कसे शिकणार अ, आ, ई ?

By Admin | Updated: June 1, 2014 00:26 IST2014-05-31T23:55:57+5:302014-06-01T00:26:02+5:30

लातूर : भारतीय राज्यघटनेप्रमाणे कुणीही कुठल्याही भाषेत शिक्षण घेऊ शकतो.

How do we learn A, A, E? | कसे शिकणार अ, आ, ई ?

कसे शिकणार अ, आ, ई ?

लातूर : भारतीय राज्यघटनेप्रमाणे कुणीही कुठल्याही भाषेत शिक्षण घेऊ शकतो. कर्नाटक शासनाने मातृभाषेची सक्ती केल्याच्या प्रकरणावर उच्च न्यायालयाने कुठलेच राज्य मातृभाषेची सक्ती शिक्षणासाठी करू शकत नाही, असा निर्णय दिला. या निर्णयाप्रमाणे महाराष्ट्रात मराठीची सक्ती करता येणार नाही. भाषातज्ज्ञांनी न्यायालयाच्या या निर्णयावर चिंता व्यक्त केली आहे तर काहींनी मात्र या निर्णयाचे स्वागत केले. यामुळे भाषिक सुडबुद्धीला आळा बसेल, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मराठी सक्तीची नसल्याने आता अ, आ, ई कसे शिकणार? असाही प्रश्न निर्माण झाला आहे. लोकशाहीप्रधान भारताच्या भाषास्वातंत्र्याचा सन्मान भारतात वेगवेगळ्या भाषा, संस्कृती वर्षानुवर्षे एकत्र नांदत आहेत़ त्यांच्या विकासासाठी भाषास्वातंत्र्य आवश्यकच आहे़ सक्ती करुन भाषेचा विकास होत नसतो़ जागतिकिकरणाच्या रेट्यात स्पर्धा वाढली आहे़ त्यामुळे विद्यार्थ्यांचा इंग्रजी शिकण्याकडे ओढा आहे़ तो असणे स्वाभाविकच आहे़ परंतु, इंग्रजी शिकताना आपली मातृषाभा शिकणेही तितकेच आवश्यक आहे़ पूर्वीच्या एकत्र कुटुंबपद्धतीमुळे घरातूनच मातृभाषेचे संवर्धन, संस्कार होत असत़ परंतु, ही व्यवस्थाच आता नष्ट होत आहे़ मराठीच्या संवर्धनासाठी प्रत्येकानेच अभिरुची बाळगावी़ प्रा़डॉ़श्रीराम गुंदेकर, मराठी भाषातज्ज्ञ मातृभाषेशिवाय समाजाचा विकास अशक्य़़़ शिक्षणात मातृभाषेची सक्ती याचा अर्थ अन्य भाषांना विरोध असा होत नाही़ प्रत्येक राज्याने, त्या-त्या भागातील राज्यकर्त्यांनी आपल्या मातृभाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करायलाच हवेत़ कारण मातृभाषेशिवाय विद्यार्थ्यांचा, समाजाचा विकास शक्य होत नाही़ मातृभाषेची सक्ती करणे शक्य नसले तरी किमान इथल्या व्यवस्थेने तिची नाकेबंदी तरी करु नये़ विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जन मातृभाषेतून जितक्या चांगल्या प्रकारे होऊ शकते तितके इतर भाषेतून होत नाही़ त्यामुळे मातृभाषेला प्रोत्साहन मिळायला हवे़ इतर भाषांचे आक्रमण होत असताना आपली मातृभाषा मराठी जपली पाहिजे़ विश्वनाथ मुडपे, संस्थापक कार्याध्यक्ष, प्रबोधन साहित्य परिषद सक्तीने काहीही साध्य होत नाही़़़ सक्तीने काही साध्य होते असा जर कोणाचा समज असेल तर तो गैरसमज आहे़ त्यामुळे न्यायालयाने दिलेला निकाल योग्यच आहे़ मराठी भाषिक आपल्या मातृभाषेवर प्रेम करीत असेल तर मराठी कधीही मरणार नाही़ भविष्यातील स्वार्थ व अर्थार्जनापोटीच आज इंग्रजी शिक्षणाकडे ओढा दिसत आहे़ शिवाय, मराठीविषयी प्रेम दाखविणारे दांभिक व फुसके आहेत, असे माझे स्पष्ट मत आहे़ निजामासारखा एक राजा उर्दू भाषेच्या संवर्धनासाठी, तिच्या जपणुकीसाठी त्याकाळी लाखो रुपये खर्च करुन वैद्यकीय व तंत्रशिक्षण उर्दूतून घेण्याची सुविधा देऊ शकतो तर आपले राज्यकर्ते हे का करु शकत नाहीत़ आपली मातृभाषा मराठी आजही ज्ञानभाषा होऊ शकत नाही, हे दुर्दैवी आहे़ प्रत्येकाने अंत:करणातून मराठी जपण्याचा प्रयत्न केल्यासच ते साध्य होऊ शकते़ फ़म़ शहाजिंदे, ज्येष्ठ साहित्यिक हा धक्का देणारा निर्णय न्यायालयाच्या निर्णयाचा आदर आहे. परंतु, हा निर्णय धक्का देणारा आहे़ शिक्षण हे मातृभाषेतूनच मिळायला हवे़ कारण मातृभाषेतून जे संस्कार, मूल्य, संवाद आणि संस्कृतीचे वहन होते, ते इतर भाषांतून होत नाही. त्यामुळे प्रत्येकाचीच मातृभाषा महत्त्वाची आहे. केवळ मराठीच नव्हे तर प्रत्येकाला त्याच्या मातृभाषेतून शिक्षण मिळाले पाहिजे. आज मोठ्या शहरांतून मराठी हद्दपार होतेय़् तिचे संवर्धन करण्यासाठी केवळ शासनाचे प्रयत्न पुरेसे ठरणार नाहीत़ तर घरा-घरातून प्रयत्न व्हायला हवेत़ वाचन संस्कृती वाढली पाहिजे़ आपली भाषा, साहित्य प्रचंड समृद्ध आहे़ परंतु, मराठीजनांनी आपले मातृभाषाप्रेम जिवंत न ठेवल्यास साहित्य व भाषा पुस्तकातच राहण्याची भीती आहे़ प्रा़डी़ए़ कुलकर्णी, ज्येष्ठ मराठी भाषा अभ्यासक मातृभाषा धुडकाविणे अस्वीकाराहार्य़़़ आज पहावे तिकडे इंग्रजी शाळांचे पेव फुटले आहे़ त्यात आपल्या मातृभाषा अडगळीला पडू लागल्या आहेत़ शिक्षण मातृभाषेतून होणे सक्तीचे करावेच लागेल़ कारण आपल्या परिसरातील संस्कृती, इतिहासाचे ज्ञान बोलीभाषेतूनच योग्यरीत्या देता येऊ शकते़ जागतिकिकरणाच्या मागे धावत राहिल्याने आज मानवी नाते यांत्रिकी बनत चालले आहे़ नात्यातील ऋणानुबंधाचा ओलावा शुष्क बनत चालला आहे़ इतर भाषांचे ज्ञान विद्यार्थ्यांनी अवश्य अवगत करावे़ त्याबद्दल तिरस्कार मुळीच नाही़ परंतु, त्यासाठी मातृभाषेला धुडकावून लावणे अस्वीकाराहार्य वाटते़ भारत सातपुते, प्रसिद्ध कवी, वात्रटिकाकार

Web Title: How do we learn A, A, E?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.