अहो आश्चर्यम रविवारीही उचलला कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 12:31 AM2017-11-06T00:31:31+5:302017-11-06T00:31:36+5:30

मागील काही दिवसांपासून कचरा उचलणा-या यंत्रणेतील अधिकारी व कर्मचा-यांना कारणे दाखवा नोटिसा, जागेवर दंड आकारणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे रविवारीही शहरातील विविध भागांतील कचरा उचलण्यात आला

Hey wonder ! garbage picked up on Sunday | अहो आश्चर्यम रविवारीही उचलला कचरा

अहो आश्चर्यम रविवारीही उचलला कचरा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शनिवारी आणि रविवारी सार्वजनिक सुटीचे कारण दाखवून आजपर्यंत महापालिका शहरातील कचरा उचलत नव्हती. मागील काही दिवसांपासून कचरा उचलणा-या यंत्रणेतील अधिकारी व कर्मचा-यांना कारणे दाखवा नोटिसा, जागेवर दंड आकारणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे रविवारीही शहरातील विविध भागांतील कचरा उचलण्यात आला. ज्या ठिकाणी कचरा उचलण्यात आला तेथे औषध फवारणी, कीटकनाशक फवारणी करण्यात आल्याचे चित्र पाहून औरंगाबादकरांना सुखद धक्काच बसला.
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानात महापालिकेने लाखो रुपये खर्च करून शहरात कचरा उचलण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचा प्रयत्न केला. शहराच्या अनेक वसाहतींमधील कचराकुंड्याच गायब करण्यात आल्या आहेत. त्यामुळे डोअर टू डोअर कलेक्शन सुरू करण्यात आले. १३० आॅटोरिक्षा भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या आहेत. दरवर्षी मनपा कचरा उचलण्याच्या प्रक्रियेवर सर्वाधिक ३६ कोटी रुपये खर्च करीत आहे. एवढे करूनही शहरात जिकडे तिकडे कच-याचे डोंगर दिसून येत होते. लोकप्रतिनिधींनीही कच-याचे डोंगर नष्ट व्हावेत यासाठी प्रशासनासोबत बरेच प्रयत्नही केले. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाली.
मागील आठ दिवसांपासून नवनिर्वाचित महापौर नंदकुमार घोडेले यांनी पहाटे ५ वाजेपासून कचरा उचलण्याच्या प्रक्रियेची पाहणी सुरू केली. या पाहणीत अत्यंत बारीक सारीक त्रुटी दुरुस्त करण्यात येत आहेत. मनपाच्या सर्व वाहनांना लवकरच जीपीआरएस यंत्रणा बसविण्यात येणार आहे. मध्यवर्ती जकात नाका येथून सकाळी ५ वाजता सर्व मोठी-लहान वाहने कचरा उचलण्यासाठी बाहेर पडत आहेत. साफई मजूर मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते झाडून काढत आहेत. मनपाने जुन्या यंत्रणेचा वापर करीत कचरा उचलण्याच्या प्रक्रियेत काहीअंशी बदल घडवून आणला आहे. रविवारी काही भागात कचरा उचण्यात आला, अन्यथा शनिवारी आणि रविवारी कचरा उचलण्यात येत नव्हता.रविवारी महापौरांनी रंगारगल्ली, समर्थनगर, शहागंज, टीव्ही सेंटर आदी भागात भेट देऊन कचरा उचलण्यास भाग पाडले.

Web Title: Hey wonder ! garbage picked up on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.