आशातार्इंच्या चिरतरुण, चतुरस्र स्वरांची मोहिनी

By Admin | Updated: January 15, 2016 00:07 IST2016-01-14T23:41:47+5:302016-01-15T00:07:02+5:30

औरंगाबाद : विद्यापीठ परिसरातील डोंगराच्या कुशीत उभी असलेली ऐतिहासिक सोनेरी महालाची वैभवशाली वास्तू.... हळूहळू सरणारी सांजवेळ... मनाला वाटणारी किंचित हुरहुर, अंगाला स्पर्शून जाणारा गुलाबी गारवा

The hopes of the hopes, the splendid siren | आशातार्इंच्या चिरतरुण, चतुरस्र स्वरांची मोहिनी

आशातार्इंच्या चिरतरुण, चतुरस्र स्वरांची मोहिनी

औरंगाबाद : विद्यापीठ परिसरातील डोंगराच्या कुशीत उभी असलेली ऐतिहासिक सोनेरी महालाची वैभवशाली वास्तू.... हळूहळू सरणारी सांजवेळ... मनाला वाटणारी किंचित हुरहुर, अंगाला स्पर्शून जाणारा गुलाबी गारवा, अतिव सुखाच्या स्वरानंदाची मनाला असणारी प्रतीक्षा...अशा रोमांचक क्षणी अष्टपैलू गायिका आशा भोसले यांचे रंगमंचावर आगमन झाले... शेकडो नजरांच्या साक्षीनं, टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात साऱ्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले...प्रसन्न, प्रियदर्शनी, दिलखुश, दिलखुलास व्यक्तिमत्त्व असलेल्या या आशातार्इंच्या चिरतरुण, चतुरस्र सुरात गायलेल्या अजरामर गाण्यांनी कानसेनांवर मोहिनी घातली. त्यांना तेवढीच दमदार सांगीतिक साथ एव्हरग्रीन अभिनेता-गायक सचिन पिळगावकर यांनी दिली. आयुष्यातील एक देखणा, दिमाखदार सोहळा अनुभवल्याचा आनंद प्रत्येक रसिकांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.
प्रसंग होता, सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्था कलासागरच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त बुधवारी आयोजित आशा भोसले लाईव्ह कॉन्सर्टचा... संगीत विश्वातील सुरांची राणी...जवळपास सात दशके रसिकांच्या मनावर गारुड घालणाऱ्या व वयोमान ८२ वर्षे असतानाही आजही त्यांच्या आवाजाची जादू तशीच आहे. आशातार्इंचे टवटवीत सूर व सचिनचे तेवढेच खणखणीत, पण सुमधुर गाणे हा दुग्धशर्करा योग ‘याचि देही याचि डोळा’ कलासागरच्या सदस्यांनी अनुभवला. आपण या संस्थेचे सदस्य आहोत याचा अभिमानही प्रत्येकाने व्यक्त करून दाखविला.
प्रारंभी केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिज, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, खा. चंद्रकांत खैरे, कलासागरच्या संस्थापक अध्यक्षा आशू दर्डा, आ. सुभाष झांबड, आ. अर्जुन खोतकर, आ. अतुल सावे, आ. सतीश चव्हाण, कलासागरचे अध्यक्ष अनिल भंडारी व सचिव संदेश झांबड यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. पांढऱ्या रंगातील, चंदेरी नक्षीकाम असलेली साडी परिधान करून आशा भोसले जेव्हा रंगमंचावर आल्या, तेव्हा तमाम रसिकांनी जागेवर उभे राहून त्यांचा सन्मान केला.
औरंगाबादकरांच्या प्रेमाने, आदरातिथ्याने आशाताई भारावून गेल्या होत्या... त्या म्हणाल्या की ‘काय बोलू मी..? कधी कधी बोलण्यासाठी शब्द नसतात (टाळ्या)... मराठवाड्यातील रसिकांना माझा प्रणाम (टाळ्या), आज मी माझ्या पसंतीची गीते सादर करणार असे सांगत आशातार्इंनी फिल्म ‘हावडा ब्रिज’ मधील संगीतकार ओ. पी. नय्यर यांचे ‘आइये मेहरबाँ, बैठिये जाने जाँ’ हे गाणे गायले, तेव्हा सोनेरी महल परिसरात नवचैतन्य निर्माण झाले होते. आर. डी. बर्मन यांना मी ‘आयकॉनिक कम्पोजर’ असेच म्हणेन,’ अशा शब्दात आशातार्इंनी पंचमदा यांना आदरांजली वाहिली आणि ‘दो लफ्जोंकी है दिल की कहानी’ हे गीत सादर केले. यानंतर ‘ओ मेरे सोना रे, सोना रे सोना’, ‘झुमका गिरा रे बरेली के बाजार मै’ हे गीत त्यांनी विविध हरकती घेत सादर केले. यानंतर सचिन पिळगावकर यांनी ‘बचना ऐ हसीनो, लो मैं आ गया’ हे गीत गात आपल्यातील गायकाचा परिचय करून दिला. आशातार्इंनी नंतर ‘दिल चीज क्या है, आप मेरी जान लिजिए’ हा मुजरा सादर करून सर्वांची वाहवा मिळविली. नंतर ‘दम मारो दम’ व ‘पिया तू अब तो आ जा’ ही नशिली गीते सादर करताना आशाताई व सचिनने नृत्य करून धमाल उडवून दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कलासागरच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
