छत्रपती संभाजीनगर मनपात 'राजकीय खिचडी' कशी शिजणार! आघाडी-युतीचा मोठा पेच
By स. सो. खंडाळकर | Updated: December 16, 2025 13:59 IST2025-12-16T13:58:45+5:302025-12-16T13:59:36+5:30
मनपा निवडणुकीत स्थानिक पातळीवर गोंधळ; 'युती-आघाडी होणार की नाही' यावर कार्यकर्त्यांचे लक्ष.

छत्रपती संभाजीनगर मनपात 'राजकीय खिचडी' कशी शिजणार! आघाडी-युतीचा मोठा पेच
छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी होते काय याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून आहे. सध्या तरी तशी कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाने स्वतंत्र तयारी केली आहे. स्थानिक नेते आम्ही वरिष्ठांचे आदेश पाळू असे उत्तर देत आहेत. वंचित बहुजन आघाडीनेही स्वतंत्र तयारी केली आहे. सोमवारी वंचितने १५० इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.
वंबआशी युतीची शक्यता
काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख युसुफ यांनी सांगितले की, रात्री मी मुंबईकडे रवाना होत आहे. मंगळवारी, दि. १६ रोजी मुंबईत टिळक भवनात काँग्रेसच्या २९ शहर अध्यक्षांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मी छत्रपती संभाजीनगर मनपाच्या अनुषंगाने माझा अहवाल मांडेन. काँग्रेसतर्फे २९० उमेदवारांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. महाविकास आघाडी म्हणून लढल्यास काँग्रेसला फायदा होईल का, याचीही उद्याच्या बैठकीत चर्चा होईल. छत्रपती संभाजीनगर निवडणूक वंचित बहुजन आघाडीशी युती करून लढावी असा अनेक कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. त्यादृष्टीने वंचितच्या स्थानिक नेत्यांशी आमची चर्चा सुरू आहे. छोट्या छोट्या पक्षांशीही युती करावी असे आम्हाला वाटते. भाकप, माकप, समाजवादी अशा पक्षांशीही युती करण्याची आमची मानसिकता आहे.
राष्ट्रवादी (शप)गटात आतापर्यंत ६५ इच्छुक....
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष ख्वाजा शरफुद्दीन म्हणाले, आमचा पक्षही महाविकास आघाडी म्हणून लढण्यास तयार आहे. त्यादृष्टीने आमची त्या त्या पक्षाच्या स्थानिक नेत्यांशी चर्चाही सुरू आहे. आमच्या पक्षाकडे सध्या ६० ते ६५ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरून आणून दिले आहेत. १५० जणांनी अर्ज नेले होते. एक-दोन दिवसांत पक्षाचे निरीक्षक शहरात येतील. त्यानंतर इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जातील. प्रसंगी वंचित बहुजन आघाडी व एमआयएमबरोबर युती करायला आम्ही तयार आहोत.
एमआयएम स्वबळावर लढणार.....
एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष व छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलिल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आमचा पक्ष छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार आहे. कुणाशीही युती करणार नाही. सुमारे ४०० इच्छुकांनी अर्ज नेले आहेत. ते १७ डिसेंबरपर्यंत भरून येण्याची मुदत आहे. १९ डिसेंबरनंतर मुलाखती होतील.
उबाठा एकट्याने पण तयार अन् आघाडीसाठी प्रयत्नशीलही!
१६ ते १८ डिसेंबर दरम्यान शिवसेना उबाठातर्फे इच्छुक उमेदवारांना अर्ज वाटप केले जातील. सुमारे दोन हजार अर्ज यावेत अशी अपेक्षा आहे. शिवसेना उबाठाने सर्व ११५ वार्डांमध्ये लढण्याची तयारी केली आहे. परंतु महाविकास आघाडी म्हणून लढण्याचेही प्रयत्न चालू आहेत. २० आणि २१ डिसेंबरला इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती येण्यात येतील. २२ डिसेंबरला उमेदवारांची यादी अंतिम करुन २३ डिसेंबरपासूून अर्ज भरायला सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती शिवसेना उबाठाचे महानगर प्रमुख राजू वैद्य यांनी दिली.