गोदाकाठचे उच्चशिक्षीत तरूणही उतरले वाळू व्यवसायात
By Admin | Updated: April 22, 2015 00:38 IST2015-04-22T00:24:51+5:302015-04-22T00:38:00+5:30
रवी गात ,अंबड वाळू तस्करीतून मिळणाऱ्या अफाट संपत्तीकडे आकर्षित होत अनेक उच्च शिक्षित तरुण वाळू तस्करीत उतरल्याचे भयानक वास्तव समोर आले आहे

गोदाकाठचे उच्चशिक्षीत तरूणही उतरले वाळू व्यवसायात
रवी गात ,अंबड
वाळू तस्करीतून मिळणाऱ्या अफाट संपत्तीकडे आकर्षित होत अनेक उच्च शिक्षित तरुण वाळू तस्करीत उतरल्याचे भयानक वास्तव समोर आले आहे. तालुक्यातील वाळू माफिया व त्यांना आशीर्वाद देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अल्पावधीत मिळविलेल्या अफाट संपत्तीमुळे डोळे दिपलेल्या तरुणांनी आपले नशीब याच काळया व्यवसायात आजमाविण्याचे ठरविल्याचे दिसते.
वाळू माफियांच्या कारवायांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळेच तालुक्यातील तरुण पिढी या काळया व्यवसायात सक्रीय होताना पाहण्याची दुर्देवी वेळ पालकांवर आली आहे.
मानव विकास निर्देशंकानुसार जालना जिल्हा शिक्षणात मागास म्हणून ओळखला जातो. विशेष बाब म्हणजे जिल्हयात उच्च शिक्षणाचे प्रमाणही इतर जिल्हयांपेक्षा कमी आहे. आधीच शैक्षणिक बाबतीत मागे असलेल्या जिल्हयास व विशेष करुन अंबड तालुक्यास वाळू तस्करीचा शाप लाभला आहे. गोदाकाठच्या बहुतांश गावांतील तरुणाई शिक्षणाने प्रेरित होऊन स्पर्धापरीक्षा अथवा इतर क्षेत्राकडे आकर्षित होण्याऐवजी रात्रीतून श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहत वाळू तस्करीच्या धंद्याकडे आकर्षित झाली आहे.
गोदाकाठच्या अनेक गावांमधील तरुणांनी महाविद्यालयीन शिक्षण सुरु असतानाच या काळया व्यवसायात नशीब आजमाविण्यास सुरुवात केली आहे.
मागील दोन वर्षांत गोदाकाठच्या गावांमध्ये टिप्पर, ट्रक व ट्रॅक्टरच्या खरेदीत मोठी वाढ झाली आहे. गोदाकाठच्या बहुतांश गावांमध्ये फेरफटका मारला असता मोठया संख्येने टिप्पर, ट्रक व ट्रॅक्टर पाहायला मिळतात. सुर्यास्तानंतर हीच वाहने वाळू तस्करीसाठी बाहेर पडतात. यासाठी मोठ्या प्रमाणावर गोदाकाठची तरुणाई कार्यरत आहे.
वाळू तस्करीच्या व्यवसायात कार्यरत असलेले तस्कर, त्यांना मदत करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्या संपत्तीत मागील काही काळात कैकपटीने वाढ झाल्याच्या अनेक सुरस कथा तालुक्यात सांगितल्या जातात. वाळूपट्टयात कार्यरत असलेल्या एका मंडळ अधिकाऱ्याने मागील दोन वर्षांत भव्य बंगला, चार चाकी वाहन व गोलापांगरी परिसरात तब्बल १५ एकर बागायती जमीन खरेदी केल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
वाळू माफियांना महसूल व पोलीस प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी मदत करतात व त्यातुनच हा काळा व्यवसाय दिवसेंदिवस फोफावत असल्याचे वास्तव सर्वांनाच ज्ञात आहे. वाळू तस्करी करणाऱ्या वाहनांकडुन रात्री चिरमिरी मिळविण्यासाठी महसूल खात्यातील काही महाभागांनी नवी युक्ती शोधली आहे.
४हे महाभाग रात्री अंबड शहरातुन खाजगी वाहन भाडयाने मिळवतात. वाळू माफियांनी मारहाण करतील, या भीतीने हे कर्मचारी आपल्या सोबत रोजंदारी करणाऱ्या काही व्यक्तींना गाडीत बसवून आपली संख्या वाढवतात. त्यानंतर सर्वजण गोदाकाठच्या रस्त्यावरुन खाजगी वाहनाने रात्रभर फिरतात.
४ ज्या वाळू तस्कराने हफ्ता दिलेला नाही, असे लक्षात येताच त्याचे वाहन अडविले जाते. त्याच्याकडून चिरीमिरी घेतली जाते. ही चिरमिरी एका वाहनासाठी २५ ते ७५ हजार रुपयांपर्यंतची असते. त्यानंतर वाळू वाहतूक करणारे वाहन सोडून देण्यात येते. महसूल कर्मचाऱ्यांबरोबर रात्री फिरण्यासाठी ३ ते ५ हजार रुपयांची रोजंदारी एका व्यक्तीला दिली जाते.