बजाज आॅटो एम्प्लॉईज युनियनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
By Admin | Updated: August 23, 2014 00:49 IST2014-08-23T00:34:06+5:302014-08-23T00:49:43+5:30
औरंगाबाद : अधिकाधिक कुशल बना, असा सल्ला आज येथे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी दिला.

बजाज आॅटो एम्प्लॉईज युनियनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
औरंगाबाद : उद्योगांना कुशल कामगार मिळत नाहीत, ही समस्या ओळखा. अधिकाधिक कुशल बना, अगदी चांगले प्लंबर, मेकॅनिक, कारपेंटरसुद्धा महिन्याला लाख- लाख रुपये कमवीत आहेत, हे लक्षात घ्या, असा सल्ला आज येथे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी दिला.
बजाज आॅटो एम्प्लॉईज युनियनतर्फे आयोजित कामगारांच्या गुणवंत पाल्यांच्या सत्कार समारंभात तापडिया नाट्यमंदिरात ते बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की, शेंद्रा- बिडकीन परिसरात डीएमआयसी येण्याची सुतराम शक्यता नव्हती; पण ती उद्योगमंत्री असताना मी खेचून आणली. आतापासूनच या डीएमआयसीमध्ये परदेशी कंपन्या यायला लागल्या आहेत. २०२० पर्यंत येथे अडीच लाख रोजगार उपलब्ध होणार आहे. हे लक्षात घेता २०२० पर्यंत दहा लाख कुशल कामगार तयार करावे लागतील. औरंगाबाद शहरात दोनशे मर्सिडीज गाड्या आहेत; पण त्यांच्या दुरुस्तीसाठी मेकॅनिक नाहीत. त्यासाठी पुण्याला जावे लागते, याकडे शिक्षणमंत्र्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. त्यांनी नमूद केले की, बजाजचा माझा संबंध खूप आला. शहर वाढत गेले. या शहराच्या नावलौकिकात बजाजचा मोठा वाटा आहे. अलीकडेच बजाजमध्ये कामगारांचा दहा हजार रुपये पगारवाढीचा चांगला करार झाला. याबद्दल मी संघटनेचेही अभिनंदन करतो. प्रा. सतीश सूर्यवंशी यांनी यावेळी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. प्रारंभी, प्रमोद फडणीस यांनी प्रास्ताविक केले. मंचावर युनियनचे अध्यक्ष भाऊसाहेब वाघमारे यांची उपस्थिती होती. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच उत्तम आसबे व पंडित तांबिले यांना भारत सरकारच्या श्रम मंत्रालयाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा व आदर्श मित्रमंडळाचे अध्यक्ष सुहास दाणी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कांतीलाल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी कृउबाचे माजी सभापती पंकज फुलपगर, दामूअण्णा शिंदे, लक्ष्मण गोरे, प्रभाकर भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती.