हॉर्नच्या डेसिबलची होणार तपासणी
By Admin | Updated: June 30, 2014 00:39 IST2014-06-30T00:29:29+5:302014-06-30T00:39:25+5:30
जालना : रूग्णवाहिका, अग्निशमन दलाचे बंब, पोलिस वाहनांसह इतर शासकीय वाहनांना लावण्यात आलेल्या सायरन किंवा मल्टीटोन हॉर्नच्या नियमवलीत राज्य सरकारने बदल केला आहे.

हॉर्नच्या डेसिबलची होणार तपासणी
जालना : रूग्णवाहिका, अग्निशमन दलाचे बंब, पोलिस वाहनांसह इतर शासकीय वाहनांना लावण्यात आलेल्या सायरन किंवा मल्टीटोन हॉर्नच्या नियमवलीत राज्य सरकारने बदल केला आहे.
आदेशानुसार या वाहनांची ध्वनीमर्यादा तपासण्यात येणार आहे. मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवरील हॉर्न काढण्याचे तसेच त्या वाहनांवर कारवाई करण्याच्या सूचनाही सरकारने प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
अनेकवळा रूग्णवाहिकेचे वाहनचालक हॉर्नचा दुरूपयोग करून शहरातून भरधाव वेगाने सायरन वाजवत जातात. त्यामुळे ध्वनीप्रदूषण होतेच, शिवाय अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही.
यामुळेच रुग्णवाहिकेसह अग्निशमन दल, आपत्ती निवारणादरम्यान वापरण्यात येणारी वाहने, पोलिस अधिकारी, बांधकाम साहित्याची वाहतूक करणारी वाहने मोटार वाहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वाहनांवर लावण्यात येणारे सायरनची संहिता विहित करण्यात आली आहे.
यानुसार सायरन व मल्टीटोन हॉर्न बसविलेल्या वाहनांनी निर्देशीत केलेल्या ध्वनीच्या मर्यादेतच त्याचा वापर करावा, पोलिस व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी करून खात्री करावी, वाहनांनी ध्वनीच्या मर्यादेचे उल्लंघन केल्यास अशा वाहनांवरून असे सायरन काढून टाकण्यासह विविध नियमांसह योग्य ही कारवाई करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
शासकीय वाहनांना सायरन वापराच्या नियमावलीनुसार पोलिसांनी सायरन व मल्टीटोन हॉर्न बसविलेली शासकीय वाहने, रुग्णवाहिका, आपत्कालीन स्थितीत वापरण्यात येणारी वाहनांच्या मागणी शिवाय खाजगी वाहनांनी सायरन व मल्टीटोन हॉर्नचा वापर करू नये, असेही निर्देश दिले आहेत.
दरम्यान, या संदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी सांगितले की, या नियमाची काटेकारपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. खाजगी वाहने सायरनचा वापर करतांना आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. रूग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या वाहनांसह इतर वाहनांवरील सायरन किंवा मल्टीटोन हॉर्न प्रमाणित करून घ्यावेत. (प्रतिनिधी)
अतिआवाजामुळे नागरिकांना त्रास
या आदेशानुसार सायरन व मल्टीटोन हॉर्न बसविलेल्या शासकीय वाहनांनी कोणत्याही क्षेत्रामध्ये रात्री दहा ते सकाळी ६ या वेळेमध्ये हॉर्नचा वापर करू नये. अतिशय आपत्कालीन परिस्थितीव्यतिरिक्त शहराच्या हद्दीबाहेरील सार्वजनिक रस्त्यांवर वापर करता येईल, आदेशात नमूद केले आहे.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांनी सायरन व मल्टीटोन हॉर्न बसविलेलया अॅम्बुलन्सला योग्य तो स्टीकर द्यावा.
रूग्णांच्या नातेवाईकांकडून मागणी आल्याशिवाय रुग्णवाहिकांनी सायरन व मल्टीटोन हॉर्नचा वापर करण्यावर प्रतिबंध करण्यात आला आहे.