कॉफी टेबल बुक प्रकाशनाचा मराठमोळा थाट
कलासागर संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ‘कॉफी टेबल बुक’ चे प्रकाशनही अनोख्या थाटात करण्यात आले. तुतारीचा आवाज सर्वत्र घुमला आणि प्रेक्षकांमधून संबळ वाजवीत शोभायात्रा आली... भालदार-चोपदारांच्या पाठीमागे सजविलेल्या ताटात ‘कॉफी टेबल बुक’ घेऊन सुवासिनी येत होत्या. त्यामागे खास तयार करण्यात आलेल्या मोराच्या मोठ्या प्रतिकृतीवर बुक ठेवण्यात आले होते.
मराठमोळ्या अंदाजात वाजतगाजत हे बुक रंगमंचावर आणण्यात आले.
प्रकाशन.... कलासागर कॉपी टेबल बुकचे प्रकाशन करताना (डावीकडून) लोकमतचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा, केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिज्, कलासागरच्या संस्थापक अध्यक्षा आशू दर्डा, अध्यक्ष अनिल भंडारी, आशा भोसले, सचिन पिळगावकर, ‘लोकमत’चे कार्यकारी संचालक करण दर्डा, कलासागरचे सचिव संदेश झांबड.
कलासागरच्या सर्व अध्यक्षांचा सन्मान
कलासागरने रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. या अडीच दशकांच्या सांस्कृतिक प्रवासात ज्या २५ अध्यक्षांनी यशस्वीपणे संस्थेची धुरा सांभाळून दर्जेदार कार्यक्रमाची मेजवानी दिली, अशा धुरंधर अध्यक्षांचा केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिज यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. यात संस्थापक अध्यक्षा आशू दर्डा, राजेंद्र दर्डा, ऋषी बागला, राम भोगले, एन. के. गुप्ता, रमेश नागपाल, जुगलकिशोर तापडिया, नंदकिशोर कागलीवाल, उल्हास गवळी, गौतम नंदावत, सचिन मुळे, सुयोग माछर, ऋषी दर्डा, मनीष धूत, सचिन नागोरी, राहुल मिश्रीकोटकर, आर. आर. झुनझुनवाला, मधुसूदन अग्रवाल, मुकुंद भोगले, राजलक्ष्मी लोढा, अनिल भंडारी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच रौप्यमहोत्सवी वर्ष सोहळ्यात सहकार्य करणारे रवी खिंवसरा, शांतीलाल पित्ती, राजेश भारुका, दीपक साहुजी, रतिलाल मुगदिया, अहमद जलील, नीलेश देशपांडे, हरविंदरसिंग बिंद्रा यांचाही सन्मान करण्यात आला.
दर्जेदार कार्यक्रम, हीच ओळख
कलासागरच्या संस्थापक अध्यक्षा आशू दर्डा यांनी सांगितले की, राष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम औरंगाबादेत आणण्यासाठी कलासागरची २५ वर्षांपूर्वी स्थापना झाली. सर्व अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांची मेहनत व कार्यक्रमांचा दर्जा टिकून ठेवल्याने दरवर्षी सदस्य नोंदणीचा विक्रम होत आहे. नाट्यगृह अपुरे पडू लागल्याने आता मैदानात सांस्कृतिक कार्यक्रम घ्यावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
कलासागरमुळेच योग
केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिज यांनी सांगितले की, कलासागरमुळे औरंगाबादेत प्रत्यक्ष आशातार्इंचे गाणे ऐकण्याचा योग आला. कलासागर संस्था भविष्यात देशभरात पोहोचेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. कलासागरशी झालेली मैत्री कायम ठेवेन, असे ते म्हणाले.
भविष्यात असेच कार्यक्रम घेऊ
कलासागरचे अध्यक्ष अनिल भंडारी यांनी सांगितले की, ज्या संस्थेत सदस्य बनण्याचे स्वप्न बघितले, त्या संस्थेचा मी आज अध्यक्ष झालो आहे. आशू दर्डा व सर्व पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर विश्वास टाकला, त्यांचा मी आभारी असून, पुढील वर्षभर असेच दर्जेदार कार्यक्रम घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Web Title: The hopes of the hopes, the splendid siren

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.