रविवारच्या अंकात छायाचित्रासह सविस्तर वृत्त प्रसिध्द केले होते. यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी स्वत:हून मोटारी काढून घेतल्या. परंतु, तेरणा मध्यम प्रकल्पातून होत असलेला पाणीउपसा अजूनही सुरू असल्याचे दिसत आहे. त्यामुळे संबंधितांनी हा पाणी उपसाही तातडीने थांबवावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)