सहा महिन्यांत पावणेतीनशे घरांचे नुकसान
By Admin | Updated: July 28, 2014 00:57 IST2014-07-27T23:58:14+5:302014-07-28T00:57:19+5:30
उस्मानाबाद : मागील सहा महिन्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वारे यासारख्या नैसर्गिक आपत्तीत २७६ कुटुंबियांच्या घराचे नुकसान झाले असून

सहा महिन्यांत पावणेतीनशे घरांचे नुकसान
उस्मानाबाद : मागील सहा महिन्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वारे यासारख्या नैसर्गिक आपत्तीत २७६ कुटुंबियांच्या घराचे नुकसान झाले असून, या आपत्तीग्रस्तांना प्रशासनाच्या वतीने आतापर्यंत ३ लाख ४० हजार ६०० रुपयांची मदत वाटप करण्यात आली आहे. उर्वरित कुटुंबियांना मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने औरंगाबाद विभागीय आयुक्ताकडे २२ लाख ५९ हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यात फेब्रुवारी ते मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील बागा व शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. सदरील शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने अनुदानही देण्यात आले आहे. दरम्यान, या आपत्तीत उस्मानाबाद, तुळजापूर, भूम, उमरगा, परंडा, कळंब या तालुक्यातील अनेकांच्या घरांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. यात अनेकांचे संसार उघड्यावर पडले. यातील काही नुकसानग्रस्तांना जिल्हा प्रशासनाकडून आर्थिक मदत देण्यात आली असली तरी अनेकजण यापासून अद्याप वंचित आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आतापर्यंत या आपत्तीग्रस्तांना ३ लाख ४० हजार ६०० रुपयांची रक्कम तहसीलदारांमार्फत वाटप केली आहे. यात उस्मानाबाद तालुक्यात १ लाख ९ हजार, तुळजापर १ लाख ९५ हजार ७००, भूूम १० हजार ८०० तर कळंब तालुक्यात २५ हजार १०० रुपयांचा निधी वाटप करण्यात आला आहे. उर्वरित कुटुंबियांनाही निधी प्राप्त होताच मदत वाटप करण्यात येणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
तालुकानिहाय मागविलेला निधी
जिल्हा प्रशासनाच्या वतीने उस्मानाबाद तालुक्यासाठी ६ लाख, तुळजापूर ५ लाख, भूम २ लाख ९६ हजार ८००, कळंब ८० हजार, उमरगा ७ लाख ३७ हजार २००, परंडा २० हजार वाशी २५ हजार अशी एकूण २२ लाख ५९ हजार रुपयांच्या निधीची मागणी औरंगाबाद विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे.