फेरफार होणार ‘हायटेक’
By Admin | Updated: May 26, 2014 00:28 IST2014-05-25T23:57:43+5:302014-05-26T00:28:05+5:30
जालना : खरेदी-विक्रीच्या व्यवहारानंतर फेरफार घेण्याची प्रक्रिया जलद गतीने व्हावी यासाठी, ई-फेरफार सॉफ्टवेअर विकसित करण्यात आली आहे

फेरफार होणार ‘हायटेक’
जालना : खरेदी-विक्रीच्या व्यवहारानंतर फेरफार घेण्याची प्रक्रिया जलद गतीने व्हावी यासाठी, ई-फेरफार सॉफ्टवेअर विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे आता नागरिकांना तलाठी, सर्वेअर यांच्याकडे खेटे मारण्याची गरज भासणार नाही. दस्त नोंदणी प्रक्रियेचे संपूर्ण संगणकीकरण झाले असून, त्यामुळे नागरिकांची कामे गतीने आणि पारदर्शकपद्धतीने होण्यास मदतच होत आहे. त्यामुळेच राज्यशासनाने शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांच्या सोयीसाठी ई-फेरफार सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या कार्यालयाचे कामकाज ‘हायटेक’ पद्धतीने चालणार आहे. पूर्वीपासून जमिनीच्या खरेदी-विक्रीनंतर फेरफार घेण्यासाठी तलाठी, सर्वेअर यांच्याकडे जावे लागत होते. तलाठी हस्तलिखीत फेर घेऊन संबंधित खरेदीदाराची नोंद त्या मालमत्तांवर करत होते. परंतु आता हस्तलिखीत पद्धतीऐवजी ई-फेरफार पद्धतीने कामकाज होणार असल्यामुळे या कामाला गती मिळणार आहे. या आधुनिक व आॅनलाईन नोंदणी पद्धतीची सुधारणा महाराष्ट्र जमिन महसूल संहिता १९६६ व महाराष्ट्र जमिन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम १९७१ मध्ये करण्यात येणार आहेत. या नवीन प्रणालीमुळे नोंदणी बरोबरच फेरफार नोंदीचीही कार्यवाही करण्यासाठी नियमात सुधारणा करण्यात येणार आहे. नोंदणीकृत दस्तऐवजाच्या नोंदणीनंतर दुय्यम निबंधकासमोर समक्ष उपस्थित राहून दस्तावर सही करणार्या खरेदीदारास फेरफार नोंदीच्या वेळी संबंधितास पुन्हा तलाठ्यासमोर उपस्थित रहावे लागत होते. या प्रणालीमुळे पुन्हा तलाठ्यासमोर उपस्थित राहण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे विलंब टाळून अधिकार अभिलेख वेळीच अद्ययावत होतील व त्यामध्ये पारदर्शकता येईल. दस्त नोंदणी होताच त्याची माहिती सॉफ्टवेअरव्दारे तहसील कार्यालयातील ‘म्युटेशन सेल’ला तात्काळ दिली जाईल. त्याआधारे फेरफार नोंद घेऊन नमुना ९ ची नोटीस तयार करून तलाठ्यास तशी नोंद घेण्याचा एसएमएस किंवा ई-मेल पाठविला जाईल. त्यानुसार तलाठी किंवा परीरक्षण भूमापक (सर्व्हेअर) फेरफार नोंदवहीत नोंद घेऊन पुढील कार्यवाही करतील, असेही सूत्रांनी सांगितले. ही कार्यवाही तात्काळ आॅनलाईन होऊन नागरिकांची होणारी गैरसोय आणि विलंब टाळला जाऊ शकेल. तसेच हे सर्व अभिलेखे अद्ययावत होणार आहेत. (प्रतिनिधी)सर्वच दस्त नोंदणी कार्यालये संगणकीकृत आहेत. त्यामुळे खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी आलेल्या नागरिकांच्या वेळेच्या बचत होत आहे. नोंदणी शुल्काची रक्कम आॅनलाईन चलनाव्दारे बँकेतच भरावी लागत असल्यामुळे बहुतांश व्यवहार पारदर्शक झाले आहेत. ई- फेरफार या प्रणालीत दस्त नोंदणी झाल्यानंतर तहसील कार्यालयातील ‘म्युटेशन सेल’ला सॉफ्टवेअरव्दारे सूचना पोहोचेल. त्या सूचनेनुसार फेरफार नोंद घेण्यात येईल. नमुना क्रमांक ९ ची नोटीस तयार करून संबंधित तलाठ्याच्या मोबाईलवर एसएमएस किंवा ई-मेलव्दारे पोहोचविण्यात येणार असल्याची माहिती शासकीय सूत्रांनी दिली.