गरीब विद्यार्थ्यांनी शिकायचे कसे? ७ हजार ओबीसी विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालयांत पडून
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 11:35 IST2025-03-17T11:31:50+5:302025-03-17T11:35:01+5:30
इतर मागास बहुजन कल्याण विभागाने महाविद्यालयांच्या ढिसाळ कारभारामुळे नाराजी व्यक्त केली

गरीब विद्यार्थ्यांनी शिकायचे कसे? ७ हजार ओबीसी विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालयांत पडून
छत्रपती संभाजीनगर : इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील सात हजार विद्यार्थ्यांचे मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज महाविद्यालयांमध्ये पडून आहेत. शैक्षणिक वर्ष संपण्यासाठी आता काही दिवस शिल्लक असताना ही परिस्थिती असेल, तर गरीब विद्यार्थ्यांनी शिकायचे कसे, असा प्रश्न विधानसभेच्या अधिवेशनातही गाजला. त्यामुळे इतर मागास बहुजन कल्याण विभागाने महाविद्यालयांच्या ढिसाळ कारभारामुळे नाराजी व्यक्त केली असून, अर्जांची पडताळणी करून २५ मार्चपर्यंत अर्ज सादर करण्याची सूचना जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठाला दिली आहे.
इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील गरीब विद्यार्थ्यांना केवळ आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणात अडचण येऊ नये, म्हणून शासनाने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे भारत सरकारची शिष्यवृत्ती लागू केली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यातील या प्रवर्गातील सुमारे ४५ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व फ्रीशिपचा लाभ देण्यात आला होता. सन २०२४-२५ या चालू शैक्षणिक वर्षासाठी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये महाविद्यालयांकडून महाडीबीटी पोर्टलवर अर्ज मागविण्यात आले होते. आतापर्यंत महाविद्यालयांच्या लॉगिनवर प्राप्त झालेल्या ४२ हजार ८८५ अर्जांपैकी ३३ हजार ९६१ अर्जांची पडताळणी केली. आणखी सात हजार अर्ज महाविद्यालयांमध्ये प्रलंबित आहेत.
यासंदर्भात इतर मागास बहुजन कल्याण विभागात झालेल्या आढावा बैठकीत महाविद्यालयांच्या दिरंगाईबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली असून, येत्या १० दिवसांत प्राप्त अर्जांची पडताळणी करून परिपूर्ण अर्ज इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या लॉगिनवर फॉरवर्ड करण्याचे पत्र जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य आणि विद्यापीठ प्रशासनाला पाठविले आहे. भविष्यात पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्यास प्राचार्य व विद्यापीठ प्रशासन जबाबदार राहील, असे या विभागाचे सहायक संचालक अनंत कदम यांनी कळविले आहे.