Manoj Jarange Patil on GR: "पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा... सगळे मराठे आरक्षणात जाणार म्हणजे जाणार, यात तिळमात्र शंका नाही; कुणी ठेवायची पण नाही. ज्यांच्या नोंदी नाहीत म्हणून तर गॅझेट लागू करायचं आहे. त्याचा जीआर निघणे खूप आवश्यक होतं. जो १८८१ पासून काढलेला नाही. एक साधी ओळ सरकारने मराठ्यांच्या हिताची लिहिलेली नव्हती", अशी भूमिका मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर पहिल्यांदाच मांडली.
छत्रपती संभाजीनगर येथे मनोज जरांगे यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्राथमिक उपचार घेतल्यानंतर जरांगे मराठा समाजाला म्हणाले, "फक्त संयम आणि शांतता ठेवा. शांत डोक्याने विचार करा. एखाद्या विदूषक आणि अविचारी माणसावर विश्वास ठेवून कधीही संयम, विश्वास ढळू देऊ नका."
"सात कोटी जनता आणि मी निर्णय घेतो"
"निर्णय घेताना मी कधी एकटा घेत नाही. आम्ही दोघं मिळून निर्णय घेतो. माझी सात कोटी गोरगरीब जनता आणि मी. काहीचं पोट यासाठी दुखत आहे की, आता त्यांच्या हातून सगळं गेलं. त्यांना आरक्षणावरून राजकारण करायचं होतं, गॅझेटवर राजकारण करायचं होतं. जे यावरच त्यांचं जीवन जगत होते, ते आता पूर्ण कोलमडणार आहेत", असे आवाहन मनोज जरांगेंनी केलं.
"हे लोक कधीच आपल्या बाजूने बोललेले नाहीत. मी काय करतोय हे मराठा बांधवांनी समजून घ्या. मराठवाड्यातील एकही मराठा आरक्षणाशिवाय राहणार नाही, हे पक्क डोक्यात ठेवा आणि आनंदी रहा. कुणाचं ऐकून तुमचं आणि माझं भलं होणार नाही. खूप टोळ्या उठणार आहेत. सरकारच्या बाजूने बोलून नकारात्मकता पसरवायची, कुणाला तरी खूश करायचं. हे समजून घ्या", असेही जरांगे मराठा समाजाला म्हणाले.
"हमीपत्र देऊन कुणबी प्रमाणपत्र काढता येणार"
"ज्यांच्या नोंदी नाहीत, त्यांच्यासाठी गाव पातळीवर आणि तालुका स्तरावर समिती तयार केली आहे. हैदराबादमध्ये असणार्या नोंदी म्हणजे मराठवाड्यातील मराठा हाच कुणबी आहे. याच्यासाठी तिघांची समिती आहे. ज्यांच्याकडे जमीन नाही, त्यांनी बटाईने जमीन केली असेल, त्याचे हमीपत्र देऊन कुणबी प्रमाणपत्र काढता येणार. प्रक्रिया सुरू होणार आहे. हैदराबाद गॅझेटच्या नोंदी विचारात घेऊन मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचा तो जीआर आहे", असे जरांगे यांनी म्हटले आहे.
"शंका डोक्यात ठेवू नका. मी तुमचं का वाटोळं करेन? गैरसमज वाटत असेल, तर तिथे आलेल्या मंत्रिमंडळाला स्पष्ट सांगितलेलं आहे. यांना तुमच्यात आणि मााझ्यामध्ये अंतर तयार करायचं आहे. मी तुमच्यापासून दूर गेलो की वाटोळ झालं. मी फक्त मराठा समाजाच्या लेकीबाळी, पोरांचंच कल्याण करतोय. हा विषय मी संपवतच आणला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा आरक्षणात गेल्यावर काय राहिले? त्यामुळे कुणावरही विश्वास ठेवू नका", असे जरांगे म्हणाले आहेत.