घर चालवायचे कसे; गळ्यातली चेन मोडायची वेळ आली, कसले ब्रेक दी चेन ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 14:36 IST2021-04-10T14:36:13+5:302021-04-10T14:36:38+5:30
सध्या वाढलेली महागाई आणि कोरोनामुळे व्यवसायावर आलेले संकट याचा ताळमेळ साधताना महिलांची कसरत होत आहे.

घर चालवायचे कसे; गळ्यातली चेन मोडायची वेळ आली, कसले ब्रेक दी चेन ?
औरंगाबाद : लॉकडाऊन, ब्रेक दी चेन यामुळे हातावर पोट असणाऱ्या हजारो कुटुंबांचे आर्थिक नियोजन पुन्हा एकदा कोलमडले आहे. ब्रेक दि चेनमुळे व्यवसायावर आलेली कुऱ्हाड पाहता लवकरच आता गळ्यातली चेन मोडायची वेळ आमच्यावर न येवो, असे व्यापाऱ्यांचे आणि त्यांच्या घरचे नियोजन पाहणाऱ्या त्यांच्या गृहलक्ष्मींचे म्हणणे आहे.
दर महिन्याला ठराविक रक्कम घरात आणून देणे हे पुरुषाचे काम असले तरी त्या रकमेतून सगळा घरखर्च भागवून काही रकमेची बचत करून ठेवणे, हे गृहिणीचेच काम असते. सध्या वाढलेली महागाई आणि कोरोनामुळे व्यवसायावर आलेले संकट याचा ताळमेळ साधताना महिलांची कसरत होत आहे. मिळकत आणि खर्च यांची सांगड घालणे कोरोना आणि ब्रेक दि चेनने पुन्हा एकदा कठीण होऊन बसले आहे, असे काही महिलांनी सांगितले.
कोरोनाने मरण्यापेक्षा उपासमारीने मरण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू, औषधी यांना जशी परवानगी दिली, तशीच परवानगी आमच्या व्यवसायालाही द्या, असे अनेक घरच्या गृहिणींचे म्हणणे आहे.
आता कुठे सुरू झाला होता व्यवसाय , कर्ज कसे फेडायचे ?
मागच्या लॉकडाऊनच्या झळा सोसल्यानंतर आता कुठे मागच्या काही महिन्यांपासून विविध व्यवसायांची गाडी पुन्हा रूळावर येऊ लागली होती. लोकांच्या मनातली भीती कमी झाली होती आणि ते पुन्हा पहिल्यासारखी खरेदी करू लागले होते. पण पुन्हा हे 'ब्रेक दि चेन' आले. यामुळे कोरोनाची चेन ब्रेक होईल की नाही, हे माहित नाही, पण आमच्या उद्योगांची चेन मात्र नक्कीच ब्रेक झाली असल्याचे काही व्यापारी म्हणाले.
पुन्हा हे नवे संकट
गरिबाला जगू द्यायचेच नाही, असेच जणू सरकारने ठरविले आहे. आता कुठे मागच्या लॉकडाऊन काळात झालेली उधार-उसणवारी फिटत आली होती. तर पुन्हा हे नवे संकट उभे राहिले. माझ्या मालकांची पानटपरी आहे. राेज कमावले तरच खाऊ शकू अशी परिस्थिती आहे. याचा विचार करून पुन्हा टपरी सुरू करायला परवानगी द्यावी.
- अरुणा शिंदे
उत्पन्न थांबले आहे
सरकार याला ब्रेक दि चेन असे म्हणत असले तरी हे एक प्रकारचे लॉकडाऊनच आहे. यामुळे शहरातील हजारो दुकाने बंद झाली असून, दुकानाचे मालक असो किंवा कामगार, प्रत्येकाचेच उत्पन्न थांबले आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने जशी चालू आहेत, तशी अन्य व्यापाऱ्यांनाही त्यांची दुकाने चालू ठेवण्याची परवानगी द्यावी.
- कीर्ती कासलीवाल
उपासमारीची वेळ
कोरोना हा रोग दिवसेंदिवस वाढत असला तरी आता मात्र लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. विजेचे बिल, किराणा, बँकेचे हफ्ते, दवाखाना-औषधी यांसारखे अनेक खर्च दर महिन्याला भागवावेच लागतात. गरजेचे असणारे हे खर्च भागविणेही आता सर्वसामान्यांना कठीण झाले आहे. त्यामुळे विशिष्ट वेळ देऊन सर्वच दुकाने चालू झाली पाहिजे.
- स्नेहल बोर्डे