फटाका मार्केट दुर्घटनेतील नुकसानग्रस्तांना मदत द्या
By Admin | Updated: November 5, 2016 01:40 IST2016-11-05T01:24:27+5:302016-11-05T01:40:54+5:30
औरंगाबाद : जि. प. मैदानावरील फटाका मार्केटला लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

फटाका मार्केट दुर्घटनेतील नुकसानग्रस्तांना मदत द्या
औरंगाबाद : जि. प. मैदानावरील फटाका मार्केटला लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्याकडे दिल्ली येथे करण्यात आली.
खा.चंद्रकांत खैरे यांच्यासह फटाका असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी दिल्लीत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आगीतील नुकसानग्रस्तांना मुख्यमंत्री सहायता निधीतून तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी. एकूण १० कोटी ५८ लाख ३७ हजार ६७० रुपयांचे नुकसान झाल्याचा सविस्तर अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. मंडप व वाहने मिळून १५ कोटींपर्यंतचे नुकसान झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. शिष्टमंडळात गोपाळ कुलकर्णी, असोसिएशनचे अध्यक्ष माणिकचंद महतोले, बाळू खंडेलवाल, गणेश चौधरी, विजय शिंदे यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्तांना शासन नक्की मदत करील, असे आश्वस्त केल्याचे खा.खैरे यांनी कळविले आहे.
महापालिकेवर फोडले खापर
अग्निशमन विभागाने फटाका असोसिएशनला बंब उपलब्ध करून न दिल्याने आग विझविण्यास उशीर झाला. असे निदर्शनास आले हे खेदाने नमूद करीत असल्याचे सांगत याकामी मनपाचा निष्काळजीपणा झाल्याचे दिसून येते. यात दोषींना कठोर शासन करण्याची मागणीही खा.खैरे यांनी मुख्यमंत्री व मुख्य सचिवांकडे केली.
...आता राजकीय धगधग
आग विझली असली तरी त्याची राजकीय धगधग सुरू झाली आहे. खा.खैरे फटाका असोसिएशनला घेऊन दिल्लीत आर्थिक मदतीची मागणी करीत आहेत. तर दुसरीकडे आ.संजय शिरसाट यांनी फटाका व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी पोलीस आयुक्तालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.