‘मराठवाडा मुक्ती संग्रामाचा आणि विकास आंदोलनाचा इतिहास नव्याने लिहिण्याची गरज’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:17 IST2021-02-05T04:17:21+5:302021-02-05T04:17:21+5:30
औरंगाबाद : मराठवाडा मुक्ती संग्रामाचा आणि मराठवाडा विकास आंदोलनाचा इतिहास नीटपणाने लिहिला गेला नाही. भावी पिढीला हा इतिहास माहीत ...

‘मराठवाडा मुक्ती संग्रामाचा आणि विकास आंदोलनाचा इतिहास नव्याने लिहिण्याची गरज’
औरंगाबाद : मराठवाडा मुक्ती संग्रामाचा आणि मराठवाडा विकास आंदोलनाचा इतिहास नीटपणाने लिहिला गेला नाही. भावी पिढीला हा इतिहास माहीत होणे गरजेचे आहे. म्हणून तो नव्याने लिहिण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मान्यवरांनी क्रांतिवीर दत्तोबा भोसले-मातोळकर यांच्या सुधारित स्मृतिग्रंथाच्या प्रकाशन समारंभात केले.
शिवछत्रपती महाविद्यालयाच्या सभागृहात हा सोहळा पार पडला.
ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा.रं. बोराडे, मानसिंग पवार, ज्येष्ठ विधिज्ञ शशिकुमार चौधरी यांची यावेळी भाषणे झाली. क्रांतिवीर दत्तोबा भोसले-मातोळकर यांच्या शौर्याच्या आणि त्यांच्या पुरोगामित्वाच्या अनेक कथा सांगत या सर्वांनी हा इतिहास नीट लिहिला गेला नसल्याची खंत व्यक्त केली. स.भु. शिक्षण संस्थेने मराठवाडा मुक्ती संग्रामाचा आणि मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने मराठवाडा विकास आंदोलनाचा इतिहास लिहिण्याकामी पुढाकार घ्यावा, अशी सूचना मानसिंग पवार यांनी केली.
स.भु. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राम भोगले आणि मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आमदार सतीश चव्हाण यांची मंचावर उपस्थिती होती. या दोघांनी ही जबाबदारी स्वीकारावी, असा मानसिंग पवार यांचा आग्रह होता.
दत्तोबा भोसले आणि त्यांच्यासारख्या क्रांतिवीरांच्या इतिहासाकडे पाठ करून चाललोय. हे कृतघ्नपणाचे लक्षण होय, असे मत रा.रं. बोराडे यांनी व्यक्त केले.
माजी खासदार उत्तमसिंग पवार, माजी राज्यमंत्री अनिल पटेल, किशोर शितोळे, बाबा भांड, प्रताप बोराडे, पद्माकर मुळे, प्रा.विजय पाथ्रीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अच्युत भोसले, सुरेश कुटे, चंद्रशेखर जाधव, पृथ्वीराज भोसले, रोहन काकडे, रमेश कुटे, मुरलीधर बनसोडे आदींनी पाहुण्यांचे स्वागत केले.
कादंबरी भोसले, अनुजा भोसले, तनुजा भोसले, कुमुदिनी भोसले, श्रेया भोसले, अरविंद भोसले, तन्मय भोसले आदींचा सत्कार यावेळी करण्यात आला.
समाजाची म्हणून काही जबाबदारी आहे की नाही?
दत्तोबा भोसले हे पुरोगामी होते. निजामास त्यांनी सळो की पळो करून सोडले होते. त्यांना पकडण्यासाठी लाखो रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली होती. इतिहास, साहित्य, बहुजन समाज आणि मराठवाडा यात तारतम्य नाही. दत्तोबा भोसले, काकासाहेब देशमुख, दगडाबाई शेळके यांच्यासारखे लढवय्ये या लढ्यात होते म्हणून हा लढा यशस्वी झाला. हा इतिहास त्यांच्या कुटुंबीयांनीच सांगितला पाहिजे का? समाजाची म्हणून काही जबाबदारी आहे की नाही, असा सवाल यावेळी वक्त्यांनी उपस्थित केला.
प्रा.विजय चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. सरोजिनी पंडित यांनी सूत्रसंचालन केले. विवेक भोसले यांनी आभार मानले.