नैसर्गिक-मानवनिर्मित आपत्तीत शहर कसे वाचविणार? हानी कमी करण्यासाठी मनपाचा आराखडा

By मुजीब देवणीकर | Published: February 8, 2024 04:44 PM2024-02-08T16:44:32+5:302024-02-08T16:45:17+5:30

१ फेब्रुवारी रोजी शहरात गॅसगळतीची घटना घडली. या घटनेनंतर उपाययोजनांवर व्यापक प्रमाणात भर दिला जात आहे.

How to save the city in a disaster? Finance, Municipality plan to reduce loss of life | नैसर्गिक-मानवनिर्मित आपत्तीत शहर कसे वाचविणार? हानी कमी करण्यासाठी मनपाचा आराखडा

नैसर्गिक-मानवनिर्मित आपत्तीत शहर कसे वाचविणार? हानी कमी करण्यासाठी मनपाचा आराखडा

छत्रपती संभाजीनगर : शहरावर नैसर्गिक, मानवनिर्मित आपत्ती कधी येईल, याचा नेम नसतो. अशा पद्धतीचे एखादे संकट आलेच तर वित्त, जीवितहानी कशी कमी करता येईल, याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. मागील १० वर्षांत शहरावर आलेल्या आपत्तींचा अभ्यास केला जाईल. त्यासाठी राज्य शासनाने दोन संस्थांची नेमणूक केली असून, बुधवारी स्मार्ट सिटी कार्यालयात प्राथमिक बैठकही घेण्यात आली.

१ फेब्रुवारी रोजी शहरात गॅसगळतीची घटना घडली. या घटनेनंतर उपाययोजनांवर व्यापक प्रमाणात भर दिला जात आहे. त्यातच युनायटेड डेव्हलपमेंट प्लान आणि राज्य शासनाने नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी आरएमएसआय व ॲल्युबियम या कंपन्यांची नियुक्ती केली आहे. राज्य शासनाने छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर शहरांचा अशा प्रकारचा आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या कंपनीच्या प्रतिनिधींसोबत स्मार्ट सिटी कार्यालयात बैठक घेण्यात आली.

बैठकीत कंपन्यांतर्फे कामाचे स्वरूप नमूद करण्यात आले. मागील दहा वर्षांत शहरावर आलेल्या संकटांचा अभ्यास करून कमीत कमी हानी व्हावी, यासाठी आराखडा तयार केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. मोठे पूर, आगीच्या घटना, भूकंप, गॅसगळतीसह इतर आपत्तींचा विचार केला जाणार आहे. त्यानंतर अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही दिले जाईल. यावेळी आरएमएसआयचे डॉ. मुरली कृष्णा, वरिष्ठ अभियंता मोहम्मद जुनेद, पार्थ गोहेल, दिल्ली येथील आकाश मलिक, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, सौरभ जोशी, शहर अभियंता ए. बी. देशमुख यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सुखना, खाम नदीपात्र
शहरातील पूरपरिस्थिती लक्षात घेऊन खाम नदीपात्रात रेड व ब्लू लाइनचे मार्किंग केले आहे. सुखना नदीत असे मार्किंग नाही. त्यामुळे सुखना नदीतही मार्किंग करण्याची सूचना बैठकीत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केले. आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने संपूर्ण यंत्रणा स्मार्ट सिटी कार्यालयातील कनेक्ट असावी, अशीही सूचना करण्यात आली.

Web Title: How to save the city in a disaster? Finance, Municipality plan to reduce loss of life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.