आपद्ग्रस्तांना ४८ तासांत मदत
By Admin | Updated: May 8, 2014 00:41 IST2014-05-08T00:41:12+5:302014-05-08T00:41:29+5:30
नांदेड : पावसाळ्यात अचानक उद्भवणार्या संभाव्य परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी दक्षता बाळगण्याच्या सूचना जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी दिल्या़

आपद्ग्रस्तांना ४८ तासांत मदत
नांदेड : पावसाळ्यात अचानक उद्भवणार्या संभाव्य परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी दक्षता बाळगण्याच्या सूचना जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी दिल्या़ त्याचवेळी आपद्ग्रस्तांना ४८ तासांत मदत मिळाली पाहिजे याची खबरदारीही घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले़ जिल्ह्यात ३३७ गावे पुरामुळे बाधित होऊ शकतात अशी माहितीही यावेळी देण्यात आली़ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने घेण्यात आलेल्या गुरूवारी मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते़ यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, सहायक जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती़ जिल्हाधिकार्यांनी प्रारंभी पाणीटंचाई आराखड्याची माहिती देताना मुखेड व कंधार भागात अद्याप काही गावांना टँकर्स सुरू असल्याचे सांगितले़ यावर्षी उद्भवणार्या पूर परिस्थितीत सर्व सहायकारी साधनांची उपलब्धता करून ठेवावी़ नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा द्यावा, तालुका नियंत्रण कक्ष स्थापन करावेत, सर्व अधिकारी, कर्मचारी, सहाय्य करणार्या व्यक्ती यांचे दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून ठेवणे आवश्यक आहे़ आपदग्रस्तांना ४८ तासांत मदत मिळवून देता येईल, अशी व्यवस्था करावी, असेही जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी यावेळी सूचित केले़ ज्या मोबाईलमध्ये अँडरॉईड सिस्टीम आहे त्यावर वेदर सिस्टीम समजू शकेले़ पाऊस किती पडला याची अशा मोबाईलवर माहिती मिळेल असेही ते म्हणाले़ निवासी उपजिल्हाधिकारी डॉ़ निशिकांत देशपांडे यांनी मान्सूनपूर्व करावयाच्या कामांचे नियोजन सांगितले, जिल्हा आपत्ती प्राधिकरणाचा टोल फ्री क्रमांक १०७७१ हा आहे़ सर्व यंत्रणांनी २० मे पूर्वी कृती आराखडे तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावीत़ साथरोग प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात, पर्जन्यमापक यंत्र ८० ठिकाणी चालू ठेवावीत़ महापालिका व नगरपालिका क्षेत्रात आवश्यकही पूर्वतयारी ठेवावी असेही त्यांनी सांगितले़ पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंत्याशी सर्व विभागांनी समन्वय ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या़ बैठकीत हवामानतज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी पावसाबाबतची माहिती सादर केली़ बैठकीस सिंचन, बांधकाम, विद्युत, वन, महसूल आदी विभागाचे प्रमुख तसेच उपविभागीय महसूल अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